करिअर


करीअर


प्राचार्य मॅडम निवृत्त झाल्या तेव्हा मोठ्या प्रमाणावर निरोप समारंभ झाले. एक संस्थेतर्फे, एक सहकाऱ्यांतर्फे, एक ऑफिस स्टाफ, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मंडळांतर्फे मिळून एक नुसती गर्दी उडाली होती. चढाओढ लागली होती त्यांचं गुणगान गाण्याची. त्यांनी सुरू केलेले नवनवे उपक्रम, त्यांच्या कारकिर्दीत कॉलेजला आंतरकॉलेज स्पर्धांत आणि वेगवेगळ्या परीक्षांत मिळालेलं यश, कॉलेजला मिळालेला राजकीय आश्रय आणि सरकारी मेहेरनजर. अगदी भारावून गेल्या त्या. इतकी वर्षं सर्वस्व झोकून देऊन काम केलं, त्याचं चीज झालं असं वाटत राहिलं त्यांना.


पुढचे दोन महिने सगळ्या कागदपत्रांची पूर्तता, नव्या प्राचार्यांना कामाची घडी बसवायला मदत यांत गेले आणि दोन महिन्यांनी त्या जरा मोकळ्या झाल्या. मिस्टर ४ वर्षांपूर्वीच निवृत्त झाले होते आणि एका कंपनीत अर्ध वेळ सल्लागार म्हणून नव्याने कामाला लागले होते. उरलेला वेळ ज्येष्ठ क्लब, पत्ते, गप्पा, मित्र मंडळी यात जात होता. त्यांनी छान बांधून घेतला होता आपला वेळ. एकुलती एक लेक आपल्या संसारात, भरल्या घरात, २ मुलांच्या मागे रमली होती. आपल्या मोठ्या घरात, एकत्र कुटुंबात तिने स्वत:ला नीट बसवलं होतं, स्वत:ची जागा निर्माण केली होती. आता मात्र मॅडम जरा एकट्या राहिल्या. पण इतक्या वर्षांच्या दगदग, धावपळीनंतर हा एकटेपणाही त्यांना जरा हवासा वाटला. बाईच्या मदतीने घरात थोडी नवी सजावट, वेगळी मांडणी. घर नवं वाटायला लागलं. मग त्यात त्या जरा रमल्या. पण लवकरच त्यांना त्याचाही कंटाळा यायला लागला. मिस्टर आपल्या दिनक्रमात रमलेले होते. मॅडमची अस्वस्थता त्यांना कळलीच नाही. तसं वळणच नव्हतं त्यांच्या मनाला. मॅडम सतत आपल्या कॉलेजच्या जगात इतक्या गुंग असायच्या, की घरात कुणी कुणाला फारसं छेडत नसे. जेवणाच्या वेळीच काय ती गाठभेट होई, बोलणं होई.


एक दिवस त्यांनी मुलीला फोन केला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अर्धा तास बोलल्या आणि मग मुलगी म्हणाली, “आई, मुलं शाळेतून यायची वेळ झालीय, मी नंतर करते फोन.मग हा एक रोजचाच कार्यक्रम झाला. फोनवर गप्पा व्हायला लागल्या. मग एक दिवस त्या सरळ मुलीच्या घरी जाऊन धडकल्या. तिला कमालीचं आश्चर्य वाटलं. आई अशी न कळवता कशी आली? नीट विचारून, वेळ घेऊन ठरवल्याशिवाय ती कधी कुणाकडे गेली नाही, घरी कधी असं अचानक कुणी आलेलं तिला आवडलं नाही. इतक्या वर्षात आपल्याकडे ती कधीच अशी न कळवता आलेली नाही. मुलं लहान होती तेव्हा सुद्धा नाही. आणि आज अचानक ...... पण हे विचार मागे सारून तिने आईचं स्वागत केलं. तिच्या सासुबाईंशी मॅडम बराच वेळ बोलत बसल्या होत्या. रात्री जेवतांना त्या अशा अचानक आल्या, त्याची चर्चा झालीच. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. ती जरा कानकोंडी झाली, पण सासूबाईंनी सावरून घेतलं. इतके दिवस काम करीत होत्या, वेळ कुठे असायचा? आता वेळ आहे म्हणून लेक-जावयाला आणि नातवंडांना भेटायला आल्या त्या.


पण हळूहळू हे नेहमी व्हायला लागलं. कधी फोन करून, कधी अचानक त्या लेकीकडे यायला लागल्या. कधी घरी कुणी नसायचं, त्या तासभर बसून जायच्या. कधी जे कुणी सापडेल त्याला पकडून बोलत राहायच्या. हळूहळू कुजबुज वाढली घरात. तिलाही हे विचित्र वाटत होतं. आईचे गप्पांचे विषय वेगळे असायचे. समोरच्याला त्यात काही स्वारस्य आहे-नाही हे न बघता वर्गात लेक्चर द्यावं तसं त्या एकट्याच बोलत सुटायच्या. ऐकणारा कंटाळून जायचा, उठून जायला संधी शोधायचा. त्यांना हे कळत नव्हतं की त्या कळून न कळल्यासारखं करत होत्या, त्यांनाच माहीत.


मुलं पण एकदा म्हणाली, “आई, टीचर आजी सारखी का येते आपल्याकडे?” आता मात्र ती याचा गंभीर विचार करायला लागली. आईचं विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत होतं. सासरचं घर अस्वस्थ होत होतं. आईशी बोलायला हवं हा विचार मनात घर करत होता. आणि तिला संधी मिळाली. मुलं शाळेच्या निवासी सहलीला गेली होती. ती संधी साधून ती सासुबाईंना सांगून दोन दिवसांसाठी आईकडे आली. मॅडम खूष झाल्या. किती बोलू, काय करू असं झालं त्यांना. दुसऱ्या दिवशी रात्री तिघं गप्पा मारत असतांना धीर करून ती म्हणाली, “आई, अलिकडे तू सारखी आमच्याकडे कशी काय येतेस? अशी कधी वागली नाहीत तू इतक्या वर्षात.मॅडम चमकल्या. त्यांना अनपेक्षित होता हा प्रश्न. आपण इतक्या वर्षात गेलो नाही, याचं तिला वाईट वाटत असेल आणि आता जातोय तर ती खूष असेल हे त्यांनी आपलं आपणच गृहीत धरलं होतं. गडबडीने म्हणाल्या, “अगं, म्हणजे असंच ....... आठवण येते गं, तुमची सगळ्यांची. वेळ असतो, मग येते. तुझ्या सासूबाई, जाऊ छान बोलतात. बरं वाटतं.पण जरा वेळाने ती धीर करून स्पष्ट बोलली. आई, हे असं सारखं येणं ...... मला जरा अवघड होतं. सगळी चर्चा करतात.......आता त्या जरा भावूक झाल्या. अगं, एकुलती एक लेक तू माझी. आता उतरत्या वयात तुझाच आधार गं आम्हाला. अजून आम्ही तसे धड-धाकट आहोत, पण उद्या काही झालं तर तुझ्याशिवाय कोण बघणार आमच्याकडे? आणि आयुष्यभर केलं की काम. आता जरा घरात मुला-बाळांत रमावंसं वाटतं गं.हेच आणि असंच त्या बोलत राहिल्या. तिला पुढे काही बोलता आलं नाही.


पण दुसऱ्या दिवशी दिवसभर काही ना काही कारण काढून त्या तिला हेच ऐकवत राहिल्या. तिचं एकुलती एक असणं, त्यांच्या म्हातारपणाचा आधार असणं, त्यांना दुसरं कुणी नाही, कुटुंब वगैरे. निरुपाय होऊन ती गप्प बसली आणि घरी आली. नकळत तिचं मन भूतकाळात घिरट्या घालायला लागलं.


ती ४-५ वर्षांची असतांना मॅडमना डॉक्टरेट मिळाली. म्हणजे नेमकं काय झालं ते तिला तेव्हा कळलं नव्हतं, पण आई खूप खूष आहे, सगळे लोक तिचं कौतुक करत आहेत म्हणजे काहीतरी छान झालंय एवढंच तिला कळलं. त्यानंतर आई कॉलेजात टीचरझाली. मग तिचा जास्तीत जास्त वेळ कॉलेजातच जायला लागला. घरी आजी असायची, तीच सगळं करायची. १४-१५ वर्षांची असतांना ती गेली देवाघरी. तोपर्यंत आई कॉलेजची प्राचार्यझाली होती आणि कॉलेजमध्ये जास्तच गुंतली होती. घराकडे लक्ष द्यायला फार फुरसत नव्हतीच तिला. तिचा पोस्ट-डॉक्टरल अभ्यास, लेखन, कॉलेजमधले उपक्रम यांत ती पुरती बुडून गेली होती. एकदा आई कुणाशी तरी बोलतांना तिच्या कानावर आलं. सासूबाई होत्या घरात आणि एकच मुलगी, म्हणून जमलं करिअरला आकार देणं. म्हणजे मी ठरवलंच होतं की एकच मूल बस. मुला-बाळांत वेळ घालवला की हातून काही होत नाही. मग आयुष्यभर चूल आणि मूल करत बसतात बायका. मी तशी नाही. माझी योग्यता मी जाणून आहे आणि तिचा पुरेपूर वापर कसा करायचा ते मला चांगलं माहीत आहे.....


कितीतरी दिवस तिच्या मनात ते घोळत राहिलं. बंगल्यांच्या त्या कॉलनीत शेजारी फारसे खेळगडी नव्हते म्हणून लहानपणी अनुभवलेला एकटेपणा, आजीच्या संगतीत घालवलेला वेळ, उत्तम मार्कांसाठी आईचा हट्ट, थोडी मोठी झाल्यावर क्लब, जिम, क्लास यात अडकवलेला वेळ आणि आजी गेल्यावर घरात सतत जाणवणारं रितेपण. आपल्याला एखादं भावंड असतं तर अशा एकट्या पडलो नसतो हा मनात सतत येणारा विचार आणि पाठोपाठ आठवायचं आईचं ते बोलणं..... आणि हळूहळू तिचा निश्चय होत गेला. आपण कायम घरात राहायचं. पदवी घेईपर्यंत तिचा निर्धार झाला होता की आपण नोकरी करायची नाही. तिच्या या जगावेगळ्या निर्णयाचा धक्का बसला सगळ्यांनाच. इतक्या हुशार आईची तितकीच हुशार, सतत फर्स्ट क्लास मिळवणारी मुलगी घरात राहणार? चूल आणि मूल? किती समजावलं, पण ती आपला हट्ट सोडायला तयार नव्हती. अखेर बाबांचा शब्द म्हणून ती पोस्ट ग्रॅज्युएशन करायला तयार झाली. या दोन वर्षात मॅडम जितक्या तिचं मन वळवायचा प्रयत्न करीत राहिल्या, तितकी ती आपल्या मतावर ठाम होत गेली. गृहिणी-आई हीच आपली करिअर. आईचं मुख्य प्राधान्य घराला, किंवा मला नाही, कायमच तिच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला होतं. त्यासाठी तिने मला एकटी ठेवलं. भावंड येऊ दिलं नाही. माझं लहानपण क्लबमध्ये खेळगडी जमवण्यात गेलं. घरात कुणी नव्हतं माझी गुपितं शेअर करायला, माझ्याबरोबर वेळ घालवायला, सणाचा आनंदही मला घरात कुणाबरोबर मोकळेपणी घेता आला नाही. मी सतत घराच्या बाहेर कुणाची तरी सोबत शोधत राहिले. मी असं करणार नाही. माझं पूर्ण प्राधान्य माझ्या घराला आणि माझ्या मुलांना असेल.

अखेर तिच्यापुढे त्यांनी हार पत्करली आणि चांगला नवरा शोधून तिचं लग्न करून दिलं. नशीब बलवत्तर निघालं. सासरची माणसं समजूतदार निघाली. तिला एकटी राहायची सवय आहे, इतक्या मोठ्या घरात ती बावरेल, इतकी माणसं भोवती वावरतांना बघून बिचकेल हे तिच्या सासुबाईंनी ओळखलं आणि खूप सांभाळून घेतलं. हळूहळू तीही सगळं शिकली. अगदी जिद्दीने. सासुबाईंचा उजवा हात झाली. धाकट्या दिराच्या लग्नात जवळ जवळ सगळी जबाबदारी तिने सांभाळली. तिचं कौतुक करतांना सासूबाई थकत नव्हत्या. पण आई मात्र आपल्याच नादात होती. आपली मुलगी सासरी कशी सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झालीय हे तिला फारसं महत्त्वाचं वाटत नव्हतं. तिने आपला आदर्श ठेवला नाही याची बोच मोठी ठरली होती. आई एखादा शब्द कौतुकाचा बोलेल ही तिची आशा फोल ठरली. अखेर ठरवून तिने आपलं मन आईच्या बाबतीत कोरडं केलं. आणि आपल्या घरात रमली. ठरवल्याप्रमाणे दोन मुलं, त्यांच्यासाठी दिलेला वेळ, नवऱ्याची खरी अर्धांगी, घरची मोठी सून, चांगली गृहिणी या सगळ्या भुमिका ती मन लावून जगत होती.

आणि अचानक हे असं आईचं निवृत्त झाल्यानंतर रिकामं बसणं आणि सतत तिच्या आयुष्यात, घरात शिरण्याचा प्रयत्न करणं. तू आमची एकुलती एक मुलगी, तुझ्याशिवाय कोण आम्हालाअसं बोलणं. हे तिला कोड्यात टाकत होतं. आई कधी अशी घरगुती, साध्या गृहिणीसारखी वागेल हे तिला अगदीच अनपेक्षित होतं. उलट आईचे निवृत्तीनंतर काय करायचं याचे प्लॅन्स तयार असतील याची खात्री होती तिला. काय झालंय नेमकं, आईच्या अशा वागण्यामागे काय कारण असेल याचा विचार करून शिणली ती. अखेर मनाशी काहीतरी ठरवून एका शनिवारी ती आईकडे आली. तिला बघून मॅडम खूष झाल्या. स्वयंपाकीणबाईंना भराभर सूचना दिल्या आणि तिचा हात धरून तिला आपल्या खोलीत घेऊन आल्या. आज अचानक कशी आईची आठवण झाली? किती बरं वाटलं. खूप दिवसांनी भेटतोय असं वाटतंय.... असंच काहीतरी त्या बोलत राहिल्या.

थोडा वेळ ऐकून तिने विषय काढला. आई, तू हल्ली सारखी आमच्याकडे....पण तिचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच त्यांनी त्यांची नेहमीची तू आमची एकुलती एक....ही रेकॉर्ड सुरू केली. तिने आईला थांबवलं. आई, मी एकुलती एक असणं हा तुझा निर्णय होता. तुला करिअरमध्ये पुन्हा ब्रेक नको होता, तुझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या होत्या म्हणून तू दुसरं मूल होऊ दिलं नाहीस. मग आता हे एकुलती एक असल्याचं गाणं का गातेस सारखं? काही दुसरी अडचण असती आणि नाईलाजाने तू हा निर्णय घेतला असतास तर गोष्ट वेगळी होती. पण तसं नाहीये. मी एकुलती एक आहे आणि तुमच्या म्हातारपणाचा आधार आहे हे मला माहीत आहे. आणि जेव्हा तुम्हाला माझ्या मदतीची, आधाराची गरज भासेल तेव्हा मी नक्की येईन. कारणं सांगून जबाबदारी टाळणार नाही. पण रोज उठून अशी डोक्यावर का बसते आहेस? काही करत का नाहीस?” मॅडम रडवेल्या झाल्या होत्या. अगं, निवृत्त झाले मी. आता कोण मला काम देणार आहे आणि कसलं, कुठलं काम?”

आई, अगं असं काय करतेस? इतकी अनुभवी प्राध्यापक तू. विषयाचा इतका गाढा अभ्यास आणि काय करायचं हे मी तुला सांगायचं? कितीतरी विद्यार्थ्यांना क्लासच्या लठ्ठ फीया परवडत नाहीत म्हणून कॉलेजमध्ये स्पेशल लेक्चर्स घ्यायचीस ती आता घरी घे ना. एवढं मोठं घर आहे, तुम्ही दोघंच असता. वेळा ठरवून घे, विद्यार्थ्यांची संख्या बघून बॅचेस कर. जे करायला मिळावं म्हणून तू ठरवून काही गोष्टी केल्यास, काही टाळल्यास तेच आता निर्घोर मनाने कर ना. जे तुझ्या निर्णयांचे परिणाम आहेत, त्यांची जबाबदारी तूच घ्यावीस हेच रास्त. असं दुसऱ्यावर विसंबून तुझं आयुष्य जगणार आहेस का?” हे आणि याच अर्थाचं आणखी बरंच काही बोलली ती. मॅडम एकदम गप्प झाल्या होत्या. तिला थोडं वाईट वाटलं. आपण फार तोडून बोलतोय का, वेगळ्या पद्धतीने सांगता आलं असतं का असंही वाटून गेलं. पण आता शब्द गेले होते तोंडातून. आता जे परिणाम होतील ते बघू म्हणून तिने बोलणं थांबवलं. चहा करून आणला. आणि चहा पिऊन ती निघाली.

दोन-तीन दिवस आईचा काहीही फोन आला नाही म्हटल्यावर तिची अस्वस्थता वाढली. आपण फोन करावा का असंही वाटून गेलं. पण मग वाटलं की आपण जे बोललो ते काही कारणाने बोललो आणि ठरवून बोललो. आता तिला जरा वेळ मिळू दे त्यावर विचार करायला. चार दिवसांनी दुपारी आईचा फोन आला. थोडा वेळ आहे ना तुझ्याजवळ?”
हो, बोल ना.
मी विचार केला तुझ्या बोलण्याचा. पटलं मला. जशी निवृत्ती जाहीर झाली तसं जो येईल तो विचारायचा आता काय करणार. आराम करा मॅडम, फार काम केलंत असं म्हणायचा. सतत ऐकून ऐकून नकळत माझ्याही मनात तेच यायला लागलं. वाटायला लागलं, आपल्याला आरामाची गरज आहे, आपला तो हक्क आहे. कामात बदल म्हणजे सुटीहे गुरूदेव टागोर यांचं वचन मी सतत सगळ्यांना सांगत राहिले, पण मला कशी भूल पडली न कळे. आणि त्या नादात मी तुझ्या संसारात शिरकाव करायला बघत होते.
अगं तसं नाही .......
थांब, तसं नाही कसं? तसंच झालंय. आजपर्यंत अंतर ठेवून, मोजून-मापून वागणारी मी, अचानक अशी कौटुंबिक जिव्हाळ्याने वागायला लागले तर समोरचा गोंधळून जाणारच. शिवाय तू म्हणतेस तसं एकच मूल हा निर्णय सर्वस्वी माझा. तुझ्या बाबांना आणि आजीला आणखी एक मूल व्हायला हवं होतं, पण मी निक्षून नाही सांगितलं. त्यावेळी माझं मन वळवायचा प्रयत्न करतांना हा उतरत्या वयातल्या एकटेपणाचा मुद्दा त्यांनी मांडला होताच, पण माझ्या डोळ्यावर धुंदी होती करिअर घडवण्याची. मी झिडकारून टाकलं त्यांचं बोलणं. आता मीच माझ्या निर्णयावर ठाम नाही राहिले तर कसं चालेल?”
एक दीर्घ श्वास घेऊन त्या म्हणाल्या, तू पूर्ण वेळ गृहिणी राहण्याचा निर्णय घेतलास तोही मला आवडला नव्हताच. तू तुझा निर्णय छान निभवते आहेस. पण एक लक्षात ठेव. करिअर निवडतांना मी बाकीच्या सगळ्या वाटा बंद करून टाकल्या, आता मला त्याच ठरलेल्या वाटेवरून चालणं भाग आहे. पण तू तसं करू नको. आज मुलं हे तुझं विश्व आहे. उद्या ती मोठी होतील, त्यांचं जग वेगळं होईल. मग जी चूक मी केली तीच तू करशील. तसं नको होऊ देऊ. मुलं मोठी झाल्यावर नवी वाट शोधून तिच्यावरून पुढे जाता येईल याची संधी शिल्लक ठेव स्वत:साठी. करिअर स्वत:च्या घरात असो वा घराबाहेर, तिला पर्याय असलाच पाहिजे बाईजवळ. खरं म्हणजे पुरूषालाही गरज असतेच अशा नियोजनाची. तुझे बाबा बघ, कसे निवांत आहेत........ असो. मी आता घरात थोडे बदल करून घेईन आणि क्लास सुरू न करता डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घरातूनच काय करता येईल त्याचा विचार करून ते करेन. माझ्याच क्षेत्रात, पण रूढ पद्धतीने शिकवण्याव्यतिरिक्त दुसरं काहीतरी. ठेवू फोन?”

फोन ठेवून मॅडम आपल्या उद्योगाला लागल्या. मुलीने सुस्कारा सोडला. तिला वाटलं होतं तसं आईने फार त्रागा नाही केला, उलट आपण कशा नकळत का होईना, लोकांच्या बोलण्याने भरकटलो ते मान्य केलं. आता होईल सगळं ठीक हळूहळू. पण आईने सांगितलेलं लक्षात ठेवायला हवं, ते दुसऱ्या पर्यायी वाटेचं. गृहिणी म्हणून करिअर करतांना इतिहासाची पुनरावृत्ती नको व्हायला. थोडा वेळ ती तशीच बसून राहिली शांत आणि मग उठून तीही आपल्या उद्योगाला लागली.   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न