स्वप्न

  


कमलिनीबाई न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्या त्याला आता २ महिने होत आले होते. सत्कार समारंभ, निरोप समारंभात हे दोन महिने कसे गेले ते त्यांना कळलंही नव्हतं. आता त्या जरा निवांत झाल्या होत्या. एक दिवस दुपारी काहीतरी चाळा म्हणून त्या डायरी घेऊन बसल्या. जुनं काही वाचलेलं आठवत होतं, त्यावर रसग्रहणात्मक टिप्पण्या, भाष्य असं काहीतरी लिहीत होत्या. ४ वाजता सून घरी आली.

“काय, कसा गेला आजचा दिवस?”

“गेला रोजच्यासारखाच.”

असं म्हणून ती आत गेली.


कपडे बदलून, हात-तोंड धुवून बाहेर आली तर कमलिनीबाई चहा गाळत होत्या.

“हे काय तुम्ही का केलात? राही नाही आली?”

“आली होती, पण तिच्या सासूबाईंना बरं नाही म्हणून तिची शेजारीण आली बोलवायला. जाऊन येते म्हणाली. येईल संध्याकाळपर्यंत.”

“काय लिहीत होतात?”

“असंच काहीतरी आठवत गेलं, लिहावंसं वाटलं. खास काही नाही.”

“आई, त्या दिवशी ते चौधरी म्हणत होते काहीतरी कन्सल्टन्सीचं. तुम्ही का करत नाही? इतका अनुभव, अभ्यास. लोकाना फायदा होईल त्याचा.  शिवाय आता तुम्ही सरकारी नोकर नाही  म्हणजे कुणाला काही सल्ला द्यायला तसं काही बंधन नाही तुमच्यावर.”

“हो, करेन विचार. पण सध्या काही दिवस निवांत वेळ घालवावा असं वाटतंय.”

“आई, इतकी वर्षं वकिली, मग न्यायाधीशपद. इतकी यशस्वी कारकीर्द. तुमच्या त्याच्याशी निगडित आठवणी, किस्से का लिहित नाही तुम्ही? आवडेल लोकांना नक्की. लिहाच तुम्ही.”

त्या फक्त हसल्या.


४-६ दिवसांनी रात्री जेवतांना सुनेने पुन्हा आठवण केली आठवणी लिहायची.

“आठवणी? भरपूर आहेत तिच्यापाशी. पूर्वी खूप सांगायची. मग त्या खुर्चीने फार वेळ घेतला तिचा.” श्रीधरराव उत्साहाने म्हणाले.

“खरंच, लिही तू. भाषा तुझा आवडीचा विषय होता. चांगलं लिहीशील.”


आणि मग आठवणी पिंगाच घालायला लागल्या त्यांच्या मनात.

१४ वर्षांची कुमुद आठवली त्यांना.....

रडून रडून कुमुदचे डोळे सुजले. काय करावं कळेना तिला. केवळ ‘मोठी झाली’ या कारणाने आजीने तिचा डान्स क्लास बंद करायला सांगितला आणि बाबांनी तिचं नाव क्लासमधून काढलं.

क्लासच्या बाई डान्समास्तरना घेऊन घरी आल्या.

“साहेब, उत्तम नाचते ती. मोठी कलाकार होईल. नाव काढेल तुमचं, घराण्याचं. आज इतकी नावं गाजतायत, त्यात तिचंही नाव जोडलं जाईल.

असं नका करू. आम्ही घेऊ तिची काळजी. आमच्या नृत्यालयाची श्रेष्ठ शिष्या आहे ती.”

त्या परोपरीने समजावत होत्या. आणि कुमुदचे बाबा शांत ऐकत होते.

एक क्षणी ते उठून उभे राहिले, हात जोडून म्हणाले, “या आपण. आमचा निर्णय बदलणार नाही. आमचं नाव मोठं करायला इतर कितीतरी गोष्टी करू शकते ती. तिच्या आनंदासाठी आम्ही ३ वर्षं पाठवलं तिला. आता नाही.

आणि तिने नाच - नृत्य - नाही केला म्हणून कलाक्षेत्राचं, नृत्याचं काहीही नुकसान होणार नाही....”

“पण साहेब, तिचं होईल....”

“आमच्या लेकीच्या नफा-नुकसानीची काळजी आम्ही घेऊ. आपल्याला लक्ष घालायची गरज नाही.

आणि एक सांगतो, ती शाळेसाठी किंवा इतर कारणांनी घराच्या बाहेर पडल्यावर तिला गाठून याबद्दल तिच्याशी काहीही बोलायचं नाही. समोर आली तर खुशाली विचारायची आणि पुढे जायचं. समजलं?”

मुकाट ती दोघं उठून निघून गेली. कुमुद २ दिवस जेवली नाही, शाळेत गेली नाही, खोलीत कोंडून घेतलं स्वतःला.


दुसऱ्या दिवशी रात्री तिची आई दुधाचा पेला घेऊन आली. तिच्या गळ्यात पडून कुमुदने अक्षरशः हंबरडा फोडला. आईने तिला रडू दिलं. थोपटत राहिली. बळजबरीने दूध प्यायला लावलं. तिचं डोकं मांडीवर घेऊन थोपटत बोलायला लागली,

“कुमे, तुला नाचायला आवडतं, तू उत्तम नाचतेस, हे आम्हांला माहीत आहे. ऐकलंय, शाळेच्या स्नेहसंमेलनात पाहिलाय तुझा नाच. पण तुझे बाबा आणि आजी जर आता नाच बंद या निर्णयावर ठाम असतील, तर तू रडून काही होणार नाही.”

“पण आई ....”

“शू ss, ऐकून घे पुरतं. बाबांचं तुझ्यावर किती प्रेम आहे, तुला किती जपतात ते तुला नव्याने सांगायला हवं? कॉलेजला जाईपर्यंत साडी न नेसण्याचा तुझा हट्ट त्यांनी मान्य केला, त्यासाठी आजीची नाराजी पत्करली. तू म्हणशील ते होतं घरात. होतं ना? कधी कशाला नाही म्हटलंय?


तुला जेवतांना गोड लागतं म्हणून ५-६ प्रकारच्या मोरांब्याच्या बरण्या आजी न चुकता भरते दर वर्षी, तुझ्यासाठी टम्म फुगलेली चुलीवरची भाकरी करते .... ते का? तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना?

मग एक गोष्ट त्यांनी नाही म्हटली, तर इतका थयथयाट?

प्रत्येक माणसाचं मत वेगळं असतं. ऐकलेल्या, पाहिलेल्या घटनांवरून ते घडतं, घट्ट होतं. त्यात चूक बरोबर ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही.

आपल्या लेकीला त्रास होऊ नये म्हणून सगळेच आईवडील काही ना काही बंधन घालतात. हां, काही माणसं असतात हेकेखोर. मुलांच्या आनंदापेक्षा आपला आब महत्त्वाचा वाटतो. पण तुझे बाबा तसे नाहीत ना?

गेल्या वर्षी त्यांनी बाहेर फिरायला जायचं ठरवलं, तू नाही म्हणालीस. तुला आत्याकडे जायचं होतं. त्यांनी जाऊ दिलं ना?


तुझा प्रत्येक हट्ट ते पुरवतात, मग त्यांनी एक बंधन घातलं तर तू लगेच त्यांना खलनायक ठरवायला निघालीस? तू जेवली नाहीस, तर त्यांच्या घशाखाली घास नाही उतरला. २ घास चिवडून उठले पानावरून.

असं नसतं सोनी. घर म्हटलं की प्रत्येकाचं मन, मत विचारात घ्यावं लागतं. आपल्यासाठी कोण काय करतंय ते लक्षात ठेवून आपली पाळी आली की आपणही कुणासाठी काही करावं-सोडावं लागतं.


शहाणी आहे माझी बाळ, झोप आता. उद्यापासून शाळेत जा, रोजचा दिनक्रम सुरू कर. अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये.”


तिला झोपवून, अंगावर पांघरूण घालून आई दार ओढून घेऊन गेली.


कुमुद आईच्या बोलण्याचा विचार करत राहिली. कितीतरी प्रसंग आठवले तिला, बाबांनी आणि आजीने तिचा हट्ट पुरवल्याचे. बुद्धीला पटत होतं आईचं बोलणं, पण मन मानत नव्हतं.


रात्री बराच वेळ कुमुदला झोप आली नाही. आईच्या बोलण्यावरून ती समजून चुकली, नृत्यातला ‘न’ सुद्धा विसरावा लागणार आहे आता.


तिचा दिनक्रम हळू हळू ठिकाणावर आला. एक नाचाचा क्लास सोडला तर काहीच बदललं नव्हतं. पण जे बदललं होतं ते तिला स्वीकारता येत नव्हतं. आई, बाबा, आजी तिला नेहमीसारखं वागवत होते. संशय घेत नव्हते, पाळत ठेवत नव्हते. त्यांचा विश्वास होता लेकीवर. आपली लेक रडेल, चिडेल पण खोटं वागणार नाही. लबाडी करणार नाही.


मनाला आवरायला वेळ लागला, पण कुमुदने अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिलं. पुढच्या वर्षी उत्तम मार्क मिळवून S.S.C. पास झाली.

“काय मग कुमाताई, उत्तम मार्क मिळालेत. डॉक्टर होणार ना?”

या प्रश्नावर ती घुटमळली. पण मनाचा हिय्या करून म्हणाली,

“बाबा, मला भाषा आवडतात. मी बी.ए. करू का? इंग्लिश घेऊन?”

“हो, कर की. शिक्षणाने यायची ती प्रगल्भता बी.ए. होऊन सुद्धा येईलच की. डॉक्टर होऊनच येईल असं नाही.”


कुमुदचं आर्टस् कॉलेज सुरू झालं. वार्षिक स्नेहसंमेलनात तिने नृत्य सादर करावं यासाठी कॉलेजमध्ये तिला खूप आग्रह झाला. पण निग्रहाने तिने नाही म्हटलं. यथावकाश ती उत्तम मार्कांनी पदवीधरही झाली. आणि तिने बाबांना सांगितलं, “बाबा, मला वकील व्हायचंय.”

“हे काय आता? मला वाटलं भाषा घेऊनच पुढे शिकशील.”

“नाही बाबा, तुमच्यावर आलेला अफरातफरीचा आळ, झालेली फरफट मी पाहिली आहे. देशमाने काकांनी किती मोठा झगडा दिलाय तुमच्यासाठी तेही मी पाहिलंय. मला वकीलच व्हायचंय.”

मग तिने तो अभ्यासही उत्तम केला.

वकील होता होता चालून आलेल्या उत्तम स्थळाला होकार गेला आणि कुमुद सौ. कमलिनी झाली.

घरचा एक कारखाना असतांना तिच्या नवऱ्याने स्वतःचा नवा उद्योग सुरू केला होता. त्याच्या बरोबरीने उभी राहिली कमलिनी. जोडीने वकिलीत जम बसत होता. यश, प्रतिष्ठा मिळत होती. मुलं थोडी मोठी झाल्यावर घरून पाठिंबा मिळाला आणि ती पुढच्या परीक्षा देऊन न्यायाधीशपदाच्या लायक झाली. तिला तोही सन्मान मिळाला.


पद, प्रतिष्ठा, यश असं व्यावसायिक यश आणि कर्तृत्ववान जोडीदार, समंजस सासर, गुणी मुलं कौटुंबिक यश - दोन्ही बाजुने भरभरून मिळालं. 


सुनेने आठवणींचा विषय काढल्यावर सगळ्या आठवणी मनाचा तळ सोडून वर आल्या. विसरल्या गेल्या नव्हत्याच, पण अशी खोल बुडी नव्हती मारली गेली  आठवणींच्या तळ्यात.

कुणाच्या तरी चाहुलीने चपापल्या कमलिनीबाई.

सुनबाई खोलीत आल्या,

“हे काय, अशा अंधारात का बसल्या आहात? आज बाहेर नाही गेलात?”

“नाही, आज कंटाळा आला. तू काल आठवणी म्हणालीस ना, पार बालपणात फिरून आले.”

“मग त्या आठवणी लिहा. तेही आवडेल सगळ्यांना.”


लिहून होईल तेव्हा होईल, पण तूर्त मनाला एक वेगळा खेळ तर मिळाला, या विचाराने कमलिनीबाई स्वतःशी अस्फुट हसल्या.


रात्री झोपायला श्रीधरराव खोलीत आले, तर त्या बाहेर झोपाळ्याच्या खुर्चीत बसल्या होत्या.

समोर खुर्चीत बसत ते म्हणाले, “काय झालं गं, आज जरा गप्प आहेस. रोजच्यासारखी बोलत नाहीस. सुनबाईंनी २ वेळा विचारलं तुला.”

“विशेष नाही हो काही. सहजच. जरा शांत बसावं वाटलं दुपारी. म्हणून खोलीतच बसले होते. बाहेर आलेच नाही म्हणून तिने विचारलं, इतकंच.”

जुजबी बोलून ते खोलीत जाऊन काही कामात गढून गेले.


कमलिनीबाई पुन्हा त्या आठवणींशी खेळत राहिल्या.

नकळत एक विषाद भरला मनात.

“किती रडले मी, पण बाबांनी नाहीच परवानगी दिली शेवटपर्यंत. फारच कठोर वागले बाबा माझ्याशी.”

या विचाराशी अडखळल्या आणि त्यांचा स्वतःशी संवाद सुरू झाला.

“खरंच असं वाटतं तुला? नाच बंद केला, इतकंच लक्षात ठेवलंस, बाकी सगळं विसरलीस. न्यायाधीश झालीस, पण दोन्ही बाजुंचा विचार स्वतःच्या बाबतीत नाही करत आहेस.


म्हणजे?


म्हणजे तुला इतर कोणत्याही बाबतीत कधीही अटकाव नाही केला त्यांनी.

एक नाचाची हौस मागे सारावी लागली तर आजपर्यंत ते दुःख कुरवाळते आहेस.


कुरवाळते आहे?


मग काय करते आहेस?

वासंती किती गोड गायची, पण बाळासाठी अंगाई आणि सासूबाईंना भजन ऐकवणं इथेच थांबलं तिचं गाणं.

शकुची चित्रकला तुळशीसमोर रांगोळी रेखण्यापुरती राहिली.

मालुचं शिवण घरातल्या किरकोळ शिवणावर येऊन संपलं.

आज त्या काय करतायत आणि तू कुठे पोचली आहेस!

मनाजोगं शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य तुला मिळालं, मनापासून आवडलेला जीवनसाथी लाभला, प्रगतीच्या वाटेवर सोबत करणारं सासर मिळालं.

किती जणींना मिळालं हे?

आणि हौस, चैन सोड, प्राथमिक गरजासुद्धा पूर्ण होऊ न शकणाऱ्या किती जणी आहेत, ते माहीत नाही तुला?

मन मारून नको असलेला संसार ओढणाऱ्या बायका तुला कधीच दिसल्या नाहीत?


आपापलं नशीब असतं. त्यांना नाही मिळालं, म्हणून मी सुद्धा ...


असं? जे लाभलं त्याबद्दल समाधान नाही. जे हुकलं त्याचंच दुःख करत राहायचंय तुला?

बाबांनी, आजीने केलेलं प्रेम, रुजवलेले संस्कार-बऱ्या वाईटाचं भान सगळं क्षुल्लक आणि तुला नाच सुरू ठेवायला केलेली बंदी तेवढी महत्त्वाची.

असंच ना?

हेच न्यायदान केलंस का आजपर्यंत?


तसं नाही ....


मग कसं? आठवणी लिहा म्हटलं सुनेने, तर तुला नेमकं हेच आठवतंय दुपारपासून. मी कसं मन मारलं, माझ्यावर कसा बाबांनी अन्याय केला.

असं कोण आहे जगात ज्याची कोणतीही इच्छा अपुरी राहिली नाही? तुझ्या आसपास आहे?

माहीत आहे तुला असं माणूस?

स्वप्न बघणं, त्यासाठी धडपडणं माणसाच्या हातात. पण नाही पुरं झालं स्वप्न तर आलेली निराशा अशी आयुष्यभर मनाशी बाळगण्याइतकं वाईट आहे तुझं आयुष्य? हुरहूर राहते, पण मग आपणच समजूत घालावी मनाची की ठीक आहे. पाहिलेलं स्वप्न नाही पुरं झालं पण स्वप्नातही कल्पना केली नव्हती असं किती, काय-काय मिळालं आणि अगदी भरभरून.

म्हणजे इथे कमी पडलेलं, तिथे दामदुपटीने मिळालंय. त्याचं काही महत्त्व नाही तुझ्या आयुष्यात?”


किती वेळ त्या स्वतःशी भांडत, वाद घालत राहिल्या. तिथेच डोळा लागला त्यांचा. उशीरा केव्हातरी श्रीधररावांनी उठवून हाताला धरून पलंगावर नेऊन झोपवलं.


सकाळी रोजच्या वेळी जाग आली आणि खिडकीतून तेजीनिधीची चाहूल लागलेलं आकाश दिसलं. सवयीने त्यांनी हात जोडले. मन स्वच्छ, मोकळं झालं होतं. आत खोलपर्यंत पाहिलं तर कुठेही साधा तरंग सुद्धा नव्हता. भूतकाळाचं निवळशंख अस्तित्व जाणवलं त्यांना.


नाश्त्याच्या वेळी त्या सुनेला म्हणाल्या,

“आजपासून करते सुरुवात लिहायला. आठवेल तसं लिहिते आधी. नंतर मग सुसंगत संकलन करू. तू करशील ना मदत?”

सुनेने खुशीने होकार दिला.


निवृत्त आयुष्यात एक नवा दिवस नवा संकल्प घेऊन सुरू झाला. शांत चित्ताने त्या नित्य दिनक्रमाला सामोऱ्या गेल्या.


इति|


राधा मराठे


Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न