घरजावई
घरजावई
मध्ये एक प्रश्न वाचला. घरजावई होणं हा
आपल्याकडे कुचेष्टेचा विषय का आहे? यावर पुष्कळांनी आपापली मत मांडली. याचे सामाजिक पैलू जे असतील ते
आपल्या जागी. त्याची चर्चा आज पुन्हा नको करायला. पण आधुनिक काळात घरजावई असणं ही
वस्तुस्थिती कशाला जन्म देते याचं एक उदाहरण मी ऐकलं ते लिहावंसं वाटतंय.
पुण्याजवळच्या छोट्या गावातून शिकायला
पुण्यात आलेला एक होतकरू तरुण. शिक्षण पूर्ण झाल्यावर एका मध्यम कंपनीत कामाला
लागला. त्याची हुशारी, तडफ मालकांच्या नजरेत भरली. जावई म्हणून तो त्यांना पसंत पडला.
यथावकाश त्यांनी त्याच्यासमोर जावई होण्याचा आणि घरुन हरकत नसेल तर घरजावई
होण्याचा प्रस्ताव मांडला. घरी आई-वडिलांशी बोलून, भविष्याचा विचार करुन त्याने होकार दिला. गावी
घर होतं, पुरेसं उत्पन्न होतं, आत्ता तरी आई-वडिलांचा काही प्रश्न नव्हता. पुढे वेळ येईल तेव्हा
त्या वेळेची गरज बघून घेऊ निर्णय. असा विचार त्याने केला. लग्न झालं. आता तो
कंपनीत सासऱ्याच्या खालोखाल महत्त्वाचा होता. पुण्यात उच्चभ्रू वस्तीत सासऱ्यांचा बंगला
होता. सगळं सुरळीत झालं सुरुवातीला तरी. पण मग हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. कंपनीतल्या
तरुण कर्मचाऱ्यांना हा नवीन तरूण मालक जवळचा वाटायला लागला. नवी कल्पना ते
त्याच्याजवळ आधी बोलायला लागले. त्याला पटलेल्या प्रस्तावावर तो आग्रही मत
मांडायला लागला. सासरेबुवा अस्वस्थ व्हायला लागले.
घरात मुलीच्याही संसाराला सुरुवात झालेली.
तिच्या आधुनिक स्वप्नाळू कल्पना आणि आईच्या मुरलेल्या सवयी यांचा मेळ बसेना. आईही
अस्वस्थ झाली. फक्त सासरा-जावई नव्हे तर आई-मुलीतही गोष्टी लक्षात येण्याइतक्या
बदलल्या. वेळेवर काहीतरी करणं आवश्यक होतं. अखेर आई-वडिलांचा निर्णय झाला.
जावयाला वेगळा धंदा सुरु करून दिला.
बंगल्यावर एक मजला वाढवून मुलीला वेगळा संसार थाटून दिला.
<<आपलं आयुष्य खर्च
करून उभं केलेलं विश्व असं सहजा-सहजी, विनासायास दुसऱ्या कुणाच्या हातात सोपवणं भले मग तो जावई का असेना, कुणासाठीच सोपं
नसतं.>> हे वडील-मुलगा यांच्यात पण होत असेल. पण शेवटी ते रक्ताच्या नात्याने
बांधलेले असतात. जे आहे ते वडिलांच्या नंतर मुलालाच मिळायचं ही पारंपरिक समजूत
मनात भिनलेली असते, त्यामुळे ते कदाचित कमी त्रासदायक असेल, त्याचा बोभाटा आणि
सार्वजनिक चर्चा फारशी होत नसेल.
नातं कोणतंही असो, एका म्यानात दोन
तलवारी राहणं कठीण. एकाच अधिकारपदावर दोन समान अधिकाराच्या व्यक्ति
गुण्यागोविंदाने नांदणं अवघड. मग त्या तलवारी एकमेकींवर आपटणार नाहीत हे कौशल्य
त्या ठेवणाऱ्या माणसाचं आणि स्पर्धा टाळून एकमेकांचा अधिकार सांभाळणं हे कौशल्य
त्या अधिकाऱ्यांचं.
Comments
Post a Comment