निवड
१ तारखेला सकाळी पगार जमा झाल्याचा बँकेचा मेसेज आलेला दिसला आणि सायली त्या पाच आकडी संख्येकडे डोळे भरून बघत राहिली. पदवीधर झाल्यापासून गेली दोन वर्षं ती नोकरी करत होती , पण पगार चार आकडी संख्येतच थांबला होता. कंपनी तशी छोटी असल्यामुळे तो वाढण्याची संधीही फार कमी होती. पण मालकांनी तिला एम.बी.ए.चे क्लासेस करण्यासाठी सकाळी लवकर येऊन संध्याकाळी लवकर जाण्याची परवानगी दिली होती , म्हणून ती तिथे टिकून राहिली होती. एम.बी.ए.चा रिझल्ट लागल्याबरोबर तिने मोठ्या कंपन्यांत अर्ज करण्याचा सपाटा लावला होता. २-३ महिन्यांत तिला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळालीही होती. आणि आज पहिला पगार .... तिचा आनंद मनात मावेना. तिने धावत जाऊन आईला ही बातमी सांगितली , मेसेज वाचूनही दाखवला. आईने कौतुकाने देवापुढे साखर ठेवली. तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून म्हणाली , “ आता शनिवारी बाजारात जाऊन ४ मनाजोगे कपडे , पर्स आणि इतर ४ गोष्टी घे तुझ्यासाठी. फार कष्ट केलेस अभ्यासाचे. जरा हौस कर आता. ” आईचे शब्द ऐकून ती भरून पावली. आईला न सांगता तिचं मन कळायचं नेहमीच. फार कधी बोलायची नाही ती. पण अशी नेमकं बोलायची कधीतरी , आणि सायलीचं मन भरू...