लिव्ह इन

 


पुढ्यातल्या प्लेटमध्ये १००ची नोट ठेवून उमेश पाठ वळवून बाहेर पडला आणि निघून गेला. समीरा थिजल्यासारखी बसून होती. आत्ता जे काही घडलं त्याने ती अक्षरशः अवाक् झाली होती. उमेश असं काही उत्तर देईल हे तिला पूर्ण अनपेक्षित होतं. तिच्यासारख्या स्मार्ट, करिअरस्ट मुलीने लग्नाला प्रपोज केलं तर कुणी तिला नाही म्हणणार‘च’ नाही याबद्दल तिची पक्की खातरी होती. आणि उमेश आत्ता स्वच्छ शब्दांत नकार देऊन गेला.


तिला सगळं आठवत राहिलं.

त्याच्या कंपनीने १०० कोटींचं कर्ज मागितलं होतं तिच्या बँकेकडे. १०० कोटी ही रक्कम तशी किरकोळच होती बँक आणि कंपनी दोघांसाठी, पण कंपनीचं नाव प्रतिष्ठित असल्यामुळे बँक जरा लक्ष देऊन व्यवहार करत होती.


प्राथमिक बोलणी झाल्यावर, जरा वरच्या श्रेणीचे अधिकारी बँकेत आले. त्यात उमेश होता. तिचं लक्ष त्याने वेधून घेतलं. ‘मोस्ट एलीजिबल बॅचलर’ म्हणतात तसाच होता तो. कामानिमित्त बोलणं होत राहिलं आणि तो तिच्या मनात रुतत गेला. हळूहळू, बाजुबाजुने ती त्याची माहिती काढत राहिली. सधन, सुसंस्कृत कुटुंबातला, उच्चशिक्षित. वागण्या-बोलण्यातला सभ्यपणा तर ती बघत होतीच.


बोलणी पुढे सरकली आणि मग आणखी वरच्या श्रेणीचे अधिकारी यायला लागले, तसं त्याचं येणं बंद झालं. ती अस्वस्थ झाली. आता तो भेटण्याचं काही कारण उरलं नव्हतं.


मग न राहवून एक दिवस तिने थेट त्याला फोन केला. कॉफीला बोलावलं. थोडं जनरल बोलल्यावर तिने थेट विषयाला हात घातला आणि त्याला लग्नासाठी प्रपोज केलं. त्याला बहुतेक अपेक्षित होतं ते.

“तुझ्याबद्दल सांग सविस्तर.”

तिने सांगितलं. कुटुंब, शिक्षण, बँकेतला अनुभव. आणि थांबून म्हणाली, “माझे ३ ब्रेक अप झाले आहेत.”

“??”

“तीन जणांबरोबर माझी लिव्ह इन रिलेशनशिप होती. पण ते नाही वर्क आऊट झालं. यावेळी मी थेट लग्नाचाच विचार करते आहे. नव्याने काही गुंतागुंत नकोय आता. सरळ लग्न करून ४ जणांसारखा संसार करावा हे बरं.”

तो थोडा वेळ गप्प बसला.

मग कुठे कसं जमलं, ब्रेकअप का आणि कुणी केला, घरच्यांची काय प्रतिक्रिया, वगैरे प्रश्न त्याने विचारले आणि तिने मोकळी उत्तरं दिली.

त्याने आणखी काही तपशील विचारले.

५ मिनिटं शांत बसून म्हणाला, “विचार करून कळवतो १-२ दिवसांत.”

इथे तिला पहिला धक्का बसला होता. तिच्या प्रपोजलवर विचार? थेट होकार आणि साखरपुडा वगैरे..... अशी अपेक्षा होती तिची. स्वतःबद्दलच्या तिच्या कल्पनांचा डोलारा किंचित हलला. पण “आयुष्याचा निर्णय आहे, विचार तर करेलच माणूस. घरी पण सांगेल.” अशी स्वतःची समजूत घालून ती शांत राहिली.


३-४ दिवस झाले आणि आज सकाळी फोन करून त्याने तिला संध्याकाळी भेटायला बोलावलं. ती विशेष तयार होऊन आली. २ मिनिटं शांत बसून त्याने बोलायला सुरुवात केली.

“आपलं जमेल असं नाही वाटत मला. लग्नाबद्दलच्या माझ्या कल्पना, अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. कदाचित आऊटडेटेड वाटतील तुला. पण... जे आहे ते आहे.”

ती काही बोलणार होती, पण त्याने तिला थांबवलं.

“लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकारच मला फारसा पटत नाही. लग्नामुळे मिळणारी सगळी सुखं, फायदे फक्त हवेत आणि जबाबदाऱ्या, कर्तव्य यांच्याकडे पाठ फिरवायची असा मतलबी प्रकार वाटतो. तू ३ वेळा हा प्रयत्न केलास. ब्रेकअप तुझ्या पार्टनरकडून झाला. यात वरकरणी तुझी काही चूक दिसत नसली तरी तुझ्याशी जमवून घेणं कठीण गेलं किंवा त्याची फारशी गरज वाटली नाही असा अर्थ मी काढला. तो चूक असेलही, पण मला वाटलं तसं. म्हणजे तू दुरावशील याने काहीही फरक नाही पडला तिघांपैकी एकालाही. तू सांभाळून घ्यायचा प्रयत्न केलास असंही नाही जाणवलं मला तुझ्या बोलण्यातून. त्यांनी निर्णय घेतला, तू मान्य केलास. अर्थात लिव्ह इन मध्ये तो मुख्य भाग असतोच, की बांधिलकी नको.

वयाच्या ३०व्या वर्षापर्यंत ३ ब्रेक अप. म्हणजे फार तरुण वयात हा वेगळा निर्णय तू घेतलायस; मुळात स्थैर्य हा तुला महत्त्वाचा मुद्दा वाटतच नसावा. आजचा दिवस आपला, इतकंच.


प्रत्येक ब्रेकअपनंतर तू घरी परत आलीस. जातांना त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय घेऊन गेलीस आणि गरज पडल्यावर तिथेच परत. म्हणजे जणू काही तुझ्या हक्काचा बफर. त्यांच्या राजी-नाराजीशी तुला काही घेणं नाही. तुला परत घरात घेणं हे त्यांचं कर्तव्य, पण निर्णय घेतांना त्यांचा विचार करणं तुला महत्त्वाचं वाटलं नाही. स्वतःच्या कुटुंबाबद्दल, रक्ताच्या नात्याच्या माणसांबद्दल इतका कोरडा, व्यवहारी दृष्टिकोन! मग जोडलेल्या नात्यांतून तू निर्लेपपणे बाहेर पडलीस यात काही फारसं नवल नाही.


आयुष्याचा जोडीदार असा चपला, कपडे, इतर वस्तू जुन्या टाकून नव्या आणाव्या इतक्या किरकोळीने निवडणं हे मला मुळीच पटलं नाही. काही दुर्दैवाला सामोरं जावं लागलेल्या मुली किमान अगतिक असतात. पण तुझ्या बाबतीत तू अगतिक होतीस असं काही मला दिसत नाही. असे एकाहून अधिक जणांशी संबंध असलेली मुलगी मला आयुष्याची जोडीदार म्हणून कधीही पटणार नाही. 


इथेच थांब. पुन्हा माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू नको. तुझा नंबर मी डिलीट केलाय, ब्लॉक करायची वेळ आणू नको अशी विनंती. शुभेच्छा!”


असं म्हणून पुढ्यातल्या प्लेटमध्ये १००ची नोट ठेवून उमेश पाठ वळवून बाहेर पडला आणि निघून गेला.


आजच्या तथाकथित ‘मॉड’, फास्ट जगात ‘असा’ विचार करणारे तरुणही आहेत हे नवंच सत्य तिच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचायला लागलं.


राधा मराठे 

८.९.२०२५

Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न