थोडं तुझं थोडं माझं
थोडं_तुझं_थोडं_माझं
रविवारची
आळसावलेली दुपार. चहा झाल्यानंतर संध्याकाळी काय करायचं, कुठे जायचं त्याचे बेत सुरु झाले.
अण्णांनी श्रीरामला हाक मारली. ''थोडं बोलायचंय रे, बाहेर या दोघं.'' श्रीराम आणि वैदेही बाहेर येऊन
समोर बसले. अण्णांच्या हातात एक पोस्टाचं पाकीट होतं. क्षणभर स्तब्ध राहून
अण्णांनी बोलायला सुरुवात केली.
''श्रीराम, तुझी आई तुझ्या वयाच्या १४व्या वर्षी गेली.
दुसरं लग्न करायचा माझा विचार होता, पण माझ्या वयाला शोभेशा वयाची आणि मुख्य म्हणजे आपलं गावाकडे राहणं स्वीकारणारी बायको मिळणं सोपं नव्हतं. ते राहून गेलं.
तुझ्याकडे पाहून आणि तुझ्यासाठी मी उरलेलं आयुष्य जगत आलो. तुझं शिक्षण तुझ्या मनाजोगं पूर्ण करू शकलो याचा मला आनंद
आहे. तुला मुंबईत काम मिळालं तेव्हा खरं
तर मी फारसा खुश नव्हतो. पण
तात्याच्या मुलांबरोबर तू तिथे राहिला असतास तर इतकी वर्षं आम्ही दोघांनी दूर ठेवलेली भाऊबंदकी आपल्या घराकडे फिरकली असती कदाचित,
म्हणून मी ते मान्य केलं. मग तुझा जम बसत गेला मुंबईत, लग्न झालं. मुंबईसारख्या शहरात भाड्याने घर घेऊन राहणं फारसं सोयीस्कर
नाही हेही मला कळलं. स्वत:च्या वडिलोपार्जित घरात सुरक्षित आयुष्य मी जगलो, तसं ते माझ्या मुलालाही मिळावं म्हणून वाटणीचा तुझा प्रस्ताव मी मानला आणि तात्याकडून वाटणी घेऊन ती तुझ्या स्वाधीन
केली. भरीला थोडंसं कर्ज घेऊन हे घर तू घेतलंस. कर्ज तुझ्या नावावर म्हणून घर
तुझ्या नावावर हा व्यवहार मला पटला. गावाकडे घर-शेत सगळ्यात वाटणी घेतल्यामुळे मी तिथे न राहता इथे येऊन राहायचं हे ओघानेच आलं. आता
या वयात मुंबईत येऊन राहायची तडजोड मी तुमच्यासाठी स्वीकारली. आपल्या मुला-सुनेबरोबर राहणं यात मलाही आनंद,
समाधान होतंच.
गावच्या
आणि मुंबईच्या राहणीत आणि रोजच्या आयुष्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, हे तर
सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण निग्रहाने मी तो फरक अंगवळणी
पाडून घेतला. पण आता माझी स्वीकारशक्ती आणि सहनशक्ती थकल्येय. रोजच्या लोकल
प्रवासाला सोयीस्कर म्हणून वैदेही साडीऐवजी पंजाबी पोशाख वापरते, शर्ट-पँट घालते. पण अलीकडे तिची कपड्याची बचत फार वाढत चालली आहे. सोय आणि
fashionच्या नावाखाली तिचे कपडे अधिकाधिक टिचके आणि अंग
दाखवणारे होत चालल्येत. माझ्या नजरेला हे सोसत नाही.
नोकरीत दगदग होते म्हणून घरात सर्रास बाहेरचं अन्न येतंय. ताजं, गरम जेवण्याची माझी सवय मी सोडली तरी हे सतत बाहेरचं खाणं मला अलीकडे
पचत-सोसत नाही. लहान सहान भांडी सुध्दा मोलकरणीकडे घासायला फेकायची सवय तुम्हाला लागलीय. कधी काही अडचण आली तर तुमचा हात
चालणार कसा? वीज-पाण्याची उधळपट्टी, फोनचा
अतिवापर, टीव्ही-कॉम्प्युटरची गुलामी, बेलगाम
अनावश्यक खरेदी, सुट्टीच्या दिवशी केलेला अति-आळस हे सगळं माझ्या अंगावर यायला लागलंय श्रीराम. रोज पहाटे ५ वाजता उठणाऱ्याला सुट्टीच्या दिवशी उशिरा उठण्याचं कौतूक. तुम्ही रोज
साडेसातशिवाय डोळे उघडत नाही, तरी सुट्टीच्या दिवशी दहा दहा
वाजेपर्यंत लोळत राहता. मग आठवड्याची साचलेली कामं उरकतांना दमछाक होणारच. आधुनिक
राहणीच्या सोसापायी संडास उशाशी आणून ठेवलाय आणि बाहेरचं संडास-न्हाणीघर एकत्र केलंय. अंघोळ केली तरी
शुचिर्भूत झाल्यासारखं वाटतच नाही.
तुझा
तो स्मार्ट फोन, रोजचा पेपर तू खुशाल संडासात घेऊन जातोस. पेपर हातात धरायची इच्छा होत नाही
दिवसभरात. शाळेत शिकलेलं आरोग्य विज्ञान विसरणं म्हणजे आधुनिकता? तुम्ही तरुण आहात, शहरात राहता, तुमच्या गरजा-सोयी वेगळ्या असणार हे कितीही मनाला समजावलं तरी काही गोष्टी
माझ्या आकलनापलीकडे आहेत. बायकांच्या शिक्षण, अर्थार्जन-स्वावलंबन
या मुलभूत गरजा समाजाने मान्य केलेल्याच आहेत. सगळ्या समाज सुधारकांनी समाजाच्या
डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना शहाणं केलंच आहे, पण
चैनीचा-उपभोगाचा अतिरेकी सोस मला कळत नाहीये. तुम्हाला
हे सगळं स्वाभाविक वाटत असेल पण मी ज्या वातावरणात आणि संस्कारात वाढलोय त्यात हे
कुठेही बसत नाही. पुढची पिढी नेहमीच आधुनिक विचार करणार हे गृहीत धरलं तरी
अनिर्बंध वागणं म्हणजे आधुनिकता ही तुमची व्याख्या माझ्या पचनी पडत नाही. तुमचं
वागणं तुम्हाला स्वाभाविक आणि रास्त वाटतं त्यामुळे मी केलेल्या तडजोडी तुमच्या
लक्षात येत नाहीत. एका विनोदी लेखकाला त्याच्या एका टीकाकाराने म्हटलं तुम्ही फार 'बिलो द बेल्ट' लिहिता. त्यावर तो लेखक उत्तरला छे:
छे:, तुमच्यासारखे काही लोक आपला बेल्ट वर बांधतात. तसं
होतंय आपलं. मला जे अतिरेकी वाटतंय ते तुम्हाला आवश्यक आणि स्वाभाविक वाटतंय. फरक
दृष्टीकोनात आहे. तो राहणार.
म्हणून
पूर्ण विचार करून मी निर्णय घेतलाय. मी गावी परत जातोय. तात्याला मी पत्र लिहिलं
होतं. मुंबईची हवा सोसत नाही, गावी परत येतोय म्हणून. माझ्या सरकारी नोकरीचे फंडाचे पैसे माझ्याजवळ
आहेत. तात्याला माझ्या जेवण-खाणाचा खर्च मी देईन. घरातली पडवीतली खोली तो मला
वापरायला देईल. जेवण-खाण त्याच्याकडे, एरवी आम्ही आपापले स्वतंत्र. त्याचं काल पत्र आलंय, केव्हाही
ये. घर तुझंच आहे. मी एक-दोन दिवसात इथलं सामान आवरून गावी परत जातोय.''
अण्णा
बोलायचे थांबले. घरात शांतता पसरली. श्रीराम आणि वैदेही उठून गेले. रात्री दोघं
लवकरच घरी आली. वैदेहीने वरणभात केला. जेवणं झाल्यावर श्रीराम अण्णांच्या पुढ्यात
येऊन बसला. वैदेही पण आली. किंचित घुटमळून श्रीरामने बोलायला सुरुवात केली. ''अण्णा, तुम्ही
जे सांगितलंत त्यावर आम्ही चर्चा केली. आमच्या लक्षात आलीय तुमची घुसमट. आमच्यासाठी तुम्ही तुमचं हक्काचं घर विकलंत, शक्य त्या नव्या गोष्टी स्वीकारल्यात. तुमच्या
पिढीच्या कल्पना आणि अपेक्षा वेगळ्या असणारच. तुम्ही तुमच्या बाजूने थोडी तडजोड
केलीय, तशी ती आम्हालाही करायला हवी. आम्ही बदलायचा प्रयत्न करू अण्णा, पण आम्हाला थोडा वेळ द्या.
वैदेही आता अंग दिसेल, तुम्हाला असभ्य वाटतील असे कपडे घालणार नाही. घर बदलणं शक्य नाही, पण
थोडेसे बदल करून तुम्हाला सोयीस्कर आणि सुखकर रचना करता येईल आपल्याला. मी
वैदेहीला घरकामात थोडी मदत करत जाईन, म्हणजे एकटीची दगदग होऊन तिला घरात काम करायचा कंटाळा
येणार नाही. दूध, भाजी, बँक वगैरे कामं
तुम्ही आत्ताही करताच आहात. इतर महत्त्वाची कामं वेळच्या वेळी होण्यासाठी मी एक वेळापत्रक करून ठेवतो. त्यात काही
गफलत झाली तर तुम्ही मला आठवण करीत जा. बाकीच्या गोष्टी पण आम्ही लक्षात ठेवू आणि
स्वत:त बदल करायचा प्रयत्न नक्की करू. तुम्ही स्पष्ट बोललात ते बरं झालं. नाहीतर आम्हाला तरी कसं कळलं असतं, तुम्हाला कोणती गोष्ट टोचत्येय ते! घरात शांतता नांदावी, एकोपा राहावा यासाठी ज्येष्ठ पिढीने तरुण
वर्गाच्या अडचणींची दखल घेतली पाहिजे, त्यांना समजून घेऊन
सहकार्य केलं पाहिजे तशी तरुणाईने सुध्दा त्यांच्या
मतांची कदर केली पाहिजे, प्रसंगी ती नाही पटली तरी. कारण गरजेला
घरचीच माणसे धावून येतात, पैसे किंवा बाहेरची माणसे पुरेशी
नसतात हे दोन्ही पिढ्यांनी लक्षात घ्यायला हवं.''
कोणत्याही
घरात घडणारी ही कहाणी. काही दुर्दैवी घरात ती दुरावा आणते, दुफळी माजवते पण अण्णा आणि श्रीराम-वैदेहीच्या समंजसपणामुळे अण्णांच्या घरात मात्र ती सुफळ संपूर्ण झाली, तशी सगळ्यांच्या घरात होवो.
राधा मराठे
Comments
Post a Comment