वर्तुळ


वर्तुळ

राहुल घरी आला तो ओमची खेळणी बाहेर पसरली होती आणि तो व्हिडीओ गेम खेळत होता. राहुलचे बाबा कसलीतरी फाईल उघडून बसले होते. आई दुसऱ्या दिवसाची भाजी निवडत होती. टेबलावर जेवणाची तयारी दिसत होती आणि ओमची आई कॉलवर होती. पसारा बघून राहुलच्या कपाळाला आठी पडली. न बोलता तो जाऊन कपडे बदलून, हातपाय धुवून आला.

"ओम.......ओम तुला हाक मारतोय मी."
डोकं खेळात घालूनच ओमचं 'हूं...'
राहुलने येऊन त्याच्या हातातला गेम काढून घेतला.
"आधी सगळी खेळणी आवर. किती वेळा सांगितलंय, एक खेळ जाग्यावर ठेवून मग दुसरा काढायचा. तू ऐकत नाहीस. आणि संध्याकाळचा व्हिडीओ गेम कसला खेळतोस? आजोबांबरोबर शुभं करोति वगैरे म्हणावं. ते किती, काय शिकवतील तुला. पण तू शिकशील तर ना........"

ओम चुपचाप आवरत होता. त्याने हळूच शाळेची डायरी बाबापुढे ठेवली. त्यातली विकली टेस्टची बी ग्रेड बघून राहुलचा काटा सरकला.
"तू म्हणशील ते आणून देतो, कधी कशाला नाही म्हणत नाही. सगळे लाड पुरवले जातात. तुला फक्त अभ्यास नीट कर म्हटलं तेही होत नाही? काय कमी आहे रे तुला? आजी आजोबा दिवसभर तुझ्या मागे धावत असतात, मी आणि आई दिवसभर काम करतो ते कुणासाठी? तुझ्याच साठी ना?........" असं भरपूर काही काही बोलून श्वास घेण्यासाठी राहुल थांबला. त्याने बघितलं आई-बाबा एकमेकांकडे बघत होते. त्यांच्या ओठावरचं सूक्ष्म स्मित राहुलला जाणवलं आणि तो एकदम गप्प बसला. फार जुनी गोष्ट नव्हती. १५ वर्षच झाली असतील जेमतेम, हेच, असेच संवाद होत होते घरात आणि राहुल चरफडत होता. "जगातले सगळे आई बाबा आपापल्या मुलांसाठी हेच करतात. हे काय जगावेगळं करतायत का? सारखं काय......" आत्ताही राहुलला ती बडबड स्पष्ट ऐकू आली.
रात्री झोपतांना राहुलची आई म्हणाली, "वर्तुळ पूर्ण झालं."
स्वत: आई-बाप झाले की मुलांना आपल्या आई-बापांची भूमिका कळते.

Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न