व्रतस्थ

 इनामदारांचा बंगला रोषणाईने नुसता झगमगत होता. पाचशे बंगल्यांच्या त्या कॉलनीत ज्याच्या त्याच्या तोंडी या रोषणाईचाच विषय होता. त्यांच्या एकुलत्या एका नातवाची-राजीवची मुंज दोन दिवसांवर आली होती. बंगल्याच्या आवारात दिमाखदार मांडव घातला होता. पाहुण्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. कॅटरर, मांडववाले, इतर सेवा पुरवणारे सगळ्यांची ये-जा सुरू होती. इनामदारांचे विश्वासू कारकून, कर्मचारी जातीने सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवत होते. सोनार, नामांकित विणकर आपल्याजवळचे खास राखीव नग घेऊन बंगल्यावर खेटे घालत होते. विचारपूर्वक, चोखंदळपणे खरेदी होत होती.

 

या सगळ्यात मुंज मुलाची आई, इनामदारांची सून-अरूंधती मात्र अलिप्त होती. राजीवचे बाबा-श्रीरंगही गप्प होता. त्याची आई, आत्या आणि वडील जे ठरवत होते, ते मुकाट्याने मान्य करत होता. अरुंधतीचा अलिप्तपणा त्याला काट्यासारखा टोचत होता, पण तो हतबल होता. तिला काही सांगू शकत नव्हता. मुंजीचे देवक ठेवण्याचे ठरवून गेले गुरुजी आणि श्रीरंगच्या आई उंची पैठणी आणि दागिन्यांची पेटी घेऊन श्रीरंगच्या खोलीत आल्या.

 

सूनबाई, ही पैठणी आणि हे दागिने ऊद्या घालायचे आहेत देवक ठेवतांना.त्यांच्या आवाजात जरब होती. पण अरूंधती जराही विचलीत झाली नाही. तिने शांतपणे, एक शब्दही न बोलता ते बोचकं उचलून परत त्यांच्या हातात दिलं. त्यांचा चेहरा संतापाने वाकडा झाला. अजून ताठा गेला नाही तुझा? मुकाट मी सांगते ते ऐक. श्रीरंग, तू कसा काही बोलत नाहील तिला? तुला चालतं कसं हे असं दरिद्री राहणं?”

आई, मी तुला किती वेळा सांगितलंय, मला यात ओढू नको. तुम्ही काय ते सोडवा. मी तिला काहीही म्हणणार नाही.

संतापाने फणफणत त्या निघून गेल्या. पाच मिनिटांनी श्रीरंगचे आबा स्वत: आले वर. श्रीरंग आणि अरुंधती एकदम चमकले. ते सहसा कधी वर येत नसत. डोळे पुसून अरुंधती खाली मान घालून अदबीने उभी राहिली. ते सोफ्यावर टेकले. किंचित खाकरून घसा साफ केला. सूनबाई, गेली १० वर्षं तुम्ही साधी पातळं नेसता, मंगळसूत्र आणि माहेरच्या बांगड्यांखेरीज दागिना अंगाला लावत नाही. अगदी दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी सुद्धा तुम्ही अशाच राहता. आम्ही कधी काही बोललो नाही. राजीवच्या आजीने कितीही तक्रारी केल्या तरी आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता आपल्या राजीवची मुंज आहे, लेकाच्या मुंजीत लक्ष्मीसारखं मिरवावं असं नाही का वाटत तुम्हाला? घरची लक्ष्मी अशी लंकेची पार्वती होऊन राहिली तर आम्हाला तरी बरं वाटेल का सांगा बरं. आम्ही नेहमीच तुमच्या सूनपणाचा मान ठेवला आहे. तुमचा कमीपणा होईल असं कधी वागलो नाही. श्रीरंगच्या आईची कुचंबणाही तुम्ही लक्षात घ्या. त्यांनाही आवडत नाही हे, पण घरची कर्ती स्त्री म्हणून काही बंधनं पाळावी लागतात त्यांना.अरुंधतीचं मौन त्यांना ऐकू आलं. त्यातला भावही कळला. हताशपणे ते निघून गेले.

श्रीरंग अरुंधतीजवळ गेला. तिच्या खांद्याभोवती हात वेढून म्हणाला, मी समजू शकतो तुझी वेदना. मी कधी काही म्हटलंय का तुला? पण अरु, कधी नव्हे ते आबा आज तुला काहीतरी सांगायला आले, त्यांचा शब्द तरी मान ना. त्यांच्यासाठी, माझ्यासाठी. न बोलता अरुंधती त्याच्या खांद्यावर डोकं टेकून उभी राहिली. तिच्या अश्रूंनी त्याचा खांदा भिजला. तिला अलगद पलंगावर निजवून झोप लागेपर्यंत तो तिला थोपटत राहिला. दहा वर्षांपूर्वीच्या त्या घटना त्याच्या डोळ्यासमोर आत्ता घडाव्यात तशा उभ्या राहिल्या.

 

त्याच्या आत्याची इच्छा होती की तिची पुतणी श्रीरंगाला करून घ्यावी. पत्रिका जुळल्या होत्या, पण श्रीरंगाला त्याच्या मित्राची बहीण अरुंधती आवडली होती. त्यांच्याइतके तालेवार नसले तरी तिचे बाबा मोठे सरकारी अधिकारी होते. अरुंधती कुणालाही आवडेल अशीच होती. ऋजु बोलणं, संस्कारी वागणं. श्रीरंगाच्या आई-वडिलांनी कसलीही खळखळ न करता पत्रिका जुळतायत हे कळल्यावर तिला सून करून घ्यायला मान्यता दिली होती. आत्याने केलेल्या त्राग्याकडे, थयथयाटाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. कार्य अगदी झोकात पार पडलं. अरुंघतीच्या आईबाबांनी यथायोग्य मानपान केले सगळ्यांचे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कुलाचार पार पडल्यावर दुपारी अरुंधतीने सगळे दागिने काढून सासूबाईंजवळ दिले. ते आत्याबाईंनी तिच्यासमोरच नीट मोजून घेतले. अगं बाई, वहिनी, ती हिऱ्याची अंगठी नाही दिसत कुठे यात?” अंगठीची शोधाशोध सुरू झाली. आणि आत्याबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तरी सांगत होते, दरिद्री घऱची मुलगी करू नका. पण आमचं ऐकतंय कोण? नेली असेल तिच्या आईने नाहीतर धाकट्या बहिणीने. त्यांना काय ......थांबायचं नाव घेत नव्हत्या त्या. बंगल्यातली नोकरमाणसं दाराआड उभी राहून ऐकत होती, एकमेकांना खुणा करत होती. अरुंधती तर इतकी भेदरली होती की धरणी पोटात घेईल तर बरंअसं झालं तिला. आपल्या माणसांवर इतका घाणेरडा संशय घेतलेला ऐकून एकीकडे संताप येत होता आणि एकीकडे अंगठी कुठे ठेवली ते आठवत नव्हतं. तासभर तमाशा चालू होता. अखेर आबांनी आवाज चढवला आणि आत्याबाईंचं तोंड बंद झालं. जरा वेळाने सासूबाई पुजेची उपकरणं आवरायला गेल्या तो आरतीच्या तबकात अंगठी दिसली. त्यांना नवल वाटलं. चार वेळा त्या स्वत: देवघरात डोकावून गेल्या होत्या. अंगठी दिसली कशी नाही? पुन्हा आत्याबाईंना जोर चढला. बघितलीत हुशारी? तिनेच ठेवली असेल लपवून आणि चोरी पकडली गेली म्हटल्यावर गुपचूप आणुन ठेवली असेल..... श्रीरंगला हे सगळं कळलं तेव्हा तो अरुंधतीला इतकंच म्हणाला, माझा आत्यावर मुळीच विश्वास नाही. तू शांत रहा.पण तरी अरुंधती चोरासारखी माजघराच्या कोपऱ्यात उभी राहिली.  

 

आता धीर करून दिगंबरअण्णा पुढे झाले. ते गेली पन्नास वर्षं काम करत होते इनामदारांकडे. मान कापली तरी बेईमान होणारा माणूस नव्हता तो. हात जोडून ते आबांसमोर उभे राहिले. मालक, लहान तोडी मोठा घास घेतोय, वाटलं तर हाकलून द्या. पण धाकट्या मालकीणबाईंवर आळ घेऊ नका. त्यांनी थोरल्या मालकीणबाईंना दागिन्यांची पेटी दिली तेव्हा त्यातून अंगठी काढून घेतांना मी आत्याबाईंना पाहिलं होतं. मी लक्ष ठेवलं. नंतर त्यांनीच देवघरात जाऊन आरतीच्या तबकात अंगठी ठेवली हेही मी पाहिलं. त्यांची पुतणी करून घेतली नाही म्हणून....

 

आबांचा चेहरा काळा ठिक्कर पडला. आपली तालेवार बहीण केवळ आपल्या सुनेला चोर ठरवण्यासाठी असलं नीच कृत्य करेल हे त्यांना अनपेक्षित होतं. आत्याबाईंनी गळा काढला. डोकं आपटून घ्यायला लागल्या. श्रीरंग पुढे होऊन काही बोलणार तो त्याच्या आईने त्याला थोपवला. न बोलता ओटीचं सामान आणलं, नणंदेची ओटी भरली आणि कारकुनाला त्यांना घरी पोचवून यायला सांगितलं. त्यांच्या मते त्यांनी प्रकरण मिटवलं होतं. पण अरुंधती धुमसत राहिली. तिच्या आणि तिच्या माहेरच्या माणसांच्या झालेल्या अपमानाबद्दल कुणी चकार शब्दाने बोललं नाही. श्रीरंगाने वारंवार तिची आणि तिच्या आईवडिलांची माफी मागितली, पण अरुंधती शांत होईना. तिने आपल्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला. माहेरून घातलेल्या चार सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र याखेरीज कोणता दागिना तिने अंगाला लावला नाही. भारी, भारी साड्या कपाटात पडून होत्या, पण श्रीरंगने तिच्या पसंतीने घेतलेल्या साड्याच ती नेसत होती. भारी साड्या, दागिने माझ्या दृष्टीने कवडीमोलाचे आहेत हे दाखवत होती. श्रीरंगच्या आईले खूप त्रागा केला, पहिल्या दिवाळीला सुद्धा ती त्यांच्या त्राग्याला बधली नाही. राजीव आणि सायलीच्या बारशाला तर आलेल्या बायका तोंडावर म्हणाल्या, हे काय, इमानदारांची सून अशी लंकेची पार्वती?” पण तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तिने कधी याची वाच्यता केली नाही, घरात सहज वावरत राहिली. तिचं हे असं निरलंकृत राहणं हळूहळू सगळ्यांना सवयीचं झालं. पण श्रीरंगाचे आई-आबा खंतावत राहिले. आणि आता नातवाच्या मुंजीतही ती अशीच वावरणार या कल्पनेने ते पुरते खचले होते.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे आई-बाबा आलेले पाहून ती चकित झाली. चहा बाहेर पाठवून ती कामात गुंतून राहिली. पण बाहेर बोलावल्याचा सांगावा घेऊन नोकर आला, तेव्हा तिला जावं लागलं. बैठकीत आबा, सासूबाई, आत्याबाई सगळी हजर होती.

लग्नाच्या वेळी तुमच्या मुलीची माझ्या बहिणीकडून फार मोठी, अक्षम्य आगळीक झाली आहे. त्याची शिक्षा गेली दहा वर्षं आम्ही सोसतोच आहोत. पण आता नातवाच्या मुंजीत आमच्या घरची लक्ष्मी अशी अलंकारविहीन राहावी हे आम्हाला सोसणार नाही. आम्ही ऊभयता सर्वांसमक्ष आपल्या मुलीची आणि आपलीही क्षमा मागतो. आपण मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा आणि आपल्या मुलीला समजवा की आता राग सोड. मुंजीसाठी घेतलेली पैठणी आणि दागिने स्वीकार. खरी लक्ष्मी दिसू दे ती.

 

श्रीरंगचे आई-आबा हात जोडून उभे राहिलेले बघून अरुंधतीचे आई-बाबा एकदम गडबडले. आत्याबाई हबकल्या. अरुंधतीचे वडील झटकन पुढे आले. हे काय करता? ऐकेल ती तुमचं. मी शब्द देतो तुम्हाला.  आता आत्याबाईना पर्याय उरला नाही. क्षीण शब्दात त्या म्हणाल्या, चुकलंच माझं.

 

सासूबाईंनी पुढे केलेली पैठणी आणि दागिन्यांची पेटी अरुंधतीने घेतली आणि ती वर गेली. तयार होते तो श्रीरंग वर आला. त्याच्या कौतुकभरल्या डोळ्यात पडलेलं आपलं देखणं प्रतिबिंब पाहून ती हळूच हसली आणि जिन्याच्या पायऱ्या उतरायला लागली.

 

 

Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न