चेटूक
चेटूक
संध्याकाळी ७
वाजेपर्यंत पुण्याला पोचायचंच असं ठरवून आम्ही दुपारी २ वाजता मुंबईहून घर सोडलं.
बस अर्धा तास उशीरा आली. मग पुढच्या थांब्यावर सामानाच्या तिकिटावरून एका
प्रवाशाचं आणि कंडक्टरचं भांडण, धारावीत एक टायर पंक्चर, मग ते पंक्चर काढण्यासाठी
कुर्ला डेपोत रखडपट्टी, मग एका राजकीय पक्षाचं शक्तीप्रदर्शन अशा अडचणीतून वाट
काढत बस द्रुतगती महामार्गाला लागली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत आले होते. आता
कधी पोचू यापेक्षा किती उशीर होणार याचीच गणितं सगळे प्रवासी मांडत होते.
खालापूरच्या मॉलवर चहासाठी मोजून १० मिनिटं थांबून बस पुढे निघाली. पण हाय रे
दैवा! घाट सुरु होतांना एका वळणावर एक भला मोठा कंटेनर असा विचित्र तिरका बंद पडला
होता. रांग वाढत होती. महामार्ग पोलीस येऊन त्यांनी पलीकडच्या मार्गिकेतून एक एक
वाहन सोडायला सुरुवात करुन गाड्या सरकेपर्यंत आठ वाजून गेले. मग लोणावळ्याला खास
लोकाग्रहास्तव अर्धा तास ‘हाल्ट’. चहा पाणी उरकून गाडी मार्गस्थ झाली आणि
महामार्गावरुन देहू कात्रज बाय पास वर आली तर साडेनऊची वेळ दाखवत होतं घड्याळ. मग
हिंजवडीची गर्दी. कोथरूडला उतरलो तेव्हा पावणे अकरा. तिथेच एका गाडीवर पोटात
काहीतरी ढकललं आणि घरी येऊन अंथरुणाला पाठ लावली, पाच मिनिटात ‘डाराडूर –
पंढरपूर’.
सकाळी जरा उशीरच झाला
उठायला. तोंडावर पाणी मारुन चहा केला आणि चहा प्यायला टेबलाशी येऊन बसले. तर
काहीतरी वेगळंच वाटलं. म्हणजे दहा दिवस घर बंद होतं, तर टेबलावर धूळपाटी करता येईल
इतकी धूळ हवी होती. पण टेबल स्वच्छ. मी घाईने उठून स्वयंपाकघरात गेले. तिथेही ओटा,
मागचा rack, मिक्सरचं टेबल सगळं स्वच्छ. मी बुचकळ्यात पडले. बाहेर आले. बाहेरचं
सेंटर टेबल, सोफ्याच्या मागे, टेबलाजवळच्या खुर्च्या, आरसे, खिडक्यांच्या चौकटी
कुठेही धुळीचा कण नाही. बाथरूम स्वच्छ – आत्ताच धुवावी अशी. आणि दरदरुन घाम फुटला.
व.पु.काळ्यांची कथा आठवली. घरात भूत राहत असतात ती. (नुकताच सिनेमा पण पाहिला होता
त्या कथेवरचा.) म्हणजे आपल्या घरात कुणी एकबोटे आलेत की काय?
धावत जाऊन ह्यांना
उठवलं.
“कटकट करु नको. घर
साफ करायला मदत करीन असं कबूल केलंय ना? थंड घे जरा. झोपू दे शांत.”
पांघरूण खेचलंच. हात
धरुन बाहेर आणलं, सगळीकडे फिरुन दाखवलं, शंका बोलून दाखवली. विचारमग्न चेहरा करुन
ते सोफ्यावर पसरले. माझ्या शंकांची उत्तरं नव्हती त्यांच्याकडे. आम्ही वेगवेगळे
तर्क लढवत राहिलो. पण चेटूक या एकाच उत्तरावर येऊन आम्ही थांबत होतो.
अत्यंत अस्वस्थ
मनस्थितीत मी अंघोळीला गेले आणि दचकले. खरंच ‘कोणी’ असलं तर? व्यंकटेश स्तोत्र मोठमोठ्याने
म्हणत आंघोळ ‘उरकली’. स्वयंपाकाकडे वळले. बेल वाजली. दारात वॉचमन.
“तुमची बाई आज येणार
नाही.” बरं म्हणून मी वळले. शून्य प्रतिक्रिया बघून तो बावचळला. काहीतरी पुटपुटला.
माझ्या मनात संशय – हा का असा बघत होता घरात? याला माहित आहे - घरात भूत शिरलंय
ते? शेजारणीजवळ काही बोलावं तर तिच्या घराला कुलूप. नेहमी चिठ्ठी टाकून किंवा
whats app मेसेज करते, आज न सांगता कशी गेली? काही कळलंय म्हणून घाबरली नसेल ना?
आता माझ्या हाता-पायातलं त्राण जायला लागलं. काय करू? कुणाला सांगू? पोलिसात जाऊ?
पण सांगू काय? घरात भूत आहे असं? मग कोणी मांत्रिक बोलवावा का? पण त्याला कुठे
शोधणार? सिनेमातल्या, टीव्हीतल्या बायांकडे बरे असतात सगळ्यांचे नंबर्स?
संध्याकाळी खाली
सोसायटीत जाऊन बसले. एकेकीचा अंदाज घेत होते, आणखी कुणा-कुणाला असे अनुभव आलेत. तर
समोरच्या गोडबोले वहिनी सांगत होत्या, “अहो ४ दिवस झाले हा प्रकार होतोय रोज. काय
चेटूक आहे कळत नाही. रोज आपली मन्याच्या सायकलवर घाण पडलेली.” अच्छा! म्हणजे यांनाही
चेटूक असल्याची शंका आहे तर. मी काही बोलणार इतक्यात मणेरीकर काकू फट्कन बोलल्या,
“काहीतरीच काय. चेटूक वगैरे काही नसतं. फालतूपणा आहे सगळा.” गप्पच बसले. आपल्याकडे
काही पुरावा नाही, उगाचच हसं व्हायचं.
रात्री जेवण उतरेना
घशाखाली. अस्वस्थता इतकी वाढली. घशाला कोरड पडायला लागली सारखी. ‘मालक’ निवांत.
“आपण पूजा करू दोन दिवसांनी. मग बरं वाटेल तुला.” झोप येईना. खुट्ट वाजलं तरी दचकत
होते. सारखी उठून घरात फिरत होते. अंदाज घेत होते. कुठे काही घडतंय का, काही वस्तू
सरकतायत, काही हालचाल जाणवतेय का. माझ्या सततच्या हालचालीने ह्यांची झोप मोडत
होती. शेवटी ते वसकले “आता झोप गुपचूप. नाहीतर बांधून ठेवतो पलंगाला.” माझी बोबडी
वळली. “देवाssss, ह्यांना ‘धरलं’ की
काय. मला पलंगाला बांधतो म्हणतायत.” सोफ्यावर बसून रामरक्षा म्हणत राहिले सकाळ
होईपर्यंत. सकाळ झाली तरी मी बसून. मग ह्यांनी मला हाताला धरुन आत नेऊन झोपवली आणि
चहाच्या मागे लागले. त्यांच्या हातचा चहा प्यायचीही भीती वाटायला लागली. “त्यांना ‘धरलं’
असलं तर तो चहा पिऊन माझं काहीतरी मांजर-पोपट होईल. नको रे देवा! माझ्या
मुला-नातवंडांच्यात सुखाने राहायचंय मला.” उठून हळूच स्वयंपाकघरात डोकावून आले,
कालची खरकटी भांडी तशीच होती. हायसं वाटलं. “रात्रभर म्हटलेल्या रामरक्षेचा प्रभाव
- दुसरं काय. रामराया, अशीच कृपा ठेव रे बाबा माझ्या घरा-संसारावर.” मग घरात नजर
फिरवली. काल जे जसं दिसलं त्यात फारसा फरक नव्हता पडलेला. रामरक्षेच्या प्रभावावरचा
माझा विश्वास आणखी दृढ झाला. तरी भीती काही पाठ सोडत नव्हती. ‘आन्हिकं’ उरकायला
धीर होत नव्हता.
बेल वाजली. इतक्या
सकाळी कोण? दर उघडलं तर पल्लवीबाई. मला हाताने बाजुला सारुन घाईघाईने घरात शिरली.
“काय गं, आज इतक्या लवकर? आणि इतकी घाई कसली?” माझा संशयाने भरलेला प्रश्न.
“माज्या नवऱ्याचे
मामा आलेत. त्यान्ला डायलिस कराच आहे. धा दिवस ऱ्हाणार. मी अशीच लवकर येईल धा
दिवस. तेवढं आडजस करून घ्या. माज्या नवऱ्याला त्यांनीच मोटं केलंय. म्हातारं मानुस
कुटं जानार. आपण बगाय पायजे ना.”
एकीकडे तोंडाचा
पट्टा चालवत ती भांड्यांवर हात चालवत होती. “वाच्मेनजवळ निरोप दिल्ता सुट्टीचा.
त्याने सांगितला का? परवा सांजच्याला आल्ती मी. म्हणल तुमी येणार आन मग कालच्याला
माजी सुट्टी. तुमाला लय काम पडेल. म्हणलं आपन सफाई तरी करून जावं.”
“तू आली होतीस?” मी
तार स्वरात किंचाळले. पण ती आपल्याच नादात.
“तुमच्या
श्येजार्नीला म्हणल बाई दार उगडून देतीस का? दिलं तिनं. हितच बस्लीवती बुकं वाचीत.
तिला म्हणल निरोप दे आजीना, तर कुटं भायेर जानार म्हणली. मंग वाच्मेनला म्हणलं,
बाबा तेवडा निरोप दे आजीना.”
भांडी उपडी घालून
तिने फराफरा केरसुणी फिरवली, फडकं फिरवली आणि खोचलेले ओचे सोडून निघाली. जातांना
मला पुन्हा एकदा बजावलं, “आता धा दिवस आशीच लवकर यील मी हां आजी. काय जादा काम आसल
तर नंतर करील. तुमी काय फिकर नका करु.” पाठीमागे दार ओढून घेऊन ती गेली. आम्ही जे
हसत सुटलो. कालपासून त्या एकबोट्यांच्या पोरांनी प्राण कंठाशी आणले होते. भुताचे
सिनेमे, मालिका बघायला, किस्से ऐकायला-सांगायला गोड वाटतं. पण आपल्या घरात भूत आहे
या कल्पनेने सुध्दा माझी पांचावर धारण बसली होती.
इति किंचित रहस्यकथा|
Comments
Post a Comment