ज्याचं_त्याचं_स्वातंत्र्य
रविवारची आळसावलेली सकाळ.
मुलं अजून उठलीच नव्हती.
साडेनऊच्या सुमाराला स्वयंपाकाच्या बाई आल्या आणि घरात जरा जाग आली. भांड्यांचे आवाज, फोडणीचा दरवळ झोप उडवून गेला.
१० वाजता टेबलाशी सगळ्यांची हजेरी लागली-नाश्त्यासाठी.
खाणं-पिणं झाल्यावर शामला बाई म्हणाल्या,
“जाऊ नका कुणी. मला काही बोलायचंय.”
भुवया उंचावल्या गेल्या.
“१ तारखेपासून मी ‘निवृत्ती’ वृद्धाश्रमात राहायला जायचं ठरवलंय.”
जे ऐकलं त्याचा अर्थ कळायला ५-७ सेकंद लागली सगळ्यांना. नंतर एकदम सगळे काहीतरी बोलायला जाणार तर शामलाबाईंनी त्यांना हाताने थांबवलं.
“माझं बोलून व्हायचंय.
बँकेतून निवृत्त झाले तेव्हा बँका नुकत्याच computerised झाल्या होत्या. मला ट्रेनिंगला पाठवलं होतं बँकेने. मी सगळं शिकले, अजूनही वापरते लॅपटॉप.
स्मार्टफोन तर आता गरजच झालाय. त्यामुळे नीट चौकशी करून, शोध घेऊन, सगळी माहिती घेऊनच मी हा आश्रम निवडलाय.
आता हा निर्णय का घेतला...
२० ते ५५ वयोगटातली तुम्ही ४ माणसं.
आपल्या ‘पर्सनल स्पेस’मध्ये किंवा ‘स्वातंत्र्या’त काहीही अडथळा नको असतो तुम्हांला.
जराही तडजोड, समजून घेणं मान्य नसतं.
ठीक आहे, तो तुमचा विचार झाला.
मग आता वयाच्या या टप्प्यावर माझी स्पेस, स्वातंत्र्य, मनस्वास्थ्य यांचा विचार मी का करू नये?
सगळं आयुष्य कुटुंबासाठी वेगवेगळ्या तडजोडी करण्यातच गेलंय माझं. माझ्या पिढीच्या सगळ्यांचंच. बिचारी, पीडित, शोषित वगैरे नाही आहे मी, पण तडजोडी कराव्या लागल्याच.
आता या वयात पण मीच झुकतं घ्यायचं, समजून घ्यायचं, तडजोड करायची. का?
या प्रश्नाचं उत्तर शोधतांना मी या निर्णयावर आले की आता माझ्याशिवाय कुणाचं काही अडणार नाहीये. तर माझ्या मनस्वास्थ्यासाठी मीच प्रयत्न करायचा आहे, जिथे ते मिळेल तिथे जाऊन राहायचं आहे.
म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.
माझं विल तयार आहे. उद्या ते रजिस्टरही होईल. बँकेच्या २-३ formalities आहेत, त्या पूर्ण होतील या आठवड्यात. १ तारखेला सकाळी गाडी येईल आश्रमाची, मला न्यायला. माझ्या २ सुटकेस असतील. बाकीच्या सामानाचं काय करायचं ते मी ठरवून तसं कळवेन तुम्हांला.
१ तारखेनंतरही तुम्ही आपापलं आयुष्य नेहमीसारखं जगाल.
माझे आशीर्वाद आहेतच.”
इतकं बोलून त्या उठून खोलीकडे निघाल्या. सुनेने पटकन उठून त्यांचा हात धरला आणि त्यांना पुन्हा खाली बसवलं.
“मला कळतेय तुमची अस्वस्थता, मानसिकता. पण... मला थोडा वेळ द्या. लवकरात लवकर मी यावर उपाय शोधते. नाही जमलं तर मग तुम्ही म्हणाल तसं.
तुमचे अनुभव लिहिणार होतात, ते पूर्ण करा तोपर्यंत. ते झाले की मग ठरवू.
चालेल ना?”
शामलाबाईंनी तिच्या हातावर थोपटलं आणि उठून गेल्या.
#आपलं_मनस्वास्थ्य_आपणच_सांभाळायचं
#तडजोड_ज्येष्ठांनीच_करायची
(कोणत्या पिढीने कसं वागावं, कुणाचा काय अनुभव याची चर्चा अपेक्षित नाही. 🙏🏻)
राधा मराठे
श्रावण कृष्ण चतुर्दशी १९४८
१०.९.२०२६
Comments
Post a Comment