लाकुडतोड्याच्या बायकोची गोष्ट
ती लाकुडतोड्याची
गोष्ट नाही का आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली होती? त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. मग आधी चांदीची, मग सोन्याची अशा मौल्यवान कुऱ्हाडी त्याला देऊ
केल्या जलदेवतांनी. पण प्रामाणिक लाकुड्तोड्याने त्या नाकारल्या. मग त्याची
लोखंडाची कुऱ्हाड परत केली आणि बक्षीस म्हणून सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडी त्याला
दिल्या. सगळ्यांनाच माहित आहे ही गोष्ट. प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा ते
सांगण्यासाठी ही गोष्ट अजूनही सांगतात. मीही सांगितलीय माझ्या नातवंडांना. कुऱ्हाडी
घरी नेऊन त्या लाकुडतोड्याने त्यांचं काय केलं हा प्रश्न मला खरं तर लहानपणीच पडला
होता. पण त्यावर फार विचार नाही केला कधी. आता अलीकडे मोकळा वेळ फार असतो. मग केलं
संशोधन, काढलं शोधून. त्यावर
कळलेली हकीकत आज तुमच्यासाठी - - - - -
या कुऱ्हाडी विकायला
गेलो आणि सोनाराने कुठून आणल्या असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं? तक्रार केली त्याने तर फुकट राजाचे शिपाई धरुन
नेतील या भीतीने तो किती तरी दिवस गप्प राहिला. पण एकदा धीर करून गावच्या पाटलाकडे
गेला. जलदेवता वगैरे काही सांगितलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही, वेड्यात काढतील म्हणून या कुऱ्हाडी जंगलात
मिळाल्या असं सांगितलं. “या कुऱ्हाडी तुम्ही घ्या आणि मला त्याची किंमत पैशात
द्या.” पाटलाने त्या कुऱ्हाडी ठेवून घेतल्या आणि पैसे देऊन लाकुडतोड्याला बोळवल.
पण घरात ठेवलेले पैसे असे किती दिवस पुरणार? संपले ते लवकरच. पुन्हा त्याच्या नशिबी कुऱ्हाड
घेऊन जंगलात जाणं आलं. एक दिवस तो देवाघरी निघून गेला. मग त्याच्या मुलावर
कुटुंबाची जबाबदारी आली. वडिलांची कुऱ्हाड घेऊन तो आपल्या पिढीजाद व्यवसायाला लागला.
पुढे लाकुडतोड्याच्या
मुलाचे हातपाय थकल्यावर त्याचा नातू सरकारच्या जंगल खात्यात नोकरीला लागला. आणि
रोज जंगलात जायला लागला लाकडं तोडायला. एक दिवस तो लाकडं तोडायला गेला आणि दुपारी
त्याची बायको त्याचा डबा घेऊन गेली त्याच्यासाठी. काम थांबवून हात-तोंड धुवायला
गेला आणि पाय घसरून विहिरीत पडला. बायको घाबरली. या जंगलात कोण येणार आता त्याला
वाचवायला? ती जोरजोरात रडू
लागली. तिचं रडणं क्षीरसागरात श्री विष्णूंच्या कानावर गेलं. ते लक्ष्मीदेवींना
म्हणाले, “तुम्हाला पण ऐकू
येतंय का रडणं? चला बघून येऊ.”
गरुडावर बसून निघाली दोघं. एका जंगलात ही तरुण स्त्री रडतांना दिसली. लँड केला गरुड
खाली.
“का रडतेस मुली?” देवींचा प्रेमळ प्रश्न ऐकून तिला अधिक रडू
फुटलं. रडू थोडं ओसरल्यावर तिने सगळी हकीकत त्यांना सांगितली. देवींनी
श्रीविष्णूंकडे पाहिलं. आपसात त्यांचा काही मूक संवाद झाला. नजरेनेच श्रीविष्णूंशी
काही बोलून त्या म्हणाल्या, “बरं. आपण काढू हं त्याला बाहेर.” मग त्यांनी एक देखणा, तेजस्वी पुरुष विहिरीतून बाहेर काढला. लाकुडतोड्याच्या
नातसुनेला म्हणाल्या, “हा का तुझा पती?” त्या तरुणाकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली.
क्षणभर विचार करून म्हणाली, “होय देवी, हाच माझा पती.”
लक्ष्मीदेवी संतापल्या. त्यांचे डोळे खदिरांगासारखे लाल झाले. त्यातून जणू
अग्नीच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या. त्या म्हणाल्या, “अगं, सीता-सावित्रीच्या देशातली तू कन्या, या परपुरुषावर भाळलीस? काय हे तुझं अध:पतन.” असं म्हणून तिला शाप
देण्यासाठी त्यांनी हात उचलला, तोच ती धावून त्यांच्या पायावर कोसळली. तिने त्यांचे पाय पकडले.
अश्रूंचं सिंचन केलं त्यांच्या पायांवर.
“देवी, थांबा. अशी घाई करू नका. आमच्या देशात
राष्ट्रप्रमुखाची हत्या, स्त्रीवर अनन्वित अत्याचार, बॉम्बस्फोट घडवून निष्पाप नागरिकांचे बळी घेणं
अशा नृशंस गुन्ह्यात सापडलेल्या गुन्हेगारांना सुध्दा आपली बाजू मांडायची संधी
मिळते. मग मला एक संधी नाही देणार का तुम्ही?” देवींनी पुन्हा श्रीविष्णूंकडे पाहिलं. त्यांनी
नजरेनेच रुकार दिला. लक्ष्मीदेवींनी मानेनेच तिला बोलण्यास परवानगी दिली.
डोळे पुसून, धीर गोळा करून ती बोलू लागली.
“देवी, माझ्या आजेसासऱ्यांना इथल्या जलदेवतांनी
कुऱ्हाडी बक्षीस दिलेल्या मला माहित आहे. माझ्या लग्नाच्या वेळी सासूनी सांगितलेली
ती घटना आत्ता आठवली मला. मी समजा हा माझा पती नाही असं म्हटलं असतं तर तुम्ही
याहून देखणा पुरुष बाहेर काढून मला विचारलं असतं हा का तुझा पती. मी पुन्हा नाही
म्हटल्यावर मग माझा खरा पती बाहेर काढून हे दोन पुरुष मला बक्षीस दिले असते तर? एका नवऱ्याची तंत्र सांभाळतांना जीव मेटाकुटीला
येतोय आम्हा बायकांचा. तीन-तीन नवऱ्यांबरोबर नांदायचं काय चेष्टा आहे का? म्हणून मग मी पहिलाच पुरुष माझा नवरा आहे असं
म्हटलं.”
लक्ष्मीदेवी आणखीच
संतापल्या.
“कुऱ्हाड आणि माणूस
यातला फरक मला कळत नाही असं वाटतंय का तुला?”
“नाही देवी. तसं
नाही. पण आता बायकांना तरी कुठे माणूस समजतायत आमच्या देशात? पुरुषांच्या नजरांना आनंद देणारी वस्तू, त्यांच्याबरोबर पैसे कमावणारं मशीन, मुलं जन्माला घालणारं मशीन, घर सांभाळणारी मोलाची बाई अशा वेगवेगळ्या भूमिका
आल्या आहेत आमच्या वाट्याला.”
“काय? इतके खालच्या पातळीला गेले आहेत तुमच्या देशातले
पुरुष?”
“नाही हो. सगळेच पुरुष
तसे नाहीत देवी. पण सुसंस्कृत, सुशिक्षित पुरुषांची संख्या फार कमी आहे देवी. शहरात आत्ता कुठे
पुरुष बाईचा विचार करायला लागलेत. तिच्या अडचणी, कष्ट यांची जाणीव व्हायला लागलीय त्यांना. ग्रामीण
भागात, मागास भागात अजून
अवस्था कठीण आहे बाईची.” मग डोळे पुसत पुसत तिने भारतीय बाईची करुण कहाणी देवींना
ऐकवली.
लक्ष्मीदेवी विचारात
पडल्या. जरा वेळाने म्हणाल्या, “ठीक आहे. करते तुला क्षमा.” असं म्हणून देवींनी तिचा पती विहिरीतून
बाहेर काढला. दोघं नवरा-बायको घराकडे गेली.
इकडे देवी
श्रीविष्णूंना म्हणाल्या, “स्वामी, फार कठीण दिवस आले
आहेत भारतीय स्त्रीला. धड ना आधुनिक, धड ना पारंपरिक असं विचित्र आयुष्य आलंय तिच्या वाट्याला. आपण आगरकर, कर्वे, रमाबाई रानडे, ज्योतिबा, सावित्रीबाई
यांच्यासारख्या सगळ्या समाज सुधारकांना पुन्हा खाली पाठवू स्पेशल डेप्युटेशनवर.
स्वातंत्र्य, शिक्षण, अधिकार, कर्तव्य यांचा उचित आणि हितकारक समन्वय साधायचं शिक्षण स्त्रिया आणि
पुरुष दोघांनाही द्यायला सांगू. स्त्रियांना नवनव्या दिशा दाखवतांना पुरुषांचं
प्रबोधन करायचं राहूनच गेलं त्या वेळी. आणि स्त्रियांना सुध्दा शिक्षणाचा खरा
उपयोग नीट पध्दतीने सांगितला गेलाच नाही. काही हरकत नाही. अजून वेळ गेली नाही. आता
करू ते काम.”
श्रीविष्णूंनी हसून
लक्ष्मीदेवींचा प्रस्ताव मान्य केला. आणि दोघेही पुन्हा क्षीरसागराकडे परतली.
Comments
Post a Comment