बदला



डॉक्टर हात पुसत बाहेर आले आणि बाहेर उभ्या असलेल्या नातेवाईक, शेजाऱ्यांनी त्यांना गराडा घातला. टाके घातलेत. जखमा मोठ्या आणि खोल आहेत. भरायला वेळ लागेल. पण सुदैवाने मेंदूला काही इजा नाही झालेली. जशा जखमा भरतील, तशा त्या बऱ्या होतील. आठ दिवसात घरी पाठवू आम्ही. पुढचं ड्रेसिंग घरी करता येईल. टाके काढण्यापुरतं एखादा दिवस पुन्हा आणावं लागेल.

आता पोलीस सरसावले. काय झालं, कसं झालं, तिथे कोण कोण हजर होतं – हजार प्रश्न. त्याने सांगितलं पाय घसरून पडली, तोल सावरतांना खिडकीच्या संगमरवरी चौकटीवर डोकं आपटलं, त्याने भोवळ आल्यासारखं झालं. मी धावेपर्यंत स्वयंपाकाच्या ओट्यावर डोकं आपटून पुन्हा खाली पडली आणि बेशुद्ध झाली. पोलीसांच्या आडव्या-तिडव्या प्रश्नांनी तो भांबावला. पण शेजारचे देवरे मध्ये पडले. साहेब, सरळ, पापभीरु माणसं आहेत. मुलं जवळच राहतात. ही दोघं मजेत राहतात, फिरतात. लांबच्या ट्रीपा करतात. भांडणाचे आवाज नाही ऐकले कधी आम्ही. घाबरलेत ते. नका उलटे सुलटे प्रश्न विचारु.इन्स्पेक्टरने त्यांनाच काही प्रश्न विचारले आणि त्याची आणि शेजाऱ्यांची सही घेऊन घरगुती अपघात अशी नोंद करून निघून गेले. शेजारी हळूहळू पांगले. सुनेने करून आणलेला चहा तो प्याला, बिस्कीटं खाल्ली.

बाबा, झालं काय नेमकं?” मुलाच्या प्रश्नावर त्याचा बांध फुटला. बापाच्या डोळ्यात पाणी पाहून मुलगा भांबावला. पुढचे प्रश्न त्याने आवरले. रात्री हॉस्पिटलमध्ये सून थांबणार असं ठरवून सगळी घरी आली. रात्री गादीवर पाठ टेकल्यावर त्याला दुपारचा सगळा प्रसंग पुन्हा आठवला. दुपारचा चहा झाल्यावर काहीतरी कारणाने वाद झाला आणि यावेळी ती माघार घेत नाही, हट्टाला पेटली म्हटल्यावर त्याने नेहमीचं अस्त्र काढलं. कंटाळलो तुझ्या कटकटीला. जातो आता कुठेतरी निघून.हे ऐकल्यावर नेहमीसारखी गप्प न बसता ती म्हणाली, तुम्ही कशाला जाता कुठे, मीच जाते - - या घरातून, तुमच्या आयुष्यातून अगदी जगातून सुद्धा. असं म्हणून तरातरा घरात गेली आणि खिडकीच्या संगमरवरी चौकटीवर तडातडा डोकं आपटायला लागली. आधी तो फक्त बघत राहिला, पण तिच्या डोक्यातून रक्त यायला लागल्यावर तो धावला. पण तोपर्यंत वेलची कुटायचा दगडी खल उचलून तिने स्वत:च्या डोक्यात तडातडा मारून घेतला आणि त्याने पुढे होऊन तिला धरेपर्यंत कोसळली. रक्ताने माखली. तो घाबरला. शेजारी धावला. ती घसरून पडली सांगितलं. शेजाऱ्यांनी भराभर हालचाली करून तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केली. मुलांना फोन केले. तासाभरात मुलगा-सून, जावई धावले. मुलगी ऑफिस टूरवर होती, तिला काही कळवायचं नाही असं ठरवलं. पण हॉस्पिटलवाल्यांनी रितीप्रमाणे पोलीसांना अँक्सिडेंट केस कळवली. तेही हजर झालेच. देवऱ्यांनी सावरुन घेतलं नसतं तर? कल्पनेने तो शहारला. तिचं हे आततायी वागणं त्याला अनपेक्षित होतं.

त्याने कूस पालटली, पण गेल्या ४७-४८ वर्षांचा पट त्याच्या डोळ्यापुढून सरकायचा थांबेना. इंजिनियर व्हायची त्याची इच्छा दीड टक्क्यांनी हुकली. नाईलाजाने त्याने M.Sc. केलं. पण लग्न करतांना त्याला सायन्स ग्रॅज्युएट मुलगीच हवी होती. पण ही आर्टस् ग्रॅज्युएट मुलगी त्याच्या आई-वडिलांना आणि इतरांना पसंत पडली, नाही म्हणायचं काही नेमकं कारण देता येईना त्याला. केवळ सायन्स ग्रॅज्युएट नाही या कारणासाठी नकार हे घरात कुणाला पटण्यासारखंच नव्हतं आणि आर्टस् शिकलेली मुलं हुशार नसतात या त्याच्या वेडगळ समजुतीची तर टरच उडवली गेली असती. त्यावेळी क्लिक होणंवगैरे काही विचार करायची पद्धतच नव्हती. एक बाजू मात्र भक्कम जमेची होती त्याच्या मनासारखी ती म्हणजे तिची बँकेतली उत्तम नोकरी.

त्या नोकरीच्या जीवावर त्यांचा संसार दिसायला अगदी दृष्ट लागण्यासारखा झाला. स्वत:चं सुसज्ज घर, मुलांची उच्च शिक्षणं-लग्नं, त्यांना घरं घ्यायला थोडी फार आर्थिक मदत. पण VRS योजना जाहीर झाल्यावर तिला राहवलं नाही आणि तिने त्याच्या मनाविरुद्ध त्या योजनेचा फायदा घेऊन नोकरीला रामराम ठोकला. मुलांच्या शिक्षणा-लग्नासाठी तिच्याच फंडातून लोन घेतलं होतं त्यामुळे फार पैसे नाही मिळाले, पण जे मिळाले ते तिने नवऱ्याच्या सल्ल्याने गुंतवले. मिळणाऱ्या व्याजात तिच्या हौशी पुऱ्या होत होत्या, ट्रीपा होत होत्या. तशी ती काही आदर्श गृहिणी नव्हती, पण सून, बायको आणि सासरच्या इतर नात्यांबरोबर आलेली कर्तव्यं तिने यथाशक्ती निभावली होती. कधी मागे हटली नव्हती. पण हळूहळू तिच्या लक्षात येत होतं की बऱ्याच गोष्टी आपल्यापासून लपवल्या गेल्यात, अजुनही जातायत. जिथे तिने पुढे होऊन काही करणं अपेक्षित असायचं, तिथेच फक्त तिला सांगितलं जायचं. ती याचा निषेध वेळोवेळी त्याच्याजवळ व्यक्त करीत राहिली आणि तो तिला काहीतरी उत्तरं देऊन गप्प करीत राहिला. आता सतत घरात राहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की त्याच्या दृष्टीने ती अगदी नगण्य होती. तिला फारसं महत्त्व द्यायची गरज त्याला वाटत नव्हती. एकदा तर भांडतांना तो म्हणाला सुद्धा की तिच्यासारख्या आर्टस् ग्रॅज्युएट फडतुस मुलीशी त्याला लग्नच करायचं नव्हतं, पण तिच्या भक्कम नोकरीकडे पाहून तो गप्प बसला होता. ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन हादरली. म्हणजे केवळ आपला पगार महत्त्वाचा ठरला? आपण कवडी किंमतीच्या होतो याच्यासाठी? सुरुवातीच्या सुन्न होण्यातून बाहेर आली तशी चवताळली ती.

आता ती त्याचा शब्द खाली पडू देईना. प्रत्येक अरे ला कारे करायला लागली. जरा भांडण झालं की निघून जाण्याची, घटस्फोट घेण्याची धमकी देण्याची सवय होती त्याला, आधी ती नरमून गप्प बसायची, आता उलट उत्तरं द्यायला लागली. आत्ता जा वकिलाकडे.”  असं म्हणायला लागली. तिला सतत टोकायचं, तिची अक्कल काढायची, सतत चुका काढून शिकवत राहायचं, प्रत्येक गोष्टीचा मोठेपणा आपणच घ्यायचा अशा सगळ्या सवयी आता सहन करायच्या नाहीत असं तिने ठरवलं. फार झोबलं होतं तिला त्याचं बोलणं. काय केलं की ही संतापाची आग शांत होईल असं झालं होतं तिला. तिच्या अशा आक्रमक वागण्याने तो आणखी बिथरला. आणखी घालून पाडून बोलायला लागला. आणि आज असा आततायीपणा करून तिने त्याला चांगलाच अडचणीत आणला होता. पण अजून पुष्कळ गोष्टींना तोंड द्यायचं होतं त्याला.

जशी शुद्धीवर आली, तशी त्याला समोर बघून कपाळाला आठ्या पडल्या तिच्या. नर्सला हाक मारून त्याला बाहेर बसायला लावला. तुम्हाला सुटी नसेल मिळत तर दिवसभराची बाई ठेवा, बाबा नकोत माझ्याजवळ.असं स्पष्ट सांगितलं तिने मुलांना. मुलं चकीत झाली. मुलीने खूप समजावलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. आई असं कधी बोलली नव्हती. कितीही वाद झाले तरी ती नेहमी बाबांचीच बाजू घ्यायची आणि आता अचानक इतका राग याचं कोडं उलगडेना त्यांना. ह़ॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या तीही स्वत:शी नवल करत होती. कुठून आलं आपल्यात हे धैर्य? खरोखर काही झालं असतं तर?  “व्हायचंय काय, सुटले असते सगळ्या अपमानातून कायमची. नको असतांना असं स्वत:ला का लादत राहायचं कुणावर?” नुसत्या आठवणीनेही ती अस्वस्थ झाली.

२-३ दिवसांत तिच्या लक्षात आलं, पोलीस येऊन गेलेत आणि शेजाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे प्रकरण फार वाढलं नव्हतं. डरकाळ्या फोडणाऱ्या वाघाची मांजर झाली होती. ती समोर थांबू देत नव्हती, ते मनाला लागत होतं. चेहरा उतरत होता लगेच. समोर नाही बसला तरी खोलीच्या बाहेर बसलेला असायचा, ते जाणवायचं तिला. एकीकडे वाईट वाटत होतं, आपण त्याच्यावर फार जास्त रागावतोय असं वाटत होतं, एकीकडे त्याने आजवर केलेले अपमान आठवून पुन्हा हे विचार दूर जात होते. अखेर तिने निर्णय घेतला. असंच करायचं, पुरती नांगी ठेचली जाईपर्यंत हेच धोरण ठेवायचं आणि नंतर ...... बघू, पुढचं पुढे. पण आत्ता त्याला असा नरमलेला बघून जीव थंड होतोय तो तरी होऊ दे.

जखमा भरत आल्यावर ती घरी आली. दिवसभराची बाई आली. नवऱ्याच्या हातचं पाणी घेईना ती. सारखी बाईला हाका मारायची. जरा हिंडा-फिरायला लागल्यावर बाई काढली. पण आता नवऱ्याच्या सावलीला उभी राहिना. तो रडकुंडीला आला. मुलगी ४ दिवस राहायला आली. तिला काहीतरी संशय आला. आईचं असं वागणं तिला खटकायला लागलं. आपले वडील अहंमन्य आहेत, आई खूपदा नमतं घेते हे तिने लहानपणापासून पाहिलं होतं. आई नोकरी सोडून घरी बसल्यावर काही दिवस बरे गेले होते. पण गेलं वर्षभर पुन्हा त्यांच्यात सतत भांडणं होतांना पाहिली होती. आई अशी इतकी आक्रमक वागतांना पाहून तिला नवल वाटलं होतं. भावाशी ती बोललीही होती याबद्दल. पण आई-बाबा झाले तरी त्यांच्या खासगी गोष्टीत कसं लक्ष घालायचं, काय विचारायचं याचा पेच पडला त्यांना. आणि त्यात आईचा हा अपघात. आता सगळे संकोच बाजुला ठेवायचे असं ठरवून तिने बाबांना आईच्या समोर बोलावलं आणि स्पष्ट विचारलं. आई-बाबा, गेलं वर्षभर आम्ही बघतोय, काहीतरी बिनसलं आहे तुमचं. आई कधी नाही इतकी आक्रमक झालीय. असं कधी बोलली-वागली नव्हती ती. काय झालंय नेमकं? मला सांगा सगळं स्पष्ट काय ते.त्यावर ती इतकंच म्हणाली, तू मला काही विचारू नकोस. खरं सांगायला माझी जीभ धजणार नाही.मुलगी दचकली. म्हणजे? सांगता येणार नाही, बोलायला जीभ धजणार नाही असं काय घडलंय? पाय घसरून पडली यात न सांगण्यासारखं काय असेल?” विचार करून तिचं डोकं सुन्न झालं. एका क्षणी ती चमकली. बोलायला जीभ धजणार नाही म्हणजे घसरून पडली वगैरे थापा - बाबांनीच आईला काहीतरी केलं?” एकदा मनात शिरलेला संशयाचा किडा हळूहळू तिचं डोकं पोखरू लागला. काही घटना आठवल्या. संदर्भ जोडायला लागली ती. बाबांनी केलेली चिडचिड आणि आईने फाडकन् दिलेली उत्तरं आठवली. आईचे पैसे हल्ली आईच मॅनेज करायची. पुर्वीसारखे बाबा नाही लक्ष घालायचे. आईला मिळालेल्या पैशावरून काही..... तिच्या मनात घट्ट होत जाणारा हा संशय तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसला त्याला. ती स्पष्ट काही बोलली नाही, पण त्याला जाणवलं तिच्या मनात आपल्याबद्दल विखार भरतोय. आता तो पुरता कोलमडला.

मुलगी आपल्या घरी परत गेल्यावर तो हात जोडून उभा राहिला तिच्यासमोर. मीच तुला काहीतरी केलं असा संशय येतोय मुलांना, का अशी वागतेस? तू म्हणशील तर पाया पडतो तुझ्या, पण या उतरत्या वयात मुलांच्या तिरस्काराचा धनी नको करू मला. दया कर माझ्यावर.ती फक्त खुनशी हसली. आपल्या आततायीपणाची चर्चा नको म्हणून तिने मुलीला काहीतरी उत्तर दिलं होतं, ते नकळत तिच्या पथ्यावर पडलं होतं. त्याचा फायदा उठवत आयुष्यभराच्या अपमानाचा बदला घेण्याची संधी चालून आली होती. बदला घ्यायचा विचारही तिने कधी केला नव्हता, नुसती स्वत:शी जळत होती. त्याने तोल जाऊन केलेला आततायीपणा असा संधी होईल हे अगदी अकल्पित होतं तिच्यासाठी. इतके दिवस आपण तिच्याशी लग्न केलं म्हणजे फार मोठा त्याग, तिचं नशीब या धुंदीत वावरणारा तो, आता तिच्यासमोर गरीब शेळी झाला होता. मुलं सतत फोन करून, भेटायला येऊन तिची चौकशी करायची. त्याच्याशी कामापुरतं बोलायची.

आता घरची राणी झाली होती ती, बिन राजाची राणी. खटकायचं तिला तेही. नाही म्हटलं तरी इतक्या वर्षांचा सहवास, त्यातून आलेला आपलेपणा काही पार पुसला गेला नव्हता. घरातल्या वैभवात, स्वास्थ्यात त्याचाही हिस्सा होताच. पण त्याच्या मनात जर तिला अशी कवडी किंमत होती, तर त्या सगळ्याची किंमत शून्य होती तिच्यासाठी. आता अचानक चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचाच होता तिला. मनाचं पुरतं समाधान झाल्याशिवाय, आग विझल्याशिवाय त्याला माफ करणार नव्हतीच ती.

कधी आणि कशी विझणार होती ही आग? आणि तोपर्यंत तो किती होरपळणार होता? ते तिलाही माहीत नव्हतं. आणि तिला आत्ता तो विचार करायचाही नव्हता. मनाला मिळणाऱ्या क्षणिक थंडाव्यात आत्ता तरी ती खुशालली होती. आत्ता या क्षणाचा आनंद घ्या - आगे जो होगा, सो देखा जाएगा

Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न