माझं काही अडत नाही
बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव होऊन २ दिवसांत मामी गेल्या. घटना धक्कादायक खरीच. पण शेजारी, नातेवाईक यांनी आधार देऊन सगळं करवून घेतलं.
१५ दिवस राहून मुलं आपापल्या घरी गेली. आणि हरिभाऊ एकटे राहिले. ४५ वर्षांचा सहवास, नाही म्हटलं तरी चुकल्या-चुकल्यासारखं झालंच त्यांना. कामाच्या बायका नियमित येत होत्या. महिनाभरात हरिभाऊंचा दिनक्रम पूर्ववत सुरु झाला.
धुण्याचं मशीन लावण्याचं काम वाढलं, पण ते तसं सोपं होतं. भांडी किरकोळ असायची. ती स्वयंपाकाच्या बाई घासायच्या. एका माणसाचं काम कमी झालंय तर त्याऐवजी हे करा असा युक्तीवाद करून हरिभाऊंनी त्याची सोय करून टाकली. आत्तापुरतं तरी मिटलं म्हणून ते निवांत झाले.
त्याच महिनाभरात केर-लादीच्या बाईंनी २-३ दांड्या मारल्या. हरिभाऊ वैतागले. त्यांना हटकलं तर त्यांनी आवाज वाढवला. “दुसरी बाई बगा तुमी, वयनी कवा काय बोलल्या नाय मला.”
गप्प बसले.
पुढच्या महिन्यात वीज कापली गेली. त्यांनी घाबरून मुलांना फोन केला. मोठा आला २ दिवसांनी. तोपर्यंत मेणबत्त्या, मोबाईल टॉर्च यावर भागवलं. मुलाने आईचे ड्रॉवर्स धुंडाळले. वीज बिलांची आणि पावत्यांची फाईल सापडली. बाजुला गॅस, सोसायटी अशा इतर फाईल्स पण होत्या. “बाबा, बिल भरलं नाही तर कापणारच ना कनेक्शन.” तो जाऊन ॲडव्हान्स पैसे भरून आला. २ महिने निश्चिन्ती. मग गॅस बिलाचं हेच झालं. यावेळी तो म्हणाला, “आई सगळं वेळेवर करत होती, म्हणून काही अडचण आली नाही यापूर्वी. आता तुम्हाला लक्ष घालावं लागेल बाबा. दरवेळी मी कसा येऊ?”
ते चमकले. मग काय काय आठवत राहिलं.
“जास्त शहाणपणा करू नको. मला काही गरज नाहीये तुझी, काही अडत नाही माझं तुझ्यावाचून.” असं ते म्हणत असत मामींना. पण ऑनलाईन पेमेंट सुरु झाल्यापासून मामी कधी बिल भरायला गेलेल्या पाहिल्या नव्हत्या त्यांनी. त्यांनी मामींचा फोन तपासला. त्यात कुठेही ऑनलाईन पेमेंटची नोंद नाही सापडली. “मग काय करत होती ही?” या प्रश्नाने त्यांना भंडावून सोडलं.
मामी फारशा शिकलेल्या नव्हत्या पण व्यवहारचतुर होत्या. काय केलं असावं नेमकं? डोकं काम करेना, प्रश्नाचं उत्तर सापडेना.
२ दिवसांनी कोपऱ्यावरून भाजी घेऊन येतांना वाटेतल्या सेवा केंद्रावर काम करणाऱ्या मुलीने हाक मारली.
“मामी गेल्या असं कळलं कालच. मी रजेवर होते, म्हणून लगेच नाही कळलं.”
“तुम्ही कशा ओळखता तिला?” हरिभाऊंचा प्रश्न.
“अहो, बिलं भरायला यायच्या ना.”
“बिलं?” हरिभाऊंना आश्चर्य वाटलं.
“हो (आता त्या मुलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य). वीज, गॅस, मुन्सीपाल्टी असे ऑनलाईन पैसे भरायला यायच्या ना बिल घेऊन. मी ऑनलाईन भरून द्यायची आणि त्या मला कॅश द्यायच्या. १५ रुपये एका पेमेंटचे जास्त द्यायच्या.”
हरिभाऊ घरी येऊनही त्याच विचारात होते. लाईन लावावी लागते म्हणून बिल भरणं हे काम त्यांनी मामींवर ढकललं होतं. तासंतास लाईनीत उभं राहून घामाघूम होऊन यायच्या मामी. पण ऑनलाईन पेमेंटची सुविधा आली तरी हरिभाऊंनी लक्ष घातलं नव्हतं. घरबसल्या फोनवर ते करणं कठीण नव्हतं. पण नाही केलं आणि बायको काय करतेय यात लक्षही नाही घातलं.
सेवाकेंद्रावर जाऊन बिलं भरण्याची कल्पना मामींना सुचली याचं हरिभाऊंना फार आश्चर्य वाटत राहिलं.
पदवीधर नाही म्हणून आपण सतत तिला हिणवत राहिलो, माझं तुझ्यावाचून काही अडणार नाही असं ऐकवत राहिलो आणि तिच्याच थोड्या चतुराईमुळे ही कामं निर्वेध होत राहिली याचा आपल्याला पत्ता सुद्धा लागला नाही एका घरात राहून.
आता ही सगळी apps घालून घेऊन नव्याने काही व्यवहार करण्यापेक्षा आहे तेच सुरु ठेवावं असं त्यांनी ठरवलं.
मनोमन खजील झाले, बायकोची मनोमन क्षमाही मागितली. पण ते केवळ आपल्या मनाचं समाधान हे त्यांना कळत होतं. ती किती दुखावली असेल, अपमान वाटला असेल आपल्या शब्दांनी, तसंच दुखरं मन घेऊन वावरत राहिली.
हरिभाऊंना भरून आलं. आणि ५-६ महिन्यांनी त्यांना पत्नी वियोगाचं खरं दुःख जाणवलं.
#माझं_काही_अडत_नाही
राधा मराठे
Comments
Post a Comment