भरपाई


भरपाई

विद्याकाकी रजनीच्या मागे घरात शिरल्या. रजनी चमकली. मगाशी ती कोपऱ्यावर वळली तेव्हा त्या चंदाबाईशी बोलत बसलेल्या दिसल्या. आणि आत्ता पाठोपाठ घरात?
आई नाय ना घरात?” तिने फक्त नकारार्थी मान हलवली.
आज आठा दिशी तुला बगती मी. चुपचाप येतीस आनि घरात बसतीस. काय हाय म्याटर?”
रजनी चाचरत म्हणाली, “नाय काकी. म्याटर कसला.”
का? त्या दिलप्यासंग काय भांडान झाला?”
आता रजनीची बोलती बंदच झाली पुरती. ती गप्पच बसली.
ह्ये बग, मला ठावं हाय. तुजा आनि त्येचा लव हाय ना? दादर मार्कीटात बगितलंय मी तुमाला. आता खरी काय ती ष्टोरी मला सांग.”
विद्याकाकी आज कैक वर्षं रजनीच्या शेजारी राहत होत्या. रजनीच्या आईच्या अडी-नडीला उभ्या राहत होत्या. रजनीचे वडील गेल्यावर त्यांनीच आईला २ स्वयंपाकाची आणि ४ धुण्या-भांड्याची कामं मिळवून दिली होती. कुठे बचत गटात जायच्या कामाला. बाई रोखठोक होती. उगा वावदूकपणाला जागा नव्हती त्यांच्या समोर. मोठमोठ्या लोकांशी ओळखी होत्या कामानिमित्ताने. २ दिवसांत नाठाळाला सरळ करायच्या. पुन्हा आपली पायरी ओळखून असायच्या. मोठ्यांच्या ओळखीचा बडेजाव मिरवत उगाच दाब दाखवीत फिरण्याची सवय नव्हती. त्यांच्या प्रश्नाने रजनीचा बांध फुटला. ती रडायला लागली. त्यांनी तिला शांत रडू दिली. मग उठून पेलाभर पाणी आणून दिलं प्यायला. दोनेक मिनिटांनी ती शांत झाली. ओढणीला तोंड पुसून खाली मान घालून बसून राहिली.
बोल माझी बाई. आय यील आता. मंग यकदम उद्या टायम गावंल.”
रजनीने हळूहळू बोलायला सुरुवात केली.
ती दहावीत होती तेव्हा एक दिवस शाळेतून येतांना ठेच लागून चप्पल तुटली. शिवायला जवळ पैसे नव्हते. चप्पल हातात धरुन चालायची लाज वाटली, म्हणून पाय फरफटत तशीच चालत येत होती. वस्तीच्या कोपऱ्यावर बँककाकांचा मुलगा उभा होता. त्याचे वडील बँकेत शिपाई होते म्हणून ते बँककाका. त्याने हाक मारली. खिशातून दोन रुपये काढून दिले. “चप्पल शिवून घे जा. अशी चालू नको फरफटत.” तिने नाकारले तर जबरदस्ती हात पकडून घ्यायला लावले. दुसऱ्या दिवशी शाळेतून येतांना तो दिसलाच कोपऱ्यावर. तिने पैसे आणले होते बरोबर. ते देऊ केले त्याला. त्यावर तो हसला, “ठेव तुलाच. परत कधी लागतील. नायतर पेप्सी खा जा.” तो एकदम तिला हिरोच वाटला. मग शाळा बंद होईपर्यंत हे रोजचंच झालं. तो कोपऱ्यावर उभा असायचाच. हसायचा. कधी एखादा शब्द बोलायचा. प्रिलीम झाल्यावर शाळा बंद झाली आणि तो भेटेनासा झाला. रजनीला चुकल्यासारखं झालं. एक दिवस आईनेच तिला पाठवलं बँककाकांकडे. पैसे हवे होते उसने. ती संध्याकाळी बोलली होती त्यांच्याशी. रात्री देतो म्हणाले होते. रजनीला जायचं नव्हतं.त्या’च्यासमोर असे उसने पैसे घ्यायचे..... पण आईसमोर काही बोलायची सोय कुठे होती? ती गेली तेव्हा तो अभ्यास करत होता. काकांनी दिलेले पैसे घेऊन त्याच्याकडे न बघताच ती निघून आली. पण तो कसला अभ्यास करत होता? कॉलेजात जातो तो? हाच विचार तिच्या मनात घोळत राहिला.
दहावीच्या रिझल्टनंतर आईबरोबर पेढे द्यायला ती गेली त्यांच्याकडे. त्यांनी पन्नास रुपये बक्षीस दिले. “कसलं बक्षीस देता भाऊ? पास झाली यवडंच. मार्क काय फार भ्येटले नायत.”
अहो र्‍हाऊ दे. आपल्या मुलांना काय कलास करायला मिळत नाय. मुन्सिपालटीची शाळा. पास झाली तरी छानच. आता आमचा दिलीपकुमार बारावी करतोय. बगू काय रीझट लागतो.” तेव्हा तिला कळलं तो बारावीला आहे.
आता फुडे काय करनार पोरगी?”
कालिज काय परवडनार नाय आमाला. त्या बाबू टेलरला सांगितलंय. तो फाल आनि हुक, बटन लावायचं काम देनार हाय. घरी बसून काय जमंल त्येवडं करंल.”
रजनीचं फॉल आणि हातशिलाईचं काम सुरु झालं. दिलीप बारावी पास झाला आणि वडिलांच्या ओळखीने एका खासगी बँकेत लागला. कारकून म्हणून. आता त्याचे कपडे आणि केस एकदम हिरोसारखे दिसायला लागले. ४ पैसे खुळखुळत होते खिशात. एक दिवस बाबूकडे साड्या आणि कपडे दिले आणि दुसरे घेऊन जातांना तो दिसला. थांबून बोलत राहिला. कोपऱ्यावर पेप्सी घेतली. खात खात घराकडे आली दोघं. आणि मग नेहमीच तो भेटत राहिला. एक दिवस त्याने तिला दादरला बोलावलं. ती जाऊ की नको अशा संभ्रमात पडली. पण वय वेडं होतं. मोह मोठा ठरला. आईला शंभर थापा मारुन ती दादर स्टेशनवर उभी राहिली सांगितलेल्या जागी. तो तिला चौपाटीवर घेऊन गेला. भेळ खाल्ली. ती एकदम मोहरून गेली. केव्हातरी बघितलेल्या सिनेमातली स्वप्नं डोळ्यासमोर फिरायला लागली. आपण आणि दिलीप. कधी दादर चौपाटी, कधी माहीम रेक्लमेशन, कधी खार दांडा. खूप फिरली दोघं. पण दिलीप तसा सज्जन होता. तो कधीच वाईट नाही वागला. रस्ता ओलांडतांना हात धरायचा फक्त. आज तीन वर्ष दोघं फिरत होती. आईला संशय आला होताच. ती सारखं खोदून खोदून विचारत राहायची. पण रजनी आता सरावली होती नव्या नव्या थापा मारायला. वर्षापूर्वी त्याचे वडील लोकलमधून पडून गेले तेव्हा त्यांच्या बँकेने दिलीपला नोकरी देऊ केली होती. पण ती मोठी सरकारी बँक. त्यांच्याकडे बारावी पास मुलगा कारकून कसा होणार? शिपाई म्हणूनच लागणार. आपली छोट्या बँकेतली का होईना, पण कारकुनाची नोकरी सोडून शिपाई म्हणून काम करायला त्याचं मन राजी नव्हतं. तिनेच त्याला समजावलं होतं. “अरे, ही ब्यांक मोटी हाय. नोकरी कायम. आनि पगार पण दर वर्षी वाढणार. पुन्ना बोनस भेटेल दरवर्षी. तुला घर चालवायचं तर पैशे लागनार ना?” पुढे क्षणभर थांबून ती मोघम बोलली, “आनि फुडे तुजा पन सौंसार होनार, मग पैशे नकोत का जादाचे?” त्याला ते पटलं. तो वडिलांच्या बँकेत शिपाई म्हणून लागला. सहा महिन्यात परमनंट झाला.
आणि अचानक त्याचं काहीतरी बिनसलं. त्यांच्या भेटी कमी झाल्या. तिने एक-दोन वेळा आडून त्याला विचारलं. तर “ब्यांकेत साहेब लोक थांबतात, मग मला पन थांबावं लागतंय.” असं म्हणाला. तिला पटलं. एक दिवस बाबू टेलर तिला म्हणाला, “दादरला जाऊन धागे, हुक आणशील काय गं रजे? माजा पाय दुकतोय.” ती हो म्हणाली. दुकानाचं नाव, यादी आणि पैसे घेऊन निघाली. दादर स्टेशनवर बाहेर आली तो समोर दिलीप आणि त्याच्याबरोबर एक मुलगी. बऱ्यापैकी नटली होती. दोघं गुलुगुलू बोलत होती. सामान घेऊन परतली. दोन-चार दिवस त्याला भेटायचा प्रयत्न करत राहिली. अखेर शनिवारी भेटलाच दुपारी. पॉश कपडे करून निघाला होता. ही बाबूकडून परत येत होती. तिला बघून थोडा दचकल्यासारखा वाटला. पण तिने थेट विचारलं, “आजकाल भेटत नाही पयलेसारखा? काय झालंय? त्या दिवशी दादरला बगितलं एका पोरीबरोबर. कोन होती ती?” तो गडबडला. “कधी? हां हां, ती होय. ती आमच्या ब्यांकेतच हाय कामाला. चा-पानी बघते साहेब लोकांचं. तिचे पन वडील ब्यांकेत होते. त्यांना लकवा मारला. मग हिला मिळाला जॉब.” घाईत असल्याचं सांगून तो निसटला. आणि आत्ता आठवड्यापूर्वी बँककाकूंनी त्याचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं आईला. खूप कौतूक करत होत्या सुनेचं. “दिलप्याच्याच ब्यांकेत हाय, चांगला पगार हाय. बापाला लकवा हाय, भाऊ हाय ल्हान. तो शिकतोय आत्ता.......” आईची रेकॉर्ड चालू होती. पण हिचं मन उडलंच तिच्या बोलण्यातून.
तीन वर्ष फिरलो आमी काकी. आता मला मनच घेत नाय काय करायला.” आईची चाहूल लागली तसं काकी कुजबुजल्या, “उद्या येते सकाळी. बोलू. गप ऱ्हा.”
दुसऱ्या दिवशी पाळतीवर असल्यासारख्या आई बाहेर पडल्यावर विद्याकाकी आल्या.
दिलप्याचा साखरपुडा झालेला त्याची आई मला बोल्ली नाय. तुमाला कसं कळलं?”
नाय माहित. आई एक दिवस सांगत आली त्याचा साखरपुडा झाला आसं.”
विद्याकाकी विचारात पडल्या. काहीतरी गडबड होती. इतकी महत्त्वाची घटना वस्तीत घडतेय आणि त्यांना पत्ता नाही असं होणार नाही. पण त्या उघड इतकंच बोलल्या, “मी बगती. तू गप ऱ्हा. कुनाला काय बोलू नको.”
१५-२० दिवस त्या तिच्या पाळतीवर राहिल्या. खाणं-पिणं तुटलं होतं पोरीचं. खाली मान घालून काम करीत राहायची, नाहीतर भकास नजर भिंतीवर लावून बसून राहायची. तिची आई एक दिवस त्यांना म्हणालीच, "पोरीचं काय बिनसलंय उमगंना. काय बाधा झाली आसंल काय वो काकी?" २-३ वेळा त्यांनी तिला हटकली, पण नजर चुकवून निघून गेली. त्यांचा जीव कळवळला. १८-१९ वर्षांची पोर. गरीब, खालमानेने राहणारी. आई कष्ट करत होती, आपल्या पोरीला आपल्यासारखं घरकाम करायला लागू नये म्हणून धडपडत होती. ही पण आईचा आणि आपला जीव सांभाळून राहत होती. त्यांनी तिला दिलीपबरोबर बघितली, तेव्हा त्यांना वाटलं होतं, चांगली आहे जोडी. एखाद्या वर्षात आपणच फोडू हे गुपित आणि लावून देऊ लग्न. पण ती हे भलतंच काही सांगत होती. काय करता येईल हिच्यासाठी? अशी कोमेजून जाता कामा नये ही मुलगी. हे वय असं अडनिडं आहे, दिलीप तसा चांगला मुलगा होता. असा अचानक का फिरला ते विचारायला पाहिजे. पोरीचं तसं काही नुकसान नाही केलंय ते एक बरंच आहे. पण कुणी वाह्यात मुलाने हिला फशी पाडलं तर आयुष्यातून उठेल मुलगी. छे छे! तसं नाही होता कामा. आपल्या डोळ्यासमोर मोठी झालीय पोरगी, काहीतरी करायलाच हवं तिच्यासाठी.
रविवारी त्या तिला ‘बाहेर चल’ म्हणाल्या. ती मुकाट्याने गेली त्यांच्याबरोबर. बँककाकुच्या घराकडे त्या वळल्या तशी ती अडखळली. पण त्यांनी तिला हात धरुन बळेच नेली. घरात शिरताच त्यांनी आवाज दिला, “दिलप्या, भाएर ये जरा.”
दिलप्या आणि काकींचा आवाज ऐकून त्याची आई दोघं बाहेर आली आणि रजनीला त्यांच्याबरोबर बघून चपापली. “काकी, आज सकाळीच इकडं?”
काय गं शाणे, पोराचा साखरपुडा केलास आनि बोललीस नाय मला. बोलीवलं नाय ते सोड, पेडे पन नाय दिलेस.”
त्या दोघांची वाचा बसल्यासारखं झालं. मग विद्याकाकींनी जरा आवाज चढवला. “काय रे, काय इचारते मी?”
मी शोदून काडीनच. पण तुमीच मला खरा काय त्ये सांगा.”
दिलीपची आई म्हणाली, “काकी, ब्यांकेतल्या त्या पोरीने याला लग्नाची मागणी घातलीय. तिला पन चांगला पगार हाय. पुन्ना दोगं येकाच ब्यांकेत, तर घरासाटी कर्ज पन भेटंल. दिलप्या राजी हाय, पन हिला कसं सांगायचं त्ये कळना झालं आमाला. मंग मी हिच्या आयला खोटंच सांगितलं का साखरपुडा झाला. तवा ही किंवा हिची आय काय विचारतील म्हणून. पन या कायच नाय बोलल्या. आज सुपारी फोडायला बलीवलंय आमाला. तिचा मामा आलाय गावावरून.”
काकी संतापल्या. “काय रं भित्रटा, फिरतांना म्हायत न्हवता काय हिच्याकडे पैशे नाय. तवा फिरलास. आता किती लोकांनी बगितलं आसंल तुमाला, कोन लगीन करनार आता हिच्यासंगट? रस्त्यावर पडली वाटलं काय तुला?”
काकी, मी काय कवा तिला लग्नाचं बोल्लो नाय. आणि समोर इचारा कवा काय बोट पन नाय लावलेला.”
आरं ह्ये तुला म्हायत, तिला म्हायत. पन लोक इस्वास ठीवनार काय? आता त्या पोरीने काय जलमभर भांडे घासायचे काय लोकांचे?”
दिलीपची आई एकदम आक्रमक झाली. “आनि नाय क्येलं लगीन, तर काय करनार तुमी? आमी सांगू का हीच पाठी पडली व्हती.....”
ह्ये बगा, माझ्या वळखी हायेत वरपोत्तर. म्या तक्रार करंल कोनत्या सायबाकडे, तर भारी पडंल. सिद्दा बोल्तेय, सिद्दा जबाब द्या. उल्टी गोस्ट करू नका.”
दिलीप म्हणाला, “तुमी सांगा काकी, काय करायचा. मला शीलासंगच लगीन करायचं हाय. हिच्यासंग नाय. ही काय वायट नाय, पन ...... आता तुमाला तर सगळंच म्हायत हाय.”
आज सुपारी फोडा जावा. दोन दिसांनी येते बोलायला.”
प्रकरण तात्पुरतं मिटलं म्हणून दिलीप आणि त्याच्या आईने सुस्कारा सोडला.
दोन दिवसांनी विद्याकाकी परत रजनीला घेऊन दिलीपच्या घरी गेल्या. “ह्ये बग, लगीन काय आसं जबरदस्तीने होत नसतंय. आत्ता करशील, फुडे नाडशील. पन तुझ्यासंग लगीन करायच्या सपनात ऱ्हायली ही पोरगी, आता तिला पायावर हुबी कराया होवी. तू तिला ईस हजार दे. ती काय तरी शिकंल, सोताचं काय काम सुरु करंल नायतर कुटे काम मिळंल तिला.”
वीस हजार? काकी, लग्नाचा खर्च हाय मला.”
हो नाही करता करता १५ हजारावर बोलणं पक्कं झालं.
रजनीला काही कळतच नव्हतं काय चाललंय ते. “पैसे घेऊन काय करू मी? मला घर करायचंय, सौंसार करायचाय...” पण काकींनी तिला थांबवली. दुसऱ्या दिवशी दुपारी त्या घरी आल्या आणि तिला खूप समजावलं. “असं मनाविरुद लगीन करून काय सुख नाय. नंतर त्याने टाकली तर काय करशील?”
पन काकी, पैशे घेऊन काय करू मी? ते किती दिवस पुरतील?”
ह्ये बग, आमच्या बचत गटात त्या गौर्मेंटच्या म्याडम येतात, त्या येक दिस सांगत हुत्या का गरीब मुलींसाटी काय बाय कामं शिकीवतात. काय कपडे शिवणं, चामड्याच्या ब्यागा शिवणं, पाव-बिस्कुटं करणं असलं काय काय शिकीवतात. तुला काय हवं ते शिक, सोताचं काय काम कर नाय तर आमच्या गटात काम देते तुला. बग, आपले आपण पैशे मिळवशील, तर तुज्या आईचं वझं कमी होयल आनि तुज्या मनाला गमंल जरा. कसं तोंड जालंय बगितलंस काय आरशात? आणि आज नाय तर उद्या, तुजं लगीन तर हुतंय. चार पैशे गाटीला असले तर झकास नवरा शोदून देती मी. बग पोरी, तरनी पोर तू. आशी दिसभर घरात कोंडून ऱ्हाशील तर डोस्कं फिरंल आनि कायतरी इपरीत करून बसशील. माजं आयक. मी जग बगितलंय.” रजनी गप्प राहिली. २-४ दिवस रोज त्या येऊन तिला नाना तऱ्हेने समजावत राहिल्या. अखेर एक दिवस ती म्हणाली, “काकी, बाबूकडे काम करती मी, तर तेच शिकू का?”
शिवणकाम? हां, चालंल गं पोरी. बाबू शिकीवतो काय इचारते मी.”
विद्याकाकी बाबू टेलरशी बोलल्या. पण तो नाही म्हणाला. कारण तो सरावाने शिकला होता. नीट पद्धतशीर शिकवणं त्याला जमलं नसतं. पण त्याने एका इन्स्टीट्यूटचा पत्ता सांगितला. विद्याकाकींच्या सांगण्यावरुन रजनी तिकडे जाऊन चौकशी करून आली. तिथे ६ हजार फी होती ६ महिन्याच्या कोर्सची. कापड, मशीन त्यांचं. “ह्ये बरंच हाय की गं. पंध्रा हजार देतो म्हंटला दिलप्या. सा हजार फी देऊ आनि उरलेल्या पैशातून झ्याक मशीन घिऊ. मी आनि बाबू पन येईल तुज्या बराबर.”
काकी जाऊन दिलीपकडून पैसे घेऊन आल्या आणि लगेच रजनीचा शिवण डिप्लोमा सुरु झाला. तिला आवडलं ते काम. अगदी मन लावून शिकली. हात चांगला चालत होता तिचा. मग बाबूने तिला एक उत्तम मशीन घेऊन दिली. त्यावर पिको, थोडंफार एम्ब्रॉयडरी, काजं असं बरंच काम करता येत होतं. कंपनीचा माणूस येऊन तिला नीट डेमो देऊन गेला. आणि विद्याकाकी एक दिवस तिला आपल्या गटात घेऊन गेल्या. तिथे हॉस्पिटलसाठी बाळांचे कपडे शिवणाऱ्या, छोटे फ्रॉक शिवणाऱ्या, साधे स्वस्तातले ड्रेस शिवणाऱ्या अशा बऱ्याच छोट्या कंपन्यांचे मालक यायचे नेहमी ऑर्डर घेऊन. गटाच्या ताईंच्या ओळखीने त्यांनी तिला छोटी-छोटी कामं मिळवून दिली. हळूहळू तिचा जम बसला. नाव झालं. आता ती स्वतंत्र ऑर्डर घ्यायला लागली. आणि अवघ्या चोविसाव्या वर्षी तिने स्वत:ची ४ जास्त मशीन्स घेऊन छोटंसं का होईना, पण स्वतंत्र काम सुरु केलं.
मग एक दिवस विद्याकाकी एका छोट्या कंपनीच्या मालकातर्फे लग्नाची मागणी घेऊन आल्या. स्वतंत्र काम करून रजनी तडफदार झाली होती. आत्मविश्वासाने व्यवहार करायला शिकली होती. नीट नेटकी राहिल्यामुळे नजरेत भरण्याइतकी चांगली दिसत होती. त्याच्या ३-४ ऑर्डर्स रजनीने वेळेत आणि चोख पूर्ण करून दिल्या होत्या. तो चांगलाच प्रभावित झाला होता. आणि तिला सून करून घेण्याबद्दल त्याने काकींशी बोलणं केलं. त्याचा मुलगा १२वी पास होता. नोकरी नाही म्हणून इतके दिवस रिक्षा चालवत होता. आता बँकेचं कर्ज घेऊन एक Wagon R घेतली होती. आणि खासगी टॅक्सीचा धंदा करत होता. गाडीचा हप्ता जाऊन चांगली कमाई होत होती. मुलगा सज्जन आणि निर्व्यसनी होता. “ह्ये बग, मान्सं चांगली हायत. मी वळखते. पन तू काय येकदम हो म्हनू नको. त्याला चार वेळा भ्येट. तुमी काय ते बोला. नीट पारख कर त्याची. आनि मगच काय ते ठरीव.”
रजनी त्या मुलाला २-४ वेळा भेटली-बोलली, आणि तिने लग्नाचा निर्णय घेतला. तिच्या आईला आभाळ ठेंगणं झालं. आपल्यासारख्या बाईच्या मुलीला ‘गाडीवाला’ नवरा मिळेल हे स्वप्नं सुध्दा तिने कधी पाहिलं नव्हतं. “काकी, तुमच्यामुळे झालं. तुमी माज्या पोरीचं नशीब उगडून दिलं.”
आसलं काय बोलू नका. आपन बायांनी बायांचं भलं बगायला पायजे. त्या गौर्मेंटच्या म्याडम येतात, त्या सांगतात आपलं आपन नाय बगितलं तर काय खरं नाय. बाईमदी लय ताकत आसती. पन आपन निस्त्या रडत ऱ्हातो आन मंग लोक घेतात फायदा. तसं कवा नाय करायचं. आपन बी हुबं ऱ्हायचं आनि दुसऱ्यानला हुबं ऱ्हायला हात देयाचा.”




Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न