जोरका झटका चुपकेसे
जोरका_झटका_चुपकेसे
श्रीयुत घरी परतले. घामाघूम झाले होते. कपडे बदलले, पाणी प्यायले आणि
सौंना थोडी जोरातच हाक मारली...
“तू काल बँकेत गेली होतीस?”
श्री. नुकतेच रिटायर झालेत. त्यामुळे ‘आपल्याला आता काही कसली घाई नाही’ या गोड कल्पनेतून त्यांच्या
सौ. अजून बाहेर पडलेल्या नाहीत.
त्या आपला वेळ घेऊनच बाहेर आल्या.
“इतकं आक्रीत झाल्यासारखं काय विचारताय? माझे चेक्स क्लियर झाले की नाही ते
बघायला गेले होते.”
“हो, पण ते क्लियर झालेले मला सांगितलंच नाहीस. परस्पर त्यांच्या FDs करून आलीयेस. आणि
काही पैसे त्या xxxxx investments कडे गेलेले दिसताहेत.”
“इतकं चिडण्यासारखं काय झालंय पण? मी post graduate आहे, थोडे फार पैशांचे व्यवहार मलाही कळतात.
माझ्या माहेरच्या संपत्तीतल्या माझ्या हिश्श्याचे पैसे मी माझ्या मनाने गुंतवले तर
त्यात असं आकाश कोसळल्यासारखं का करताय?”
“माझ्या संपत्तीचे पैसे? अच्छा, म्हणजे आता तुझं-माझं पण करायला लागलीस का? भलं मोठं डबोलं हातात
आल्यावर एकदम स्त्री-मुक्ती, स्त्री-पुरुष समानता वगैरे सुचायला लागली का?”
सौ. न बोलता खोलीत गेल्या. दिवसभर श्री. फणफणत होते. टोमणे मारत होते.
कुचकट बोलत होते. संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरायला जायला श्री. तयार झाले.
“थांबा जरा. आज मी पण येणार आहे तुमच्याबरोबर.”
बागेत पोचल्यावर ४ फेऱ्या मारुन झाल्यानंतर सौ. थोड्या दमल्या. “आज
इतकंच पुरे. बसू या जरा त्या कोपऱ्यात.” श्री. मुकाट्याने त्यांच्या मागे गेले आणि
कोपऱ्यातल्या बाकावर सौंच्या बाजुला जाऊन बसले.
सौ. हलक्या आवाजात बोलायला लागल्या.....
“मी परस्पर पैसे गुंतवले म्हणून तुम्ही नाराज झाला आहात. माझ्या हिश्श्याचे
पैसे म्हटलं ते खटकलं-राग आला? पण तुम्ही तर कायम असंच बोलता. कधी काही खर्च
जास्त झाला तर ‘माझ्याकडे आता पैसे नाहीत’ हे म्हणता. मेडिक्लेम policy घेऊ या म्हटलं तर
काय म्हणालात आठवतंय? - तुझं काय जातंय पोलीस्या घ्यायला? हप्ते मला भरावे लागतील.”
श्री. मनाशी चमकले. पण चेहऱ्यावर काही न दाखवता चेहरा मख्ख करून ऐकत
राहिले. त्यांनी ‘नाराजी दाखवली नाही, तिखट प्रतिवाद केला नाही हेच खूप’ असा विचार करून सौ.
पुढे बोलायला लागल्या.
“तुम्ही बाहेरची कामं करायची आणि मी घरची जबाबदारी घ्यायची अशी
विभागणी आपण सुरुवातीलाच केली होती. घराची आर्थिक जबाबदारी तुम्ही उत्तम पेललीत, त्याबद्दल माझी काहीही
तक्रार नाही. म्हणजे तुम्ही तशी वेळ येऊच दिली नाही कधी हे अगदी विनाशर्त मान्य
आहे मला. पण तुमच्या वागण्यात - नकळत होत असेल, मुद्दाम करता असं नाही म्हणायचं मला –
दिवसेंदिवस फार हुकमत आलीय. कोणताही निर्णय तुम्हीच घ्यायचा, माझं मतही विचारत नाही तुम्ही. मी आपणहून
कधी काही सांगितलं तर एक तर दुर्लक्ष करता किंवा उघड उडवून लावता. मी बाहेरचे, पैशांचे व्यवहार
करत नाही याचा अर्थ मी मूर्ख, बिनडोक आहे असा तुम्ही लावताय हे माझ्या लक्षात
आलंय. मी मिळवत नाही, म्हणजे मी काही बोलायचं नाही! पण मी नाही फारसं लक्ष दिलं. कारण एकतर
दोघा-दोघांनी लक्ष घालावं इतकी काही कोट्यवधींची मिळकत नाही आपली, आणि जो कष्ट करून
पैसे मिळवतो त्याला त्या पैशांबद्दल जास्त मालकी, ममत्व वाटणार हे मी समजून घेतलं, अगदी ठरवून-प्रयत्नपूर्वक.
माझ्या खासगी खर्चाला लागणारे पैसे मला कधी कमी पडले नाहीत, पण ते दरवेळी तुमच्याकडे मागावे लागतात
मला. मी गरजेला अमूक पैसे बँकेतून काढून वापरले असं फारच क्वचित झालं. मी ‘मागायचे’ आणि तुम्ही ‘द्यायचे’. पाचशे मागितले तर
हजार द्यायचे. ‘दिल्याचा’ आनंद तुम्हाला हवा असतो का?
माणसाच्या स्वभावात दोष असतातच. तसे ते आपल्या दोघांच्याही स्वभावात आहेत.
पण आपली चूक मान्य न करण्याचा किंबहुना आपण कधी चुकतच नाही असं समजण्याचा एक जास्त
त्रासदायक दोष तुमच्यात आहे. चूक मान्य करणं म्हणजे सिनेमा-नाटकात दाखवतात तसं ‘माझं चुकलं. मी
पुन्हा असं करणार नाही, मला क्षमा कर.’ असं म्हणणं नाही. समोरच्याने माप पुरेपूर पदरात
घातल्यानंतर तरी स्पष्ट शब्दात ‘हो. झालं खरं असं - लक्षात नाही आलं माझ्या – नको
होतं असं बोलायला-वागायला’ इतकं म्हटलं तरी पुरतं. ते तर तुम्ही कधी करतच
नाही, उलट
तुमचंच कसं बरोबर आहे त्याचं समर्थन करत राहता. समोर मी असेन तर ती चूक माझ्या
पदरात घालण्याचा प्रयत्न करत राहता. समोरच्यालाच अपराधी भावना देत राहता.
बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्या सगळ्या आत्ता सांगण्याचं काही कारण नाही.
ज्या गोष्टी सहन करण्याची क्षमता संपलीय तेवढंच फक्त सांगतेय. ठरवून मी हे केलंय.
तुम्हाला पटलं, तुमच्या वागण्यात तुम्ही लक्षात येईल इतका चांगला बदल केलात तर
कदाचित मी पुन्हा सगळ्यातून अंग काढून घेईन आणि तुम्ही पूर्वीसारखेच सगळे व्यवहार
बघा. नाहीतर आता इथून पुढे माझं धोरण हेच राहील. माझे पैसे-माझे निर्णय. मला
आवडणार नाहीच असं वागायला. पण ‘माझे पैसे’ म्हटलेलं समोरच्याला कसं बोचतं त्याचा
अनुभव एकदा तुम्हीही घ्याच. चूक कबूल करणं हेही तुम्हाला जमवावं लागेल. जिथे माझी
चूक नाही, तिथे
मी एक शब्द ऐकून घेणार नाही. जिथे तुमचा काही संबंध नाही तिथे सतत सूचना, सल्ले, आदेश मी मानणार
नाही. आपल्या मताला फारशी किंमत नाही हे कसं अपमानास्पद वाटतं ते कळू दे
तुम्हालाही.
मुलं मोठी झालीत. फार दिवस हे ऐकून घेणार नाहीत. एक दिवस
त्यांच्याकडून काहीतरी ‘ऐकावं’ लागेल, ते झेपणार आहे का याचा विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. मी जाते
आता घरी. तुम्ही तुमचं फिरणं पूर्ण करून या.”
सौ. पाठ वळवून निघून गेल्या. श्री. स्तब्ध बसून राहिले. बायकोची मधून
मधून होणारी तणतण कशी बंद करायची ते त्यांना सवयीने कळलं होतं. पण ती असा काही
पवित्रा घेईल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. या पैशांची कशी गुंतवणूक
करायची ते त्यांनी ठरवलं होतं, आपल्या सल्लागाराशी बोलूनही ठेवलं होतं. आता
त्याला कसं सांगणार की बायकोने न विचारता परस्पर ‘तिचे’ पैसे तिच्या मनाने गुंतवले? ही भलतीच गोची करून
ठेवली होती ‘सौ’नी.
#माझं_मत - अगदी घरोघरी नाही, तरी बऱ्याच घरी घडणारी ही गोष्ट. बायकोने समुपदेशकाकडे
जाऊन आपली घुसमट मोकळी केली, तिथे झालेल्या चर्चेतून तिला हा मार्ग सुचला
(आणि मला पोस्ट टाकायला विषय मिळाला.) उठसुठ वाद घालणं, भांडून घरादाराला अस्वस्थ करणं यापेक्षा
सौंनी वापरलेला हा मार्ग मला रास्त वाटला. आत्मसन्मान जपणं याचा अर्थ जोडीदाराचा
अपमान करणं असा नाही हे सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे – पुरुष आणि बायका
दोघांनीही.
Comments
Post a Comment