स्वीकार
कंपनीच्या पैशांचा गैरव्यवहार केलेला उघडकीला आल्यावर पोलिसांच्या भीतीने राजाभाऊ फाटकांनी आत्महत्त्या केली आणि पाठोपाठ त्यांच्या पत्नीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला त्याला आता ३ महिने होऊन गेले. मिडीयातून हे प्रकरण मागे पडलं. त्या घटनेनंतर यशवंतराव सरनाईकांची दिलदार, सहृदय उद्योगपती म्हणून प्रतिमा उजळून निघाली होती. कारण पैशांचा अपहार करून आत्महत्त्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या अनाथ झालेल्या एकुलत्या एक तरुण मुलीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तिला २५ लाख रुपये रोख दिले होते. या घटनेचेही पडसाद बरेच दिवस मिडीयात उमटत होते. राजाभाऊंच्या मुलीने मात्र या दरम्यान फार कुणाशी न बोलता काही निर्णय घेऊन ते तातडीने अंमलात आणले. तिच्या बाबांचे पीएफ आणि इतर ड्युज, यशवंतरावांनी दिलेले २५ लाख, घर आणि इतर वस्तू विकून आलेले पैसे असे सुमारे सव्वा कोटी रुपये उभे करून तिने एक ट्रस्ट केला. अफरातफरीच्या आरोपाखाली नोकरी गमवावी लागलेल्यांच्या किंवा या कारणासाठी आत्महत्त्या केलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असं उद्दिष्ट ठरवलं. स्वत:साठी एक छोटी खोली भाड्याने घेतली. मोजकं सामान, ३-४ महिने उदरनिर्वाह होईल इतके पैसे.
यशवंतरावांचा तरुण
मुलगा चारुदत्त नुकताच त्यांच्या हाताशी येऊन बरोबरीने काम करत होता, त्यालाही वर्ष
उलटून गेलं होतं आणि आता धंद्यावर आलेलं तात्पुरतं मळभ दूर सारुन रोजचे व्यवहार
सुरळीत सुरु झाले होते. नव्याने नेमलेले सीए जरा बिचकत आणि अति काळजीपूर्वक काम
करत होते. एक दिवस सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे यशवंतराव चहा घेत होते. त्यांच्या
चहाच्या वेळी कुणाला आत सोडायचं नाही अशा सक्त सूचना होत्या शिपायाला. पण तरीही तो
बेल वाजवून डोकावला. कपाळाला आठ्या पाडून त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. ओशाळल्या
स्वरात तो म्हणाला, “नाही... ते फाटक साहेबांची .... आपलं ते
फाटकांची मुलगी आल्येय तुमाला भेटायला. आत्ताच भेटायचं म्हंत्यात. थांबायला राजी
नाहीत.”
“पाठव.” यशवंतराव
विचारात पडले. “आता काय काम असेल? पैसे दिले ते तर घेतले चुपचाप. बघू तर.”
उरलेला चहा एका
घोटात संपवून त्यांनी चेहऱ्यावरून रुमाल फिरवला. तो फाटकांची मुलगी – सरस्वती - आत
आलीच. दारावर टकटक करणं, आत येऊ का विचारणं या सगळ्या शिष्टाचारांना फाटा
देऊन सरळ आत आली, दारातून मागे वळून शिपायाला म्हणाली, “मी काही
महत्त्वाचं बोलणार आहे. मी बाहेर आल्याशिवाय कुणाला आत सोडू नको आणि फोनही देऊ नको
असं सांग सेक्रेटरीला.”
यशवंतरावांच्या
कपाळावरची शीर फुगली. इतका उद्दामपणा त्यांच्यासमोर आजपर्यंत कुणी केला नव्हता.
अगदी राजाभाऊ इतके जुने कर्मचारी होते, उद्योग सुरु केल्यापासून त्यांच्याबरोबर
काम करत होते, तरी तेही आपली अदब सांभाळून वागत बोलत असत. आणि
ही कालची मुलगी .....
पण त्यांना फार
विचार करायला संधीच दिली नाही तिने. सरळ समोर खुर्चीत येऊन बसली आणि हातातल्या
फोल्डरमधून काही कागद काढून त्यांच्या समोर ठेवले.
“काय आहे?”
“बघा उचलून. ज्या
अफरातफरीसाठी माझे वडील पकडले गेले आणि नंतर त्यांनी जीव दिला त्याच्या संबंधी
कागद आहेत. आणि या कागदांवरून स्पष्ट कळतंय की माझ्या वडिलांना यात नाहक गोवलं
गेलंय. बळीचा बकरा केलं गेलंय.”
यशवंतरावांनी
घाईघाईने ते कागद उचलून बघितले. त्यांच्या घशाला कोरड पडली. टेबलावरचा ग्लास उचलून
गटागटा पाणी प्याले ते.
“हे तुझ्याकडे कसं
आलं?”
ती खुनशी हसली.
“माझं नाव सरस्वती ठेवलं माझ्या वडिलांनी ते उगीच नाही. बुद्धीचं वरदान आहे मला.
कॉम्प्युटर हे खेळणं आहे माझं. पासवर्ड क्रॅक करणं माझ्या हातचा मळ आहे. तुमच्या
प्रेमपात्रावर तुम्ही खर्च केलेले पैसे बेमालूमपणे दुसऱ्या खर्चात जिरवले माझ्या
बाबांनी तुमच्याच सांगण्यावरून आणि तुमच्या मुलाच्या ते लक्षात आल्यावर माझ्या
बाबांनी अपहार केला असं सांगितलंत खुशाल. घरी आल्यावर बाबांनी मला सगळं सांगितलं
होतं. त्यात तुमच्या सिक्रेट फाईल्स एका फोल्डरमध्ये आहेत असं बोलले होते ते. त्या
रात्रीच बाबांनी जीव दिला आणि पाठोपाठ १५ दिवसांत आई गेली माझी. एकटी पडले मी.
बाबांच्याबद्दल तमाम पत्रकारांनी ओकलेलं गरळ निमूट पचवलं. तुमच्यासारख्या
देवमाणसाशी बेईमानी करणाऱ्या नीच माणसाची मुलगी म्हणून जग बोटं दाखवतं माझ्याकडे.
तेही झेलतेय मी गेले दोन-अडीच महिने. बाबांच्या लॅपटॉप मधून मोठ्या कष्टाने ते फोल्डर शोधले मी.
पासवर्ड क्रॅक करून ही माहिती गोळा केली. आता बोला, यशवंतराव सरनाईक..... बाबांच्या मृत्यूची
भरपाई म्हणून २५ लाख दिलेत मला. आता या गुपिताची किती किंमत देऊ शकता?”
एका दमात सगळं बोलून
ती थांबली. आपली नजर त्यांच्या चेहऱ्यावर रोखून त्यांच्या उत्तराची वाट पाहत
असल्यासारखी बघत राहिली.
यशवंतरावांच्या
कपाळावरून घामाच्या धारा वाहायला लागल्या. अंग थरथरू लागलं. चारुदत्तची आई
गेल्यानंतर बरीच वर्षं ते व्रतस्थ राहिले होते. पण दहा वर्षांपूर्वी काही कामासाठी
बंगलोरला गेलेले असतांना एका दुबळ्या क्षणी ते हरले होते, आणि त्याची किंमत
ती बाई पुरेपूर वसूल करत होती. राजाभाऊंना विश्वासात घेऊन तो खर्च ते कंपनीच्या
खर्चात जिरवत राहिले. चारुदत्त कंपनीच्या कामात लक्ष घालायला लागल्यावर त्याला
काही शंका आल्या. आपल्या सीए मित्राच्या मदतीने त्याने शोध घेतला आणि लक्षात आलं, लाखो रुपये हिशेबात
दाखवलेल्या कामासाठी खर्च झालेच नव्हते. तिसरीकडेच गेले होते. त्याने वडिलांच्या
कानावर घातलं. यशवंतराव सावध झाले आणि हुशारीने त्यांनी सगळा दोष राजाभाऊंच्या
डोक्यावर टाकला. दुसऱ्या दिवशी त्यांना विश्वासात घेऊन सगळं निस्तरू असा विचार
केला. पण पापभीरू राजाभाऊ पोलीस, अटक या शब्दांनी धास्तावले आणि रात्रीच जीव देऊन
बसले. गंगेच्या पाण्यासारखं चारित्र्य असलेल्या आपल्या नवऱ्यावर आलेला आळ, त्याने केलेली
आत्महत्त्या याने हाय खाऊन त्यांच्या बायकोला तीव्र हृदय विकाराचा झटका आला आणि
नवऱ्याच्या पाठोपाठ पंधरा दिवसात तीही गेली. राजाभाऊंसारखा विश्वासू आणि भीरु
सहकारी गमावल्याचं दु:ख करायचं, मुलासमोर अब्रू वाचली याचं समाधान मानायचं की
आता या खर्चाची तरतूद कशी करायची यासाठी नवा मार्ग शोधायचा अशा तिहेरी कात्रीत ते
सापडले होते. आणि आज हा चौथा घाव. सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ डोळ्यासमोर आल्या आणि
ते खुर्चीतून खाली कोसळले. तिने घाईने त्यांच्या हातातले कागद काढून ताब्यात घेतले
आणि दार उघडून शिपायाला हाक मारली. तो धावला. त्यांची अवस्था बघून घाबरला. सगळं
ऑफिस तिथे गोळा झालं. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांना तीव्र
स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरनी सगळं ज्ञान पणाला लावून त्यांचा
जीव वाचवला. ते त्यातून थोडे सावरले,
धोका पूर्ण टळला नव्हता. जीवावर बेतलेलं शेपटावर
निभावलं होतं. १५ दिवसांनी ते घरी गेले.
एक दिवस सरस्वती
पुन्हा त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेली. नोकराने तिला बसवलं आणि आत वर्दी
दिली. बाहेर येऊन तिला आत घेऊन गेला. त्यांची अवस्था बघून ती चकित झाली.
चेहऱ्यावरचा सगळा रुबाब, तेज, ताठा पार नाहीसा झाला होता. अगदी विकल
झाले होते ते. खुर्चीकडे हात करून तिला बसायला सांगितलं त्यांनी.
“बरी आहे का तब्येत?”
“हो. तू ज्यासाठी
आली आहेस ते बोल.”
तब्येत ढासळली तरी
मूळ मुद्दा लक्षात होता त्यांच्या.
“मी काय बोलणार.
तुम्ही सांगा तुम्ही काय किंमत चुकवाल ते.”
“मांजराने उंदराला
मारण्यापूर्वी खेळवावं तसं करू नको. स्पष्ट सांग तुझी काय अपेक्षा आहे.”
ती क्षणभर गप्प
बसली. मग एक एक शब्द ठामपणे उच्चारत म्हणाली, “एक म्हणजे मला तुमची सून करून घ्या आणि
दुसरं तुमच्या उद्योगात तुमच्या मुलाच्या बरोबरीने भागीदार करा. केवळ त्याची बायको
म्हणून मालकीण नाही, खरोखरची मालकीण.”
त्यांना कितपत धक्का
बसलाय त्याचा अंदाज ती घेत होती. पण ते शांत होते.
“अंदाज थोडा चुकला
माझा. तू फक्त सगळा धंदा नावावर करून मागशील असं वाटलं होतं मला. तो तू मागितलासच
पण जोडीने माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद करायला निघाली आहेस. तुला माहित आहे, त्याचा साखरपुडा
झाला आहे. ते लग्न मोडून तुझ्याशी लग्न करण्याने तो तर कायमचा दु:खी होईलच, पण त्या मुलीची
फसवणूक केली असं म्हणतील लोक.”
“चुकताय तुम्ही यशवंतराव.
उलट माझ्याशी लग्न करून ‘एका अनाथ मुलीचं आयुष्य मार्गी लावल्याचा’ आणखी एक
मोठेपणा पदरी पडेल तुम्हा बापलेकांच्या. विसरलात का २५ लाख रुपये दिल्यावर
मिडीयाने तुमचा केलेला उदोउदो?”
“नेमकं काय हवंय
तुला?”
“घर. माझं घर आणि
कुटुंब तुम्ही उध्वस्त केलंय. ते हवंय मला. आता कोणत्याही तरुणाला मी लग्नासाठी
प्रपोज केलं तर ‘भ्रष्टाचार करून जीव दिलेल्या बापाची मुलगी’ या विचाराने कुणीही
माझं प्रपोजल स्वीकारणार नाही. सुसंस्कृत, सुशिक्षित नवरा शोधणं कठीण जाणार आहे
मला. अशा वेळी तुमच्या मुलाइतका योग्य नवरा दुसरा कुठे मिळेल?”
यशवंतरावांनी डोळे
मिटून दीर्घ श्वास घेतला.
“ ते व्यवहार
......"
“त्याची नका काळजी
करू. माझे काही कलीग्ज आहेत बंगलोरमध्ये. तिचा बंदोबस्त करीन मी. थोड्या पैशांची
सोय करा आणि मुलाशी बोलून लग्नाची तयारी करायला घ्या. विधीवत लग्न करायचं आहे मला.
झोकात स्वागत समारंभ झाला पाहिजे. तुमच्या इभ्रतीला साजेसा. निघू मी? उद्या बंगलोरला
जातेय. काम झालं की येईन परत. दरम्यान फोनवरुन संपर्कात राहू आपण. मुलाला काय
सांगायचं तो तुमचा प्रश्न. पण हे प्रपोजल तुमचं आहे असं वाटलं पाहिजे त्याला. माझा
संशय येऊन उपयोगी नाही, एवढं लक्षात ठेवा.”
ती गेली आणि
यशवंतरावांनी नर्सला हाक मारुन औषध द्यायला सांगितलं. त्यांना किंचित घाम आला होता
आणि अस्वस्थ वाटत होतं.
घरी येऊन तिने
दुसऱ्या दिवसाची बंगलोरची फ्लाईट बुक केली. काही फोन करून दिवसभराचा कार्यक्रम
ठरवला. जेवून झोपायच्या तयारीत असतांना दार वाजलं. दारात चारुदत्त.
“आत्ता? यावेळी?”
तो आत येऊन बसला.
“त्या दिवशी
ऑफिसमध्ये तू भेटायला आली होतीस, तेव्हा बाबा पार कोसळले, आज तू भेटून गेलीस
आणि त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. असं नेमकं काय बोललीस तू त्यांच्याशी की ते सहन
न होऊन त्यांची तब्येत इतकी ढासळली?”
ती सावध झाली.
त्यांनी याला काय सांगितलंय?
“तुम्हाला सांगितलं
नाही त्यांनी?”
“तुला विचारतोय ना
मी? त्यांनी काय सांगितलं त्याचा काही संबंध नाही.”
“त्या दिवशी मी फक्त
'मी कशी एकटी पडलेय, कुणाचा आधार नाही' वगैरे इतकंच बोलले. पण आज मी त्यांना
सांगितलं की मला लग्न करायचंय आणि एक दोन मुलांनी ‘पैसे खाल्लेल्या बापाची मुलगी’
म्हणून नकार दिलाय मला. माझं लग्न जमणं कठीण होतंय आणि एकटीने आयुष्य घालवणं मला
शक्य नाही.”
“मला दे पत्ते त्या
मुलांचे. मी त्यांच्याशी बोलून त्यांना पटवून देतो की तू चांगली मुलगी आहेस. आणि
चांगली बायको होशील, चांगला संसार करशील.”
“पण त्यांना
माझ्याबद्दल काही म्हणायचं नाहीच आहे. त्यांचा माझ्या बाबांच्या दुष्कीर्तीवर
आक्षेप आहे. ती कशी दूर करणार तुम्ही?”
तो जागच्या जागी
चुळबूळ करीत राहिला. आणि ५ मिनिटांनी एकदम उठून निघून गेला. ती खुश झाली.
लग्नाबद्दल बोललेले दिसतायत वडील. “तीर ठीक निशानेपे लगा है, सरस्वती|”
बंगलोरला ४-५ दिवस
राहून तिने तिच्या IT कंपनीतल्या काही contactsच्या मदतीने आणखी
काही लोकांशी संपर्क साधून त्या बाईचं तोंड कायमचं बंद होईल अशी तजवीज केली. लग्न
झाल्यावर पैसे चुकते करायचा वायदा केला.
परत आल्यावर
चारुदत्तने लग्न मोडण्यासाठी तिचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. पण तिचं एकच
पालुपद – “निर्णय तुमच्या वडिलांनी घेतलाय. मी काय बोलणार?” वडिलांच्या
तब्येतीपुढे दुसऱ्या कशाचा विचार करता येईना त्याला आणि नाईलाजाने तो लग्नाला तयार
झाला. मोठ्या थाटात लग्न पार पडलं, झोकात रिसेप्शन पण झालं. अगदी तिला हवं होतं तसं
– यशवंतराव सरनाईकांच्या इभ्रतीला साजेसं. दागिन्यांनी मढवून काढली तिला त्यांनी.
उंची साड्यांचा ढीग ठेवला तिच्यापुढे. त्यांचा विदीर्ण चेहरा बघून तिला बरं वाटत
होतं. आपल्या वडिलांचा दु:खाने आणि अपमानाने काळा ठिक्कर पडलेला चेहरा तिला सतत
आठवत होता.
हनीमून वगैरे
सोपस्कार होणार नाहीत हे तिला अपेक्षित होतं आणि ते व्हायला नकोच होतं. लग्न
झाल्यानंतर तिने तिच्या सगळ्या जरीच्या साड्या नीट बांधून कपाटात ठेवल्या. दागिने
एका पेटीत ठेवून तिजोरीत ठेवले. आणि रोज नेसायला दिसायला साध्या पण किंमतीने भारी
अशा साड्या घेऊन आली. सरनाईकांच्या बंगल्यात मालकीण म्हणून वावरतांना शोभतील अशा
साड्या. आईच्या सांभाळून ठेवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या, कर्णफुलं आणि
लग्नामुळे गळ्यात आलेलं मंगळसूत्र इतके मोजके दागिने रोज तिच्या अंगावर आले.
थोड्याच दिवसांत घराचा ताबा घेतला तिने. सगळ्या नोकरांना कामाचे नवे नियम आणि नवं
वेळापत्रक आखून दिलं. यशवंतरावांच्या डॉक्टरना भेटून त्यांच्या तब्येतीचे सगळे
तपशील नीट विचारुन घेतले. खाण्या-पिण्याची पथ्य, औषधाच्या वेळा वगैरे सगळं नीट समजावून
घेतलं. तसे ते आता हिंडत फिरत होते. नर्सची गरज नव्हती. तिला काढून टाकली. एखाद्या
कर्तबगार गृहिणीसारखा घरावर तिचा वचक बसला. चारुदत्त आपल्याच दु:खात चूर होता.
त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. पण यशवंतराव तिची प्रत्येक हालचाल निरखत होते.
मनाशी काही आडाखे बांधत होते. एखादा आडाखा चुकलेला दिसला की पुन्हा नव्याने अंदाज.
त्यांच्यासाठी हा आता एक खेळच झाला. ती कोणत्या वेळी कशी वागेल, काय बोलेल, कशी react होईल याचे अंदाज बांधणं यातच सगळा वेळ जायला
लागला. उद्योगाच्या काही अडचणी कधी चारुदत्त त्यांच्याशी बोलत असे, तेव्हा त्यांना
राजाभाऊंची हमखास आठवण येई. आपल्या स्वार्थापायी त्या लाखमोलाच्या, सत्शील सहकाऱ्याचा
त्यांनी बळी दिला होता आणि त्याला कायमचा गमावून बसले होते. त्याची मुलगी दिवसभर
डोळ्यासमोर वावरत होती आणि त्या जखमेवर खपली धरू देत नव्हती. एक शब्द उणा न बोलता
त्यांची जखम वाहती ठेवत होती. थकून गेले होते ते. जगण्याची इच्छा कमी होत होती.
२-४ महिन्यांनी एक
दिवस चारुदत्त घरीच काम करत होता. कुणा-कुणाला फोन करत होता, अगदी त्रासून गेला
होता. ती शांतपणे त्याच्यासमोर बसून त्याचं बोलणं ऐकत होती. थोड्या वेळात तिला
त्याचा प्रॉब्लेम कळला. ती म्हणाली, “हरकत नसली तर एक सुचवू?”
“तुझ्याकडून आता
धंदा शिकतो मी. जा ना इथून बाई. माझं काम करू दे मला.”
ती आत गेली.
यशवंतरावांना तिने त्याचा प्रॉब्लेम आणि त्यावर तिला सुचलेला उपाय सांगितला. “माझं
ऐकत नाहीत ते. तुम्ही सांगून बघा.” यशवंतरावांनी जेवतांना सहज विचारल्यासारखं
त्याला विचारलं आणि तिने सुचवलेला उपाय आपला म्हणून त्याला सांगितला. “बघतो
प्रयत्न करून.” जेवून तो ऑफिसमध्ये गेला. रात्री जेवतांना प्रॉब्लेम सुटला
सांगतांना अगदी खुशीत होता. मग नंतर खूप वेळा असं झालं. यशवंतराव तिला म्हणाले, “तू ऑफिसमध्ये का
जात नाहीस?”
तिने आपल्याला
ऑफिसमध्ये जाऊन बॉसगिरी करण्यात स्वारस्य नसल्याचं सांगितलं. “घर सांभाळण्यात खुश
आहे मी. एका कामात सगळ्यांनी लक्ष घातलं की काम बिघडतं. मी घरीच बरी आहे.”
हळूहळू चारुदत्तच्या
लक्षात आलं की तिने सुचवलेले उपायच बाबा आपल्याला सांगतात आणि ते अचूक ठरतात. एक
दिवस न राहवून त्याने विचारलं, “तू काय शिकली आहेस?”
“BE कॉम्प्यूटर आणि MBA.”
“मग कुठे नोकरी का
करत नव्हतीस?”
“करत होते एका IT कंपनीत. बाबा
गेल्यावर सोडली.”
“का? उलट तेव्हा तर तुला
जास्त गरज होती नोकरीची. पैशांची आणि मन रमवण्याची.”
“पैसे खाणाऱ्या
माणसाची मुलगी म्हणून लोकांच्या तिरस्काराच्या नजरा झेलून थकले मी. सोडली.”
तो एकदम कानकोंडा
झाला. आपण नकळत तिच्या जखमेवर बोट ठेवलं याने ओशाळला. वडिलांच्या चुकीची शिक्षा
तिला मिळणं त्याला चूक वाटलं. “सॉरी. मी नको होतं असं विचारायला. माझ्या लक्षात
नाही आलं.”
त्या दिवसापासून
दोघांच्यातलं बर्फ हळूहळू वितळायला लागलं. कधी काही खायला मागणं, एखादी वस्तू मिळत
नाही ती शोधून दे म्हणणं, लवकर जाणं-उशीरा येणं याची तिला न विसरता सूचना
देणं नकळत व्हायला लागलं. पण अजूनही बायको म्हणून तिच्याकडे बघणं जमत नव्हतं
त्याला. सणांचे दिवस सुरु झाले. घराला झळाळी आली. आजपर्यंत नोकर करतील तो सण अशी
सवय असलेल्या घराला फार वर्षांनी गृहिणी लाभली होती. गणपती, नवरात्र, दिवाळी तिने
यथासांग केली. नोकरांना दिवाळीचा बोनस-कपडे-मिठाई देऊन खुश केलं. पहिल्या
अंघोळीच्या दिवशी चारुला आणि यशवंतरावांना पाटावर बसवून ओवाळलं. डोळ्यातलं पाणी
बाहेर येऊ न देता त्या दोघांना पक्वान्नांचा स्वयंपाक करून वाढला. चारू खुश होता.
पण यशवंतरावांना तिचे भरलेले डोळे दिसले. ते अस्वस्थ झाले. 'आज सणाच्या दिवशी या
मुलीच्या डोळ्यात पाणी आहे त्याला मी जबाबदार आहे' या भावनेने ते दिवसभर खंतावत राहिले.
चारुला सांगून तिच्यासाठी हिऱ्याची नाजूक अंगठी आणवली. पाडव्याच्या दिवशी चारुला
ओवाळून घ्यायला लावलं आणि ती अंगठी तिला देववली. दिवसभर तिने ती घातली आणि दुसऱ्या
दिवशी ती कपाटात गेली. त्यांना नवल वाटलं. पहिल्या पाडव्याची ओवाळणी हा मुलींचा
कौतुकाचा आणि मिरवण्याचा विषय असतो. ही मुलगी मिरवणं दूर, घालतही नाहीये.
.
एक दिवस चारुदत्त
ऑफिसला गेल्यावर ती त्यांना औषध द्यायला आली, तेव्हा त्यांनी तिला समोर बसवून घेतली.
आणि थकल्या स्वरात विचारलं, “नेमकं काय हवंय तुला? सून म्हणून घरात
आलीस, पण दागिना-उंची साड्या वापरत नाहीस. उद्योगात अर्धी मालकीण आहेस, पण कधी कशात लक्ष
घालत नाहीस. चारू सांगेल त्या कागदावर मुकाट्याने सह्या करतेस. काय आहे ते वाचून
बघत सुध्दा नाहीस. वैभवाची, मिरवण्याची हौस नाही दिसत आहे तुला फारशी.
बाहेरही जात नाहीस फार कुठे. ड्रायव्हर दिवसभर बसून असतो तुझा. घरात मालकिणीच्या
तोऱ्यात वावरतेस, नोकर तुझ्या शब्दात असतात. उलटून बोलत नाहीत, कामं चोख करतात.
काय हेतूने तू मला असं कात्रीत पकडून लग्न केलंस ते कळत नाहीये मला. तूच सांग
आता.” ती शांत स्वरात बोलायला लागली.
“दागिने, वैभव माझ्या हिंमतीवर
मिळवू शकले असते मी. माझी हुशारी माहित आहे तुम्हाला. कुठेही, कोणीही, कितीही पगाराची
नोकरी मला दिली असती. पण मला वैभवाची हौस नाहीच. माझ्या बाबांचा हताश, काळा ठिक्कर पडलेला
चेहरा मी विसरू शकत नाही. त्यांच्या अपमानाची किंमत वसूल करायची होती मला.
बाबांच्या जाण्यानंतर कणा-कणाने मरणाच्या जवळ जाणारी आई आठवते मला. बाबांची
काडीइतकी चूक नसतांना भ्रष्ट, बेईमान माणूस अशी त्यांची बदनामी झालेली मी
पाहिली. हरामखोर माणसाची मुलगी म्हणून अपमान, पाणउतारा सोसला. माझ्या बाबांच्या नावावर
लागलेला कलंक पुसणं सहज शक्य होतं मला. ते कागद मिडीयात दिले असते, चारुला दाखवले असते
तर माझे बाबा निष्कलंक होते ते सगळ्यांना कळलंच असतं. पण त्याने माझे आईबाबा मला
परत मिळाले नसते आणि तुमचा मुलगा तुम्हाला दुरावला असता. आपले वडील असं वागलेत आणि
त्याची शिक्षा एका निष्पाप माणसाला मिळाली हे कळलं असतं तर त्याने तुमचा तिरस्कार
केला असता. घडल्या प्रकारात माझा, माझ्या आई-वडिलांचा दोष नव्हता तसा चारूचाही
नव्हता. त्याच्या वडिलांचं सत्य त्याच्यासमोर आणून त्याच्या मनावर आघात करण्याचा
मला काय अधिकार? खूप विचार केला. सूड उगवण्याचे खूप वेगवेगळे
मार्ग चाचपून पाहिले. हा मार्ग मला योग्य वाटला. जगासमोर तुम्ही पुन्हा एकदा महान
ठरलात. ज्याने तुमच्याशी बेईमानी केली, त्याच्या मुलीला घरची लक्ष्मी म्हणून
आणून पुन्हा एकदा आपलं मन किती मोठं आहे ते जगाला दाखवलंत. पण प्रत्यक्षात सतत मला
समोर बघून तीळा-तीळाने जळत होतात. मला हे हवं होतं. पण आता वाटतं हे करून तरी मला
काय मिळालं? गेलेले आई-बाबा परत येणार नाहीत, सोसलेल्या वेदना आणि अपमान भरून येणार
नाहीत. बस झालं आता. या सगळ्यात चारुला मनाविरुध्द लग्न करण्याची शिक्षा मिळाली, पण तुमचा मुलगा
असण्याची आणि नकळत का होईना, माझ्या बाबांच्या मृत्यूला कारण ठरण्याची इतकी
शिक्षा हवीच. फार दिवस नाही राहणार मी इथे. एक वर्ष झालं की निघून जाईन. घटस्फोट
देईन चारुला. त्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करून सुखाचा संसार करू दे त्याला.
सुडाने ताबा घेतला होता माझा. पण आता माझा सूड घेतांना तो निरपराध असून घुसमटत
जगतोय हे मला नाही बरोबर वाटत. माझे संस्कार मला तसं करू देत नाहीत.”
बोलायची थांबून ती
क्षणभर शांत बसून राहिली. आणि उठून निघून गेली. यशवंतराव दिग्मूढ झाले. ही मुलगी
इतका पद्धतशीर विचार करून असा सूड घेईल हे त्यांच्या स्वप्नातही आलं नसतं. ज्या
हुशारीने तिने त्यांचे कागदपत्र शोधून काढले होते, ते पाहता तिने ऑफिसमध्ये काम करणं
त्यांच्या जास्त फायद्याचं होतं. पण तिचा मार्ग तिने ठरवला होता आणि जे ठरवलं तेच
ती करत होती.
लग्नाला वर्ष झालं
त्या दिवशी ती वकिलाकडे जाऊन घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला सांगून आली. वकिलांना
आश्चर्य वाटलं आणि त्यांनी न राहवून चारुला फोन करून हे सांगितलं. रात्री ती
झोपायला खोलीत आली तेव्हा त्याने तिला विचारलं. “हो. बरोबर आहे. मी सांगितलंय
त्यांना तसं.”
“अचानक हे काय सुचलं? आणि करणार आहेस काय
घटस्फोट घेऊन? एकटीने जगायचं नाहीये म्हणाली होतीस. आणि आता
वडिलांच्या दुष्कीर्तीबरोबर घटस्फोटित हेही लेबल लागेल. त्याचं काय करशील?”
“तुम्हाला काळजी
वाटतेय की तुम्ही खोचकपणा करताय ते तुमचं तुम्हाला माहित. पण एकदा घेतलेला निर्णय
वज्रलेप असं काही नसतं. तेव्हा मला वाटलं की असं केल्याने आयुष्य सोपं होईल. पण
तसं नाही हे आता आलंय लक्षात. वेगळा काही उपाय करून बघायचा असेल तर आहे हे स्टेटस
बदललं पाहिजे. म्हणून हा निर्णय.”
पेपर्स तयार होऊन
आले, त्या दिवशी रात्री जेवणं झाल्यावर तिने यशवंतरावांना घटस्फोटाबद्दल
सांगितलं. ते फक्त ‘हूं’ एवढंच बोलले.
दुसऱ्या दिवशी सकाळी
ब्रेकफास्ट करतांना यशवंतराव चारुला म्हणाले, “चारू काही काम आहे. जायच्या आधी भेटून
जा.”
चारू खोलीत आल्यावर
त्यांनी त्याला सविस्तर सगळ्या घटना सांगितल्या. बंगलोरला ते कसे फसले, नंतर त्याची किंमत
चुकवत राहिले, त्या प्रकरणात राजाभाऊंनी केलेली मदत, आणि वेळ आल्यावर
भांबावून मागचा पुढचा विचार न करता त्यांना बळी देऊन कसे मोकळे झाले. सरस्वतीची
चारुशी लग्न करण्याची अट, त्या बाईचा केलेला बंदोबस्त .... “पुढचं सगळं तुला
माहितच आहे. या मुलीचा जीव किती तळमळला असेल त्याची आपण कल्पना नाही करू शकत.”
तिने त्या दिवशी सांगितलेलं सगळं त्यांनी चारुला सांगितलं. “चारू, सूड घेण्याच्या
भरात तिने तुझ्याशी लग्न करण्याची मागणी केली. पण आपल्या पैशाचा, वैभवाचा कणभरही मोह
नाही तिला. ती किती साधी राहते बघतोयस ना तू? पाडव्याला तू दिलेली हिऱ्याची अंगठी
सुध्दा तिने कपाटात ठेवली आहे. घालत नाही रोज. तू माझा तिरस्कार करू नयेस, म्हणून तुला काही
सांगितलं नाही तिने. आपल्या नात्याची बूज ठेवलीय. मला वाटतं, तू सही
करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार करावास. एकदा माझ्यामुळे तुझं आयुष्य
विस्कटलंय, आता तुला हवा तसा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे तुला. पण माझ्या
मनाला हे खात होतं. तुझ्याजवळ बोललो नसतो, तर सुखाने प्राणही सोडू शकलो नसतो. मला
माफ कर चारू, माफ कर.”
थकून ते आडवे झाले.
चारू हलकेच बाहेर आला. फार मोठा धक्का बसला होता त्याला. ऑफिसमध्ये न जाता तो
दिवसभर लायब्ररीत पुढ्यात एक पुस्तक घेऊन बसून राहिला. विचार करून डोकं बधीर झालं.
तिच्यात हळूहळू होत गेलेले बदल त्याला आठवले. तिने घराची घेतलेली काळजी, त्याच्या कामात
सुचवलेले नवे मार्ग, त्याने सांगितलेल्या ठिकाणी एकही प्रश्न न
विचारता केलेल्या सह्या सगळं सगळं आठवलं. बाबांनी सांगितलं तसं खरंच ती कधी
दागिन्यांनी मढलेली त्याने बघितली नव्हती. अगदी सणाच्या दिवशी सुध्दा. दिवाळीच्या
दिवशी त्याला ओवाळतांना तिची नजर शांत होती. कोणतेच भाव नव्हते तिच्या डोळ्यात.
थकून तो रोजच्या वेळी घरी आला. “कुठे होतात दिवसभर? ऑफिसमधून किती फोन येऊन गेले. तुमचा
फोनही घरी विसरून गेला होतात. शेवटी आता पोलिसात जावं असा विचार करत होतो मी आणि
बाबा.” तो चमकला. बाबा? माझ्या बाबांचा उल्लेख नेहमी यशवंतराव असा करते
ही. आज बाबा? त्याच्या तोंडून प्रश्न बाहेर पडलाच. “बाबा?”
“आणि कोण? तुमचे बाबा काळजी
नाही का करणार तुमची?”
घासभर जेवून तो
खोलीत गेला. रात्री तिला म्हणाला, “मी आज सही नाही करणार या कागदांवर. मला विचार
करायला वेळ हवाय थोडा.”
“कसला विचार? मी जबरदस्तीने, तुमच्या मनाविरुध्द
तुमच्या आयुष्यात आणि घरात आलेय. आता आपणहून जायचं म्हणतेय तर विचार कसला आणि का
करताय?”
“तू म्हणशील तेच आणि
तसंच करण्याचं बंधन आहे का माझ्यावर? इतकं सोपं नाहीये ते. तू जाऊन काय होणार आहे? जी मला आवडत होती
ती काही आता माझी बायको होऊ शकत नाही. झालं तिचं लग्न. आणि माझ्यावरही आता
घटस्फोटित असा शिक्का बसणारच आहे. तेव्हा दुसरी बायको करतांना काही ना काही तडजोडी
कराव्याच लागतील मला. मग तू काय वाईट आहेस? शिकलेली आहेस, दिसायला चांगली
आहेस. शिवाय संस्कारी घरातली आहेस. तुझे संस्कार दाखवून दिले आहेस तू. गेलं वर्षभर
बघतोय तुला. कसलाही माज किंवा विजयोन्माद नाही तुझ्या वागण्यात. बायको म्हणून तुझा
विचार करण्याची तयारी नव्हती माझी. पण पुन्हा कोणा अनोळखी मुलीशी लग्न करून
संसाराचा जुगार नव्याने खेळण्यापेक्षा आपण एकमेकांना संधी का देऊ नये?”
“पण माझा निर्णय
झालेला आहे घटस्फोट घेण्याचा. तुम्ही सही न करणं म्हणजे माझ्यावर जबरदस्ती नाही का
होणार?”
“फालतू वाद घालू
नको. माझा निर्णय झाला की मी सांगीन तुला. तेव्हा ठरवू काय ते. फार दमलोय मी. आता
जरा झोपू दे. कटकट करू नको.”
दुसऱ्या दिवशी सकाळी
लगेच सही करणार नसल्याचं त्याने यशवंतरावांना सांगितलं. ती खोलीत औषध द्यायला आली
तेव्हा ते म्हणाले, “बस जरा. बोलायचंय.”
ती खुर्चीवर बसली.
तेव्हा तिला हात धरुन आपल्या शेजारी बसवून ते म्हणाले, “सरस्वती, माझ्या हातून
तुझ्यावर आणि तुझ्या आई-वडिलांवर फार मोठा अन्याय झालाय हे मी मान्य केलंय.
चारूजवळ तसं कबूलही केलंय. आता तू दिलेली शिक्षा भोगायची माझी मनापासून तयारी आहे.
पण त्यासाठी तू इथे घरात, डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. तू दिसलीस की मला
राजाभाऊ आठवतात. जीव तळमळत राहतो. आता चारुही कदाचित बायको म्हणून तुझा स्वीकार
करेल. तू तुझा निर्णय बदल. खऱ्या अर्थाने या घराची आणि आपल्या उद्योगाची मालकीण
हो. चारुसोबत ऑफिसमध्ये जात जा. थोडं लक्ष घालत जा कामात. तू त्याचा आणि माझाही
स्वीकार कर सरस्वती.”
“स्वीकार-अस्वीकाराचा
निर्णय आपण काळावर सोपवू या. आत्ता काहीच नको ठरवायला. जे आपण ठरवतो ते होत नाही
याचा अनुभव घेतलाय मी. त्यांचा निर्णय होऊ दे. मग मी ठरवीन काय करायचं ते. काळच
सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आपण वाट बघू या, सर.”
तिच्या तोंडून बाहेर
पडलेलं ‘सर’ हे संबोधन त्यांना शुभसूचक वाटलं.
Comments
Post a Comment