वर्तुळ
#वर्तुळ
बापू झोपाळ्यावर बसले होते. जिजी समोर दारात बसून दुर्वा निवडत होत्या. आज चतुर्थी. फाटकाशी गाडी थांबली. फाटक उघडून सुधीर गाडी घेऊन आत आला.
“अगबाई, असा अचानक कसा आलास?
गेल्या महिन्यात रोहन १२वी पास झाला, तेव्हा तर सगळी येऊन गेलात.”
असं म्हणत जिजी लगबगीने उठल्या.
सुधीर आत येऊन झोपाळ्याजवळ मुढ्यावर टेकला. जिजींनी पुढे केलेल्या तांब्यातलं पाणी प्यायला. किरकोळ बोलणं होईपर्यंत जिजींनी चहा करून आणला.
“थालीपीठ लावते, आज चतुर्थी आहे, जेवायला जरा उशीरच होईल.”
आज जाऊन गरम थालीपीठ, त्यावर लोण्याचा गोळा घेऊन आल्या. खाऊन झाल्यावर सुधीर मागच्या अंगणात जाऊन आंघोळ करून आला. इकडचं तिकडचं किरकोळ बोलत वेळ काढत राहिला. त्याची चलबिचल जिजी आणि बापू दोघांच्या लक्षात आली, पण तो आपणहून बोलेल म्हणून दोघं गप्प राहिली.
जेवणं उरकल्यावर बापूंनी थेट विचारलं.
थोडा घुटमळला. मग बोलायला लागला. बांध फुटून पाणी वाहावं तसा. रोहनने परस्पर अमेरिकेत कुठल्याशा विद्यापीठात प्रवेश परीक्षा दिली होती आणि १२वीचे मार्क कळवल्यावर त्याला प्रवेश मिळाल्याचं पत्र आलं होतं. तो काही वेगळा विचार करायला तयार नव्हता. त्याला जायचंच होतं.
“१५ दिवसांनी निघेल.”
एक विचित्र स्तब्धता.
“मी असाच – मागे न बघता, कसलाही विचार न करता, तुमचं न ऐकता मुंबईला निघून गेलो होतो. तुम्हाला वाईट वाटलेलं, तुम्ही मनातून खचलेलं मला कळत होतं; पण वयाची, शिक्षणाची मस्ती होती डोक्यात. इथे शिक्षण मिळालं, तसं थोडी वाट बघितली तर कामही मिळेल हे तुमचं म्हणणं कानात शिरलं पण डोक्यात नाही शिरलं. आणि आज रोहन शिक्षण पूर्ण होईपर्यंतसुद्धा थांबायला तयार नाही. ऐकतच नाही काही.....
गेले १५ दिवस तुमचा चेहरा सारखा येतोय डोळ्यासमोर. तुमची कशी आणि किती उलघाल झाली असेल त्याचा अनुभव घेतोय....”
“ मग आता?”
“आता काय, तो थांबणार नाहीच. पण तुमची मी किती निराशा केली, ते इतक्या वर्षांनी जाणवलं. वाटलं, तुमच्याजवळ बोललो तर छातीवरचं ओझं कमी होईल. आजपर्यंत रोहनला उत्तम संधी मिळाव्या म्हणून धावत राहिलो. आता पैसे पाठवण्यासाठी ...”
जिजींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि उरलेलं अवसान गळून पडून तो त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून लहान मुलासारखा स्फुंदत राहिला.
राधा मराठे
Comments
Post a Comment