पहिलं प्रेम


चार वाजले. शिपाई चहाचा ट्रे घेऊन आला. स्नेहाने पुढ्यातला लॅपटॉप बंद केला. शिपायाने पुढे केलेला चहाचा कप उचलून एक घोट घेतला आणि डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला.
छान झालाय चहा.” तिचा नेहमीचा शेरा ऐकून हलकं स्मित करून शिपाई निघून गेला. आता पुढचा अर्धा तास तिचा एकटीचा. फोन कॉल्स नाहीत, भेटी-गाठी नाहीत, ऑफिसमधले कुणी सहकारी सुध्दा येणार नाहीत तिच्या केबिनमध्ये. तिच्या तशा सुचनाच होत्या. आणि त्या तिची सेक्रेटरी न चुकता पाळत होती. लहान वयात इतक्या मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्या आपल्या बॉसबद्दल फार कौतुक आणि आदर होता तिच्या मनात. चहा संपवून स्नेहाने ५-७ मिनिटं डोळ्याचे आणि मानेचे व्यायाम केले. सतत कॉम्प्यूटर वापरुन डोळ्यांना आणि मानेला त्रास होऊ नये यासाठी तिच्या डॉक्टरनी तिला हे व्यायाम सांगितले होते आणि ते ती नियमाने दर दोन तासाने करत असे. मग उठून तिथल्या तिथे थोड्या फेऱ्या मारल्या. आणि अर्धा तास होता होता वॉशरूम मध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं, चेहरा टवटवीत केला आणि खुर्चीत येऊन बसली. सहज तिचं लक्ष cctv च्या मॉनिटरकडे गेलं आणि ती चमकली. बाहेर लॉबीतल्या सोफ्यावर बसलेला एक जण ओळखीचा वाटला. स्क्रीन झूम करून पाहिलं तर तो रोहन देसाई होता. रोहन? आत्ता इथे? कशाला? कुणाला भेटायला? प्रश्नांचं मोहोळ उठलं तिच्या मनात. तिने आपल्या आजच्या वेळापत्रकावर नजर टाकली. जी३ असोशिएटस् कडून कुणी चीफ इंजिनियर एवढीच नोंद होती. तोच हा की काय? इंटरकॉमच्या रिंगने तिची तंद्री मोडली. तिने फोन उचलला, “मॅडम, चीफ इंजिनियर फ्रॉम जी३ असोशिएटस् हॅज कम. शॅल आय सेंड हिम?”
येस.” फोन बंद करून ती मॉनिटरकडे पाहत राहिली. सेक्रेटरीने ‘त्या’ला आत जायची खूण केलेली दिसली. आणि अचानक तिच्या घशाला कोरड पडली. समोरचा भरलेला ग्लास उचलून तिने तोंडाला लावला. नजर मॉनिटरकडे. त्याने उठून बाजुला ठेवलेला कोट घातला, केसावर हलका हात फिरवून ते सारखे केले आणि आपली बॅग आणि फोल्डर उचलून सेक्रेटरीने दाखवलेल्या दिशेने – तिच्या केबिनकडे - यायला लागला.
दार किंचित किलकिलं झालं, हलकी टकटक झाली आणि पाठोपाठ “मे आय?” असा ऋजू स्वरातला प्रश्न. तिचा श्वास अडकला. याच भारदस्त आवाजावर आणि ऋजू बोलण्यावर एके काळी ती भाळली होती.
येस, प्लीज.” तिचं सराईत, कमावलेलं उत्तर. आत येऊन तो तिच्या पुढ्यात उभा राहिला. त्याच्या नजरेत मुळीच आश्चर्य नव्हतं. म्हणजे त्याला माहित होतं, इथे मी भेटणार आहे ते? त्याने हात पुढे केला, “गुड इविनिंग मॅम. हाऊ आर यू?” तिने हात त्याच्या हातावर टेकवला.
अॅम फाईन. प्लीज टेक युअर सीट.”
त्याने कामाचे कागदपत्र काढले. बरोबर त्याच्या काही नोट्स. आणि अस्खलितपणे तो मराठी-इंग्लिश दोन्ही भाषांत बोलायला लागला. त्याच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करायला तिला एक मिनिट लागलं. मग ती लक्षपूर्वक ऐकायला लागली. मध्येच तिच्या काही शंका, त्याचं सविस्तर उत्तर. चहा आला. “तुम्ही नाही घेणार?”
नाही. माझा झाला आत्ताच. मी नाही घेत दुसऱ्यांदा.” उत्तर अपेक्षित असल्यासारखं त्याने हलकं स्मित केलं. चहा घेऊन पुन्हा काम. साडेपाचच्या सुमाराला त्याने बोलणं आवरत घेतलं. “मी हे सगळे पेपर्स ठेवतो. तुम्ही नीट वाचा. काही प्रश्न असतील तर मेल करा किंवा कॉल करा. बट आय अॅम शुअर, आय हॅव मेड दी मॅटर क्लीअर इनफ.”
त्याने निघायची तयारी केली. आता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा होता. तिने तो झट्कन घेतला आणि म्हणाली, “रोहन, ऑफिसला परत जायची घाई नसेल तर ......... थोडं बोलायचं होतं.”
आता मात्र तो थोडा चकित झालेला वाटला. (म्हणजे? मी कामाव्यतिरिक्त याच्याशी बोलणार नाही असं वाटलं होतं याला?) तो पुन्हा खुर्चीत बसला. ती काही बोलण्याची वाट बघत. तिने इंटरकॉम उचलला, “नीना, मी निघतेय. गाडी काढायला सांग.”
त्याच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हाकडे सरळ दुर्लक्ष करत ती म्हणाली, “निघू या?”
तो चुपचाप तिच्याबरोबर बाहेर पडला.
वरळी सी फेसवर कोपऱ्यातल्या एका बाकावर दोघं बसली. अजून वर्दळ सुरु व्हायची होती.
कसा आहेस?”
मी ठीक आहे. कल्पना लग्न होऊन सासरी गेलीय, निरंजनही आता नीट सेटल झालाय. आता अगदी निवांत आहे मी. मी आणि माझी नोकरी.”
आणि आई?”
ती गेली दोन वर्षांपूर्वी. एका रात्री अचानक झोपेतच गेली. दुखणं काही नव्हतं. पण .......”
लग्न केलंस?”
नाही अजून. स्वत:चं घर सुध्दा घेतलेलं नाहीये. कंपनीचा फ्लॅट आहे शिवाजी पार्कला. गाडी सुध्दा कंपनीचीच वापरतोय. लग्नाच्या बाजारात इतकं स्थैर्य पुरेसं नसतं. तसं आता कल्पना आणि निरंजन सारखे सांगतायत, बघू.”
पुढे काय बोलावं ते सुचेना. मग नकळत दोघं भूतकाळात शिरली.
स्नेहा आणि कल्पना एका वर्गातल्या मैत्रिणी. अगदी घट्ट नाही, पण चांगल्या मैत्रिणी. एकदा घराबाहेर बसस्टॉपवर स्नेहा भेटली, ओळख वाढली आणि तिचं प्रेमात रुपांतर व्हायला वयाची सोबत होतीच. त्याचं इंजिनियरिंगचं शेवटचं वर्ष होतं. त्याची परीक्षा झाल्यावर त्याला वडिलांना भेटायला यायचा तिने आग्रह धरला. कॅम्पसमध्ये एक नोकरी मिळालेली होतीच.
काय करतोस?” त्याने कंपनीचं नाव सांगितलं. पाठोपाठ पगार, घर, जबाबदाऱ्या ही चौकशी ओघानेच आली. मिनिटभर ते शांत राहिले.
आम्हाला विचार करायला थोडा वेळ हवाय.”
बाहेर पडल्यावर तो म्हणाला, “स्नेहा, तुझ्या बाबांनी विचार करायला वेळ मागितलाय खरा, पण ते होकार देतील असं नाही वाटत मला.”
४ दिवसांनी ‘बाबांनी बोलावलंय’ हा निरोप स्नेहाने त्याला दिला.
तू हुशार, होतकरू आणि संस्कारी तरुण आहेस. तुला जावई करून घ्यायला आम्हाला आवडेल. पण तू इथे राहशील का आमच्याबरोबर? तुझ्या घरची जबाबदारी तू घेच. खरं म्हणजे तू ती जबाबदारी टाळलेली आम्हालाही आवडणार नाही. इथे राहूनही तू ते करू शकशील.”
नाही. मला नाही वाटत मी हे करू शकेन.”
असा घाईने निर्णय घेऊ नको. आईशी बोल, घरात इतर कुणी मोठी माणसं असतील त्यांचा सल्ला घे.”
त्याची काही गरज नाही. मला माहित आहे आई ‘हो’च म्हणेल. कारण तुमच्याप्रमाणेच तिलाही माझ्या भविष्याची सुरक्षितता महत्त्वाची वाटेल. पण मला त्यापेक्षा माझं कर्तव्य महत्त्वाचं वाटतं. आईच्या जबाबदाऱ्या थोड्या हलक्या करणं हे आता माझं पहिलं काम आहे.”
पण स्नेहाला अजून आशा होती. ती रोज बाबांच्या विनवण्या करत होती. अखेर त्यांनी तिच्यापुढे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. “त्याच्या घरात कराव्या लागणाऱ्या तडजोडींची तुला कल्पना नाही. पण ठीक आहे. मी सांगतो तसं तीन महिने राहून दाखव. मग मी विचार करीन. महिन्याला पॉकेटमनी फक्त ५०० रुपये मिळेल. फोन प्रीपेड करून घे. त्याचं रिचार्ज ५००च्या वर जाता कामा नये. मोजके ४-५ कॉटनचे ड्रेस वापरायचे. त्याचं धुणं-इस्त्री घरी करायचं. लॉन्ड्रीचा खर्च करायचा नाही. घरात सॉफ्ट ड्रिंक्स, इतर फॅन्सी खाणं, चॉकलेटस् बंद. दोन वेळा चहा, सकाळचा नाश्ता, साधंसं वरण-भात-पोळी-भाजीचं जेवण........” अशा बऱ्याच अटी घातल्या त्यांनी. स्नेहाने त्या सगळ्या लगेच मान्यही केल्या - आपलं प्रेम खरं आहे हे सिद्ध करून दाखवायचंच अशा ईर्ष्येने.
पहिल्या २० दिवसात स्नेहाला चटके बसायला लागले. बाबांनी तिचं एटीएम कार्ड आणि पर्समधली कॅश काढून घेतली. त्यांनी दिलेले ५०० रुपये केव्हाच संपले. मग आईने चोरुन दिलेले हजार रुपये पण संपले. शेवटचे आठ दिवस कॉलेज बुडवून ती घरात बसली. घरातला फोन वापरत होती. पुढच्या महिन्यात बाबांकडून ५०० रुपये घेतांना तिला रडू फुटलं. तिचं धैर्य गळालं. पण निग्रहाने तिने ते दिसू दिलं नाही. आपलं प्रेम खरं आहे हे तिला दाखवून द्यायचं होतं बाबांना. पण या महिन्याला १५ दिवसांत तिचं अवसान संपलं. ती घरात बसलेली पाहिल्यावर बाबांनी हटकलं. “कॉलेज बुडवायचं नाही. क्लास हुकलेला नाही चालणार.” २ दिवस ती चालत गेली. तिसऱ्या दिवशी सणसणून ताप भरला. आईचा धीर सुटला. बाबांवर चिडली ती. “त्यापेक्षा स्पष्ट नकार का देत नाही तुम्ही? पोरीचे असे हाल करण्यापेक्षा नकार ऐकून ती फार तर रडेल, मग शांत होईल. बस करा तुमच्या परीक्षा.” स्नेहाने हार मानली. एक लांबलचक पत्र लिहून रोहनला सगळं कळवलं. त्याची क्षमा मागितली. आणि डिग्री मिळाल्यावर मॅनेजमेंट करण्यासाठी सिंगापूरला गेली. तिथून परत आली तो या फायनान्स कंपनीत जॉब मिळाला. आई-बाबा लग्नाचं बघायला लागले, तिने स्पष्ट सांगितलं. “माझं मी बघेन. तुम्ही लक्ष घालू नका.” आणि त्यांच्या विनवण्यांना बळी न पडता तिने आपला हट्ट खरा केला. कारण लग्न म्हटलं की तिला रोहन आठवायचा. दुसऱ्या कुणाशी लग्न करणं म्हणजे तडजोड. एकदा ती करायला नाही जमली, मग आता तरी का करायची? मग ती आणि तिची नोकरी. भरभर प्रमोशन्स मिळत गेली. आणि आज वयाच्या तिशीच्या आधीच ती मोठ्या पदावर पोचली होती.
तू तुझं नाव नव्हतं दिलंस अपॉईंटमेंट घेतांना?” तो हसला.
तुझं नाव कळलं होतं मला. वाटलं भेटून तुला कदाचित धक्का बसेल, पण आधीपासून नको तो बसायला. म्हणून फक्त चीफ इंजिनियर इतकंच म्हटलं.”
पण तेव्हा तू दुसऱ्या कंपनीत लागला होतास. मग इथे कधी जॉईन झालास?”
झाली २-३ वर्षं. जी३ मधल्या एका जीचा मुलगा अचानक अपघातात गेला. त्यांना नवा इंजिनियर हवा होता. अनुभवी नेमला तर पगार जास्त द्यावा लागला असता. मला ओळखत होते कामानिमित्ताने. ऑफर दिली. मला ती पटली. कंपनी तशी नवी होती. पण इट इज ऑलवेज बेटर टू ग्रो विथ कंपनी. आणि माझा निर्णय अचूक ठरला. कंपनी झपाट्याने वाढली, मोठी झाली.”
लग्न ...... कधी?”
आत्ता तर सगळं सेटल होतंय. बघू. कल्पना आणि निरंजन सतत आठवण करतायत. त्यांना फार काळजी वाटते. तू केलंस?”
नाही. तडजोड करणं नाही ना जमत मला. नाही त्या वाटेला गेले परत.”
....
जी३ असं काय नाव आहे तुझ्या कंपनीचं?”
तो हसला. “गांगल, गिते आणि गोसावी अशा ३ मित्रांनी सुरु केलीय. म्हणून जी३. एका कंपनीत तिघेही एकत्र काम करत होते. मैत्री जमली. काहीतरी स्वत:चं करू असं तिघांनाही वाटत होतं. प्रयत्न केला, जमलं. गोसावींचा मुलगा त्यांच्याबरोबर होता. तो गेला अचानक.”
अशाच किरकोळ गप्पा मारुन, परत कधीतरी भेटण्याचं ठरवून दोघं आपापल्या दिशेने गेले.
८-१० दिवसांनी स्नेहाच्या बाबांचा फोन आला. “मला भेटशील?” तो भेटायला गेला. बाहेर – कॉफी शॉपमध्ये. त्यांचा रुबाब थोडा कमी झालेला वाटला. पण एकंदर राहणीत अजिबातच फरक नाही दिसला.
मी तेव्हा स्नेहाला घातलेली बंधनं तुला कळली असतील. पण रोहन, खरं सांग. लग्नानंतर तिने चिडचिड केलेली तुला तरी चालली असती का? तुम्हा दोघांचं आयुष्य पार विस्कटून गेलं असतं. तुझ्यासारखा उमदा, होतकरू तरुण खासगी आयुष्यात असा विफल ठरला असता तर तुझी करियर पण कदाचित खराब झाली असती. ना घरात सुख-आनंद, ना कामात यश. असं दोघांनाही झालं असतं. पण त्याचा असा परिणाम होईल असं मला तरी कुठे वाटलं होतं? मला वाटलं तू स्थिर होईपर्यंत स्नेहा पण तिचं शिक्षण पूर्ण करेल. ती सिंगापूरहून परत आल्यावर मी तुला शोधायचा प्रयत्न केला होता. पण घर तुम्ही सोडलं होतं आणि तू कंपनी पण बदलली होतीस. नाही शोधू शकलो. मग स्नेहाने लग्न करायला नकार दिला. माझं मी बघेन म्हणाली. डोळ्यासमोर माझी लाडकी लेक एकटी जगतेय, ते बघवत नाहीये मला. मी आज तुला ऑफिशियली स्नेहासाठी प्रपोज करतोय. जावई होशील का माझा? माझी स्नेहा तुझ्यासोबत आनंदाने जगू शकेल. मला दुसरं काही नको आता.”
त्याने दीर्घ श्वास घेतला. “thanks फॉर प्रपोजल. पण ...... मी अजून पुरेसा स्थिर नाही. स्वत:चं घर नाहीये माझं, कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहतोय. गाडीसुद्धा कंपनीची आहे. नोकरी सोडली की हे सगळं परत द्यावं लागेल. तुम्हाला अपेक्षित असलेलं स्थैर्य अजून आलेलं नाहीये मला. सो....”
ते समजले. न बोलता निघून गेले.
घरी परत येतांना गांगलांचा फोन आला. “रोहन, कुठे आहेस?”
घरी जातोय. ड्राईव्ह करतोय.”
ओके. इट इज अर्जंट. जरा बाजुला घे गाडी.”
त्याने गाडी बाजुला घेतली.
बोला सर.”
तू आत्ता कुठे आहेस?”
त्याने परिसर सांगितला.
गुड. घरी जाऊ नको. मी तुला पत्ता कळवतो. तिथे ये. थोडं बोलायचंय. एकत्र जेवू.”
त्यांनी फोन बंद केला. फार एक्सायटेड वाटले. त्याने थोडा ताण दिला. काही नवीन डील व्हायचं होतं का? नाही आठवत. हं, नवीन ओपनिंग दिसत असेल कदाचित. बघू तर काय म्हणतायत.
त्याने गाडी वळवली.
तो हॉटेलात शिरला. सभोवार पाहिलं, तर एका कोपऱ्यातून गांगल हात उंचावून त्याचं लक्ष वेधत होते. तो टेबलाशी गेला. बॅग ठेवून वॉशरूममध्ये गेला. चेहरा खसाखसा धुतला. स्नेहाच्या वडिलांशी बोलतांना चेहऱ्यावर आलेला ताठरपणा त्याला धुवून टाकायचा होता.
तोंड धुवून तो टेबलाशी येऊन बसला. गांगलांनी जेवण ऑर्डर केलं होतं. जेवायला सुरुवात करून २-३ घास घेऊन झाल्यावर ते म्हणाले, “आज ऑफिसमध्ये लाल रंगाचा ड्रेस घातलेली एक मुलगी आली होती?”
त्याने किंचित ताण देऊन आठवायचा प्रयत्न केला. “हो. मी शहांशी बोलत होतो तेव्हा.”
गांगल खुश झाले. “आठवतेय तुला?”
तो चकित झाला. “मी पाहिलं नाही नीट. कोरडे म्हणाले तुम्हाला भेटायला आल्यात. का विचारता?”
गांगल मजेशीर हसले. पाण्याचा घोट घेऊन, “ती माझी मुलगी, ललिता.”
त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
सांगतो. आत्ता २ महिन्यांपूर्वी आलीय अमेरिकेहून तिथला जॉब सोडून. फार विनवण्या केल्या मी आणि तिच्या आईनी. MBA करायला गेली ती रमली तिथेच. आम्हाला नको आहे ती कायमची परदेशात जायला. आता तिने परत जायचा विचार करायच्या आधी तिच्यासाठी एक झकास नवरा शोधायचा असा विचार आम्ही करत होतोच. तर काय..... आज तिनेच तुझी चौकशी केली. तू कोण, काय शिकलायस, कंपनीत तुझी पोझिशन काय वगैरे चौकशा करायला लागल्यावर मी थेट विचारलं, आर यु इंटरेस्टेड? अजून सिंगल आहे. मी विचारतो त्याला. तर म्हणाली भेटायला आवडेल. आता बोल.” गांगल भलतेच एक्सायटेड होते. तो गप्प जेवत राहिला.
तुला सांगतो रोहन.....” ते भरभरुन आपल्या मुलीचं कौतूक करत राहिले. कशी हुशार आहे, अमेरिकेत राहून आलीय तरी कशी अजून नॉर्मल आहे, जराही अमेरिकेचं वारं कसं लागलं नाहीये वगैरे. (मिनतवाऱ्या केल्या तेव्हा परत आली हे विसरले वाटतं - - - - रोहन मनाशी हसला.) “मग काय म्हणणं आहे तुझं?”
पण सर, तुम्हाला तर माहित आहे, घर आणि गाडी कंपनीची आहे. अजून माझं स्वत:चं घर सुध्दा घेतलेलं नाहीये मी. आणि लग्न करण्याचा विचार म्हणजे . . . . .”
अरे रोहन, तू जर माझा जावई झालास तर तू कंपनी सोडण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे त्या घरातून तू कशाला बाहेर पडशील?”
म्हणजे?”
अरे सरळ आहे. तू माझा जावई झालास तर तू काही एक साधारण एम्प्लॉयी नाही ना राहणार. तू डायरेक्टर होशील थेट....... एक मिनिट रोहन, मी तुला आमिष दाखवतोय असं नको समजूस. तुला नाही म्हणायचं असेल तर तू तसं म्हणू शकतोस. आणि नाही म्हटलंस म्हणून तुझ्या आत्ताच्या पोझिशनवर किंवा भविष्यातल्या प्रमोशनवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही हा माझा शब्द आहे. कारण लग्न आणि करियर हे निर्णय माणसाने पूर्ण विचारानेच घ्यायचे असतात यावर माझा विश्वास आहे. तर ....... तू माझा जावई झालास तर डायरेक्टर होशील मग कंपनी सोडण्याचा प्रश्न येणार नाही. पुढेमागे तुम्ही तुम्हाला हवं तसं घर घेऊ शकता दुसरीकडे. तुम्हाला लोन सहज मिळेल कुठल्याही बँकेचं. किंवा तेच घर कंपनी विकत घेईल तुझ्यासाठी.
रोहन, खरं सांगायचं तर तुला भेटल्यापासून मला वाटत होतं की हा मुलगा आपला जावई व्हायला हवा. सेल्फ मेड मॅन. पक्की दृष्टी, अचूक निर्णय, समतोल विचार. पण मी आपणहून तुला विचारावं की नाही अशा दोलायमान अवस्थेत होतो. आज ललितानेच माझी अडचण दूर केलीय. मी तिचा नंबर तुला व्हॉटस्अॅप करतो. तुझा तिला देतो. तुम्ही भेटा, बोला. हवा तितका वेळ घ्या. मला हवा तसा निर्णय झाला तर माझी लेक भाग्यवान असं मी समजेन. नाही झाला तरी कंपनीला तुझी गरज कायम राहीलच. माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या निराशेची सावली कंपनीच्या कामावर पडू देणार नाही मी. कधीच नाही.”
बोलता बोलता त्यांनी मुलीचा नंबर त्याला पाठवला. न बोलता दोघं जेवत राहिले. बिल उचलायला त्याने पुढे केलेला हात गांगलांनी धरला आणि बिल आपण दिलं. बाहेर येऊन त्यांनी त्याला एक हलकी मिठी मारली. “मी आज खूप खुश आहे, रोहन. खूप दिवसांनी एक निर्णय अगदी माझ्या मनासारखा होईल असं वाटतंय, कोणतीही अॅडजस्टमेंट न करता.......” त्याच्या खांद्यावर आपला हात हलकेच दाबून त्यांनी पाठ वळवली, टॅक्सीला हात केला आणि निघून गेले.
रोहनला योगायोगाचं नवल वाटलं. त्याचं पहिलं प्रेम तो विसरला नव्हता, पण ते सफल करण्याच्या वाटा त्याने त्याच्या हाताने बंद केल्या होत्या आज. आणि आजच ही नवी वाट त्याच्यासमोर आली होती. हात पसरून त्याला बोलवत होती त्याच्या दिशेने. घरी जातांना तो विचार करत होता, आपल्याला नकार देण्यात किंवा नंतर स्नेहाची परीक्षा घेण्यात तिच्या वडिलांची भूमिका फारशी चुकीची नव्हती. लाडात, ऐषोआरामात वाढवलेल्या लेकीला पुढे कसली तोशीस लागू नये असं कोणत्याही बापाला वाटणारच. आणि लहानपणापासून जे आयुष्य स्नेहा जगली ते असं सहजा सहजी विसरणं तिला शक्य झालं नाही यात तिचीही काही चूक नव्हती. माणूस पैसा मिळवतो ते सुखोपभोगासाठीच. आपले वडील अकाली गेले नसते तर आपणही कदाचित असंच आरामाचं आयुष्य जगलो असतो. त्याची आपल्याला सवयही लागली असती. पण तरीही, आयुष्यात कधी काही कठीण प्रसंग आला तर ते किंवा त्यांची मुलगी कदाचित कच खाण्याची शक्यता आहे अशी भीती आपल्याला वाटली तर तीही फारशी चूक म्हणता येणार नाही. उलट-सुलट विचार करीत तो घरी पोचला. ललीताचा व्हॉटस्अॅपवर आलेला नंबर त्याने सेव्ह केला.
गांगल म्हणतात तसं, भेटायला काय हरकत आहे? नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य आहेच आपल्याला . . . . . .”
दिवा मालवून तो झोपेच्या आधीन झाला.
पहिलं प्रेम माणूस विसरत नाही. पण ते नेहमी भळभळत्या जखमा आणि खोल व्रण देतं असंही होत नाही. इतर अनेक अनुभवांसारखा हाही एक अनुभव - इतकं साधं, सरळ अस्तित्व असू शकतं त्याचं माणसाच्या मनात-आयुष्यात.


राधा मराठे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न