दुसरं लग्न
उमेश रिक्षातून उतरला आणि बॅग घेऊन सोसायटीत शिरला. लिफ्टमधून बाहेर पडला तर घराचं दार उघडं आणि आतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज. कोण असेल असं नवल करीत तो घरात शिरला. समोर सिंगल सोफ्यावर त्याची आई-स्नेहा बसली होती आणि दाराकडे पाठ करून मोठ्या सोफ्यावर कुणीतरी पुरूष बसला होता. करडे केस, मागून टक्कल पडायला सुरूवात झालेली. त्याला बघून आई एकदम खुष होऊन उठली. “अरे, तू अचानक आज? उद्याचं तिकीट आहे म्हणाला होतास ना?” तिच्या मनातला आनंद लपत नव्हता. त्याचे हात धरून तिने त्याला सोफ्यावर बसवला आणि पाण्याचा ग्लास भरून त्याच्या हातात दिला. पाणी पिऊन तो म्हणाला, “अगं, अचानक आजची फ्लाईट आहे असं कळलं. तिकीट बदलून मिळालं. म्हटलं तुला सरप्राईज द्यावं.” ती खुषीत हसली आणि त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाली, “बरं केलंस.” मग त्या माणसाकडे वळून म्हणाली, “हा माझा मुलगा उमेश. आणि उमेश हे श्री. अरूण. नुकतेच आलेत आपल्या सोसायटीत राहायला. पलिकडच्या विंगमधला राजाध्यक्षांचा फ्लॅट घेतलाय त्यांनी. xxx कंपनीतून नुकतेच रीटायर झालेत.” मग परत त्यांच्याकडे वळून म्हणाली, “मी चहा करतेय, तुम्ही घेणार का परत?” पण उमेश म्हणा...