स्वप्न
कमलिनीबाई न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्या त्याला आता २ महिने होत आले होते. सत्कार समारंभ, निरोप समारंभात हे दोन महिने कसे गेले ते त्यांना कळलंही नव्हतं. आता त्या जरा निवांत झाल्या होत्या. एक दिवस दुपारी काहीतरी चाळा म्हणून त्या डायरी घेऊन बसल्या. जुनं काही वाचलेलं आठवत होतं, त्यावर रसग्रहणात्मक टिप्पण्या, भाष्य असं काहीतरी लिहीत होत्या. ४ वाजता सून घरी आली. “काय, कसा गेला आजचा दिवस?” “गेला रोजच्यासारखाच.” असं म्हणून ती आत गेली. कपडे बदलून, हात-तोंड धुवून बाहेर आली तर कमलिनीबाई चहा गाळत होत्या. “हे काय तुम्ही का केलात? राही नाही आली?” “आली होती, पण तिच्या सासूबाईंना बरं नाही म्हणून तिची शेजारीण आली बोलवायला. जाऊन येते म्हणाली. येईल संध्याकाळपर्यंत.” “काय लिहीत होतात?” “असंच काहीतरी आठवत गेलं, लिहावंसं वाटलं. खास काही नाही.” “आई, त्या दिवशी ते चौधरी म्हणत होते काहीतरी कन्सल्टन्सीचं. तुम्ही का करत नाही? इतका अनुभव, अभ्यास. लोकाना फायदा होईल त्याचा. शिवाय आता तुम्ही सरकारी नोकर नाही म्हणजे कुणाला काही सल्ला द्यायला तसं काही बंधन नाही तुमच्यावर.” “हो, करेन विचार. पण ...