शॉक ट्रीटमेंट

 #शॉक_ट्रीटमेंट 


अपघाताची बातमी कळताच मामींचा मोठा मुलगा मिळालेल्या पहिल्या फ्लाईटने अमेरिकेत पोचला. त्याचा धाकटा भाऊ आणि भावजय गाडीच्या भीषण अपघातात जागीच गेले होते. १४ वर्षांची मुलगी सारा घरी होती, ती वाचली. पोलीस आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात दीड-दोन महिने गेले.  मित्रमंडळींनी खूप मदत केली. अपघातात आईवडील गमावलेली सारा नाईलाजाने काकाबरोबर भारतात आली. आजी आणि काका-काकू तिला मुळीच आवडत नसत. जुनी, बुरसटलेल्या मतांची टिपिकल भारतीय मनोवृत्ती असं वाटे तिला. नाही म्हणायला तिचा चुलत भाऊ भास्कर जरा बरा वाटायचा. हुशार होता, व्हरनॅक भाषेत शिकूनही उत्तम इंग्लिश बोलायचा. ॲक्सेन्ट टिपिकल होता, पण शब्दभांडार उत्तम होतं. दिसायलाही बरा होता, अगदी भारतीय फिल्मी हिरोसारखा. आत्ता परिस्थितीने तिच्यासमोर काही पर्यायच ठेवला नव्हता, यावंच लागलं तिला.


भारतात येऊन पुन्हा सरकारी सोपस्कार.  तिच्या वडिलांची संपत्ती विकून आणि विम्याचे आलेले पैसे या सगळ्याची तिच्या नावाने योग्य ती गुंतवणूक करण्यात ५-६ महिने गेले.


दरम्यान इथल्या उत्तम शाळेत तिचं नाव घातलं,  तिच्यासाठी आजीच्या खोलीत स्वतंत्र सोयही केली गेली.


पण सारा काही केल्या इथे रमत नव्हती. तिला सारखी अमेरिका आठवायची आणि अटळपणे तुलना व्हायची. १-२ वेळा सुटीला आली तेव्हाची गोष्ट वेगळी. आता कायम राहायचं म्हणजे जड जात होतं. काकू आणि भास्कर तिला शक्य तितकं सांभाळून घेत होते. तिचे नखरे, उर्मटपणा, आळशीपणा डोळ्यांआड करत होते. काका काही बोलत नव्हता. मामी काही बोलत नव्हत्या, पण त्यांची नाराजी चेहऱ्यावर दिसायची स्पष्ट.


परीक्षेत तसे बरे मार्क मिळाले तिला. इतका मोठा आघात, पूर्ण बदललेलं वातावरण, शिक्षण पद्धती पूर्ण वेगळी, शाळेची शिस्त आणि इतर वातावरणात जमीन अस्मानाइतकं अंतर.. तरीही बरे मार्क मिळाले.


काकूने कौतुकाने घरात गोड केलं, ४ जणांजवळ कौतुक केलं. तिला विचारलं, “काय घेऊ या तुला गिफ्ट?”

ताडकन तिने उत्तर दिलं, “मला परत पाठव. तिथल्या गर्ल्स हॉस्टेलवर राहीन मी. बाबाचे फ्रेंड्स आहेत, तिकडे जाईन व्हेकेशनला.”

काकूचा चेहरा पडला.


हे तर नेहमीचंच होतं. आजीशी तर ती बोलतच नसे. काकूला सतत उलट उत्तरं, नोकराशी सुद्धा कुणी बोलत नसेल असं उर्मट बोलणं. मामींचा पारा दिवसेंदिवस चढत होता. तिचे कपडे हा तर सर्वात मोठा मुद्दा. दहा वेळा समजावून सांगून ऐकत नाही म्हटल्यावर एक दिवस ती घरात नसतांना सगळे कपडे बोचक्यात बांधून नाहीसे केले आणि काकूने आणलेले सलवार सुट्स, पँट्स आणि इतर कपडे घालायची सक्ती केली. घराचं कुरुक्षेत्र झालं. आत्ताच्या आत्ता अमेरिकेला जायचं म्हणून ती किंचाळत सुटली. माझ्या बाबांचे पैसे लुबाडायचे आहेत असा आरोपही केला काकावर.

आता मामींचा संयम संपला. जागच्या उठून बाहेर गेल्या आणि एक सणसणीत ठेवून दिली. तिच्यासकट सगळं घर एकदम स्तब्ध झालं. तिला हाताला धरून त्या खोलीत घेऊन गेल्या.


उशीत डोकं खुपसून ती रड रड रडली. तशीच झोपली. एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तिला. मामी तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होत्या. उठून सगळी आन्हिकं उरकल्यावर मामींनी जवळ बसवून तिला २ घास खायला लावले आणि तिच्या पाठीवर हात ठेवून त्या बोलायला लागल्या.


मुलगा गमावला त्याचं त्यांना झालेलं दुःख, भाऊ गेला त्याचं काकाला झालेलं दुःख, काकूवर अचानक वाढलेली जबाबदारी, भास्करचं तिच्यासाठी काही ना काही करत राहणं..... दहा बाजुंनी समजावत राहिल्या. तिच्या बाबांचा एक पैसाही काका घरात वापरत नाही, तिचा सगळा खर्च तोच करतोय त्याची कागदपत्रं दाखवली. जास्तीचा खर्च झेपवतांना काका-काकूची उडणारी तारांबळ सांगितली. तिला किती कळलं, उमगलं त्याचा विचार न करता अथक बोलत राहिल्या.


“सारा, आता इथे आली आहेस, तर इथली जीवन पद्धती तुला स्वीकारावी लागेल. त्याला पर्याय नाही. वेळ लागेल, त्रास होईल याची कल्पना आहे आम्हा सगळ्यांना. पण तू प्रयत्न केलेस तरच आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू शकू. काल इतकी रडलीस, आज मोकळं वाटतंय ना?

आई बाबांची आठवण येणारच. ती आली तर खुशाल रड. कुणी काही म्हणणार नाही तुला. पण जे वाट्याला आलंय ते स्वीकारायची तयारी ठेवावीच लागेल तुला. चिडचिड करून फक्त मनस्ताप - तुला आणि आम्हालाही. शिवाय बाहेरच्यांना अकारण कुचाळक्या करायला, तुझे कान भरायला संधी. जबाबदारी घ्यायला काका-काकूच पुढे येतील, दुसरं कुणी नाही हे पक्कं लक्षात ठेव.”


किती कळलं, पटलं ते कळायला मार्ग नव्हता. ८ दिवस ती गप्प होती, घरात मुकाट वावरत होती. मग एक दिवस सकाळी दूध प्यायलेला ग्लास आपणहून सिंकमध्ये नेऊन ठेवलेला पाहिला मामींनी, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी दिलेली शॉक ट्रीटमेंट परिणामकारक ठरत होती. बोळा निघून पाणी हळूहळू वाहायला लागणं महत्त्वाचं होतं. झिरपायला सुरुवात तर झाली होती. आता कितीही वेळ लागला तरी त्यांची वाट बघायची, थोडं दुर्लक्ष करायचीही तयारी होती.


राधा मराठे


Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न