लिव्ह इन
#लिव्ह_इन पुढ्यातल्या प्लेटमध्ये १००ची नोट ठेवून उमेश पाठ वळवून बाहेर पडला आणि निघून गेला. समीरा थिजल्यासारखी बसून होती. आत्ता जे काही घडलं त्याने ती अक्षरशः अवाक् झाली होती. उमेश असं काही उत्तर देईल हे तिला पूर्ण अनपेक्षित होतं. तिच्यासारख्या स्मार्ट, करिअरस्ट मुलीने लग्नाला प्रपोज केलं तर कुणी तिला नाही म्हणणार‘च’ नाही याबद्दल तिची पक्की खातरी होती. आणि उमेश आत्ता स्वच्छ शब्दांत नकार देऊन गेला. तिला सगळं आठवत राहिलं. त्याच्या कंपनीने १०० कोटींचं कर्ज मागितलं होतं तिच्या बँकेकडे. १०० कोटी ही रक्कम तशी किरकोळच होती बँक आणि कंपनी दोघांसाठी, पण कंपनीचं नाव प्रतिष्ठित असल्यामुळे बँक जरा लक्ष देऊन व्यवहार करत होती. प्राथमिक बोलणी झाल्यावर, जरा वरच्या श्रेणीचे अधिकारी बँकेत आले. त्यात उमेश होता. तिचं लक्ष त्याने वेधून घेतलं. ‘मोस्ट एलीजिबल बॅचलर’ म्हणतात तसाच होता तो. कामानिमित्त बोलणं होत राहिलं आणि तो तिच्या मनात रुतत गेला. हळूहळू, बाजुबाजुने ती त्याची माहिती काढत राहिली. सधन, सुसंस्कृत कुटुंबातला, उच्चशिक्षित. वागण्या-बोलण्यातला सभ्यपणा तर ती बघत होतीच. बोलणी पुढे सरकली आणि मग...