युरोप टूर
युरोप टूर
समीर लिफ्टमधून
बाहेर पडून घराकडे वळला तर दाराला भलं मोठं कुलूप. त्याने फोन काढून आईचा आणि
बाबांचा – पाठोपाठ दोघांचे नंबर फिरवले. ‘स्विच ऑफ’ अशी टेप वाजली. मग त्याने पानसे काकांचं
दार वाजवलं.
“अरे समीर, ये. ये. आज कसा काय
इकडे आलास! अगं, हा बघ समीर आलाय.”
काकू बाहेर आल्या.
त्यांनी पाणी आणलं. काकांनी पंखा लावला.
“आज कशी आठवण झाली
आमची?” काकांनी उत्सुकतेने विचारलं.
“आणि हे काय? रिकाम्या हाताने
आलायस? आई-बाबांसाठी काही गिफ्ट नाही वाटतं आणलंस अमेरिकेहून?”
समीर चमकला.
“अमेरिकेहून? काका, मी नव्हतो
गेलो अमेरिकेला. कुणी सांगितलं तुम्हाला? आणि आमच्या घराला कुलूप का? आई-बाबा कुठे गेलेत?”
आता पानसे काका-काकू
दचकले.
“अरे काय म्हणतोस
समीर! २ महिन्यापूर्वी तू अमेरिकेला गेलास असं म्हणाले तुझे आई-बाबा. युरोपच्या
टूरवर गेले ८ दिवसांपूर्वी, तेव्हा मी म्हटलं त्यांना की तुम्ही टूरवर जाताय, तर समीर कसा फिरकला
नाही. म्हणाले तू अमेरिकेला गेलायस. आणि नेमका ते गेल्यानंतर २ दिवसांनी येणार
आहेस परत. आम्हाला कशाला संशय येईल. तुम्ही कॉर्पोरेट कंपन्यांत काम करणारी मुलं, आम्ही पुण्याहून
मुंबईला जाऊन येतो तशी परदेशात जाऊन येता. म्हटलं गेला असशील कंपनीच्या कामासाठी.
. . . . .”
बोलता बोलता काका
थांबले. समीरचा चेहरा विचित्र ताणला होता. ‘निघतो’ असं म्हणून तो तीरासारखा बाहेर पडला.
दिशाहीन फिरत राहिला बाईकवरुन. अखेर ९च्या सुमारास घरी आला. थंडगार पाणी पिऊन
सोफ्यावर बसला आणि त्याला रडू फुटलं. सोफ्यावरच्या उशीत डोकं खुपसून तो किती वेळ
रडत होता. आईबाबा युरोप टूरवर गेले आणि आपल्याला सांगितलं पण नाही. कधी बुकिंग
केलं, तयारी केली, युरोप टूरसाठी विशेष खरेदी करावी लागली असेल. काही काही
आपल्याला सांगितलं नाही. भयंकर अपमान वाटला त्याला. एके काळी आईबाबांच्या गळ्यातला
ताईत असलेला समीर, आज त्याला असा परका करून टाकला त्यांनी.
मैत्रिणींबरोबर डिनर
करून १० वाजता नेहा घरी आली. समीरचे सुजलेले, लाल डोळे पाहून चरकली. “काय झालं? तू
आईबाबांना भेटायला जाणार होतास ना?” तिच्या प्रश्नासरशी त्याला पुन्हा उमाळा आला.
तिच्या खांद्यावर डोकं टेकून रडत रडत त्याने काय घडलं ते सांगितलं. नेहा गप्प.
तिने उठून त्याला पाणी आणून दिलं. त्याच्यासाठी कॉफी केली. त्याची कॉफी पिऊन
झाल्यावर म्हणाली, “मला मुळीच काही नवल वाटलं नाही समीर. त्यांना
तू त्यांच्या हातातलं बाहुलं व्हायला हवा होतास. तू झाला नाहीस. आपण वेगळं घर केलं, तू माझ्या
आई-वडिलांशी प्रेमाने वागतोस हे त्यांना आवडत नाही हे मला माहित होतं. मी तुला
एकदा तसं म्हटलं तर किती चिडला होतास. अजून शहाणा हो. माणसं ओळखायला शिक.” समीर
उठून निघून गेला. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही.
सकाळी साडेआठ वाजून
गेले तरी तो झोपून होता. “अरे समीर, वाजले किती बघ. जायचं नाहीये का ऑफिसला? मी निघालेय. चहा
ठेवलाय करून. डबा भरून ठेवलाय. वेळेवर आवरून बाहेर पड. नाहीतर मग तिथे काही काम
होणार नाही आणि घरी येऊन चिडचिड करशील. उठ रे, मी गेले.” नेहा गेली तशी समीर उठला. २
दिवस येणार नसल्याची मेल पाठवली बॉसला. आणि तो तयार होऊन बाहेर पडला. फार लागलं
होतं त्याला आईबाबांचं वागणं. आणि या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणार होता तो आईबाबा
परत आल्यावर त्यांच्याशी बोलून. त्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं. बाईक खडकवासल्याच्या
दिशेने नेली त्याने. रस्त्याकडेच्या एका मोठ्या दगडावर टेकला सावली बघून.
असं का केलं
आईबाबांनी? आत्ता तर भेटलो होतो त्या दिवशी... तेव्हा बोलायचं की..... कधी बरं?
आठ – नाही पंधरा दिवस – नाही ३ आठवडे झाले का भेटल्याला? त्याला आठवेना
शेवटचं कधी भेटलो. आता त्याला धस्स झालं. म्हणजे किती दिवसांपूर्वी भेटलो होतो ते
आठवूही नये इतके दिवस झाले आईबाबांना भेटून? त्याने मोबाईल काढून calendar बघितलं. आपण त्या घरी राहायला गेलो त्याला ५
महिने झाले. नंतर महिन्याभरात २ वेळा येऊन थोडं थोडं सामान नेलं. नंतर एकदा येऊन
उरलेलं सामान नेलं. नंतर - - -. तरी दोन महिने झाले आपण आईबाबांना भेटायला आलोच
नव्हतो. आता तो सटपटला. फोन कधी केला होता आणि तेव्हा काय बोलणं झालं ते आठवायचा
प्रयत्न करायला लागला. आई एकदा त्याला म्हणाली होती की एकदा घरी येऊन जा. थोडं
बोलायचं आहे. पण आपण आलो नाही. का बरं? काय झालं होतं? अं, मला वाटतं नेहाच्या
आईचा वाढदिवस होता ५०वा. त्याचं सरप्राईज सेलेब्रेशन प्लान करत होतो तेव्हा.
बरोबर. त्याच वेळी. विसरूनच गेलो आपण. आई-बाबा त्या पार्टीला येऊन गेले. पण तेव्हा
काही बोलले नाहीत. कधी येणार आहेस विचारलं सुध्दा नाही. हेच सांगायचं होतं का
आईबाबांना – आम्ही टूरला जातोय म्हणून? पण मी नाही आलो तर पुन्हा फोन करायला काय
कष्ट पडत होते का? पण स्वत:ला विचारलेल्या या प्रश्नात फारसा जोर
नाही हे त्याला जाणवलं. सूर्य डोक्यावर आला तसं ऊन चटके द्यायला लागलं. तो उठून
थोडा लांब गेला आणि सावली बघून पुन्हा रस्त्याच्या कडेला टेकला. गेल्या
वर्षभरातल्या घटना एकापुढे एक नीट क्रमाने आठवायला लागला.
·
* *
* * *
पुढच्या महिन्यात
वर्ष होईल लग्नाला. त्याआधी साखरपुडा झाल्यानंतर सहा महिने तो आणि नेहा एकत्र फिरत
होते. तिच्या हुशारीवर आणि आकर्षक दिसण्यावर तो फिदा होता. आणि नेहाच्या ते
चांगलंच लक्षात आलं होतं. दर रविवारी ती त्याला घरी बोलवायची. हिंडून, जेवून रात्री उशीरा
तो घरी यायचा. लग्न २ महिन्यांवर आलं तशी केळवणं सुरु झाली. रविवारच्या भेटींना
थोडी खीळ बसली. तिला कुठे बोलावणं आलं की ती सांगायची, तो पण येईल. आणि
समीर जायचा. पण नेमकं तेव्हाच जर त्याला कुठे बोलावणं असलं तर ती चिडायची, रुसायची. तुला
विचारल्याशिवाय तुझी आई बोलावणं घेतेच का असं म्हणायची. मग तिचं रुसणं, त्याच्या विनवण्या
हे नेहमीचंच झालं. लग्न झाल्यानंतर मधुचंद्र. त्या दोघांचं ऑफिसचं रुटीन सुरु झालं
आणि दर शनिवारी-रविवारी ती माहेरी जायला लागली. “मी नाही आईला भेटल्याशिवाय राहू
शकत. आणि घरी राहिलं की बाबांसमोर फार अवघड होतं मला. आईकडे मोकळं वाटतं. प्लीज ना
समीर.....” समीर विरघळला. १-२ शनि-रवि ती एकटी गेली. नंतर रविवारचा दिवस तोही
जायला लागला. आई एकदा म्हणाली घरी रहा की कधीतरी. पण त्याने ते हसण्यावारी नेलं. पुन्हा
आई काही बोलली नाही. ४-५ महिने झाल्यावर नेहाने आईच्या घराजवळ भाड्याने घर
घेण्याचा प्रस्ताव मांडला. हो-नाही करता करता तो राजी झाला आणि नेहाच्या आईच्या
सोसायटीच्या पलीकडे दोन बिल्डींग सोडून त्याने एक छोटा flat भाड्याने घेतला
सुध्दा. बाबा एकदाच म्हणाले, “अरे समीर, आपलं इतकं प्रशस्त आणि स्वत:चं घर सोडून तुम्ही
त्या छोट्या भाड्याच्या घरात का जाताय?” पण नेहाने त्याला गप्प राहायची खुण
केली.
त्या घरी गेल्यानंतर
तो आणि नेहा आपल्या घरी कमी आणि तिच्या आईच्या घरी जास्त असायचे. रात्री फक्त
झोपण्यापुरते घरी यायचे. कारण नेहाच्या भावाचं शेवटचं वर्ष होतं आणि त्याच्या
खोलीत तो अभ्यास करत असायचा. हळूहळू आईबाबांना भेटायला येणं, फोनवरुन त्यांची
चौकशी करणं कसं कमी कमी होत गेलं आपल्याला कळलंच नाही. एक दोन वेळा बाबा म्हणाले
सुध्दा अरे समीर, किती दिवस झाले बुध्दिबळाचा डाव टाकला नाही आपण.
एकदा सवड काढून ये की रविवारी. आपण हो हो केलं, पण आलो नाही. आपल्या मनात तो विचारच आला
नाही. असं कसं झालं? हळूहळू त्याला कितीतरी छोटे छोटे प्रसंग आठवायला
लागले. आई कधी काही सांगायला गेली की नेहा काहीतरी सबबी सांगायची, तुटक उत्तरं
द्यायची, कधी उलटे प्रश्न विचारायची. आई गप्प बसायची. एकदाच त्याने बाबांना
बोलतांना ऐकलं होतं, “आता आपण जरा बेताने वागलं-बोललं पाहिजे असं लग्नाच्या
वेळी मीच म्हटलं होतं तुला. पण त्याचा उलटाच परिणाम होतोय असं दिसतंय.” आपल्याला
संदर्भ लक्षात नाही आला. डोळ्यावर नेहाच्या व्यक्तिमत्वाची पट्टी बांधली होती आपण.
पण तिच्या कोणत्याही उत्तरावर, बोलण्यावर आई कधी काही बोलत नाही हे आपल्या लक्षातच
कसं आलं नाही?
पुढे तिकडे राहायला
गेलो आणि सगळंच बदललं. छे छे! नेहाचं आणि तिच्या आईवडिलांचं घट्ट नातं आपण सहज
स्वीकारलं आणि आपल्या आई-बाबांशी असलेलं आपलं तेवढंच जवळचं नातं आपण विसरलो. गृहीत
धरलं त्यांना. नेहाने याही घरात रूळलं पाहिजे हे कळलंच नाही आपल्याला. जिच्याबरोबर
आयुष्य काढायचं तिचं मन जपायचं याचा अर्थ ज्यांनी जन्म दिला त्यांची पर्वा करायची
नाही असा होत नाही हा विचार कसा नाही केला आपण? ती सांगत गेली आणि आपण मान डोलवत गेलो.
आपलं घर वेगळं होतं, तर नेहा तिच्या माहेरी गेल्यावर आपण आपल्या
माहेरी येऊच शकत होतो. पण आपण नाही केलं ते. नेहाच्या ओंजळीने पाणी पीत राहिलो. मी
जर तिच्या आई-बाबांची जाणीव ठेवली, तर माझ्या आई-बाबांची बूज तिने ठेवायला नको होती
का? पण चूक तिची नाहीच. मी तिचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलत राहिलो, तर ती का नाही खुश
होणार? मीच माझ्या आई-बाबांना विसरलो. नव्याच्या नवलाईत इतका कसा वाहवलो. .
. . . . विचार करकरून समीरचं डोकं भणभणून गेलं. नेहाचे २-३ फोन येऊन गेले, तेही त्याने घेतले
नाहीत. दुपारी घरी येऊन तो जेवला आणि झोपला. संध्याकाळी नेहा घरी आली. “तू आज गेला
नाहीस ऑफिसला? मी फोन केला होता तर तो पराग म्हणाला तू येणार
नाही असं कळवलं आहेस. काय हे समीर? तुझे बेत मला बाहेरच्या माणसाने सांगावेत? मला का नाही बोललास
सकाळी तू आज घरी आहेस ते? आणि माझे फोन का नाही घेतलेस? समीर, तुला मी विचारतेय
काहीतरी. उत्तर दे मला.” तिला काहीतरी जहरी उत्तर द्यावं असं वाटलं त्याला. पण
त्याने निष्फळ वाद वाढला असता. आणि त्याच्या चुकीबद्दल तिला काही दोष तरी कसा
देणार होता तो? मुश्किलीने तो गप्प बसला.
·
* * * *
दुसऱ्या दिवशी सकाळी
ती निघाली. “आज तरी जाणार आहेस का? की घरीच आहेस? मला आत्ता सांग काय ते.” आता त्याने तोंड
उघडलं, “माझं नक्की नाही. तुझं काय अडतंय माझ्यावाचून? जा ना तू. मी बघेन माझं
काय ते.” समीर कशामुळे इतका अपसेट आहे ते लक्षात आल्यामुळे तिने न बोलता मानेला एक
झटका दिला आणि आपल्यामागे दार जोरात आपटून ती निघून गेली. समीर तयार होऊन पानसे
काकांकडे गेला. त्यांना अपेक्षित होतं बहुतेक तो येणार हे. कारण आज त्यांना मुळीच
आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही.
“काका, कधी ठरलं हे
युरोपचं? मला काहीच माहित नाही. मी कुठेही गेलो नव्हतो. इथेच होतो.” बोलता
बोलता त्याचा गळा भरून आला. पानसे काकांनी न बोलता त्याच्या खांद्यावर थोपटलं. आणि
थोडं खाकरून ते बोलायला लागले. “समीर, आता तू विचारतोयस म्हणून थोडं स्पष्ट बोलतो.
बोलू का?”
“हो. बोला ना काका.
तुम्हाला तर सगळं माहित असेलच. फार मोठा गुंता झालाय माझ्या हातून. आणि तो
सोडवायचा तर मला कुणाची तरी मदत लागणारच आहे.”
“तुझं लग्न
ठरल्यापासून तू बदलत गेलास. ते जाणवत होतं तुझ्या आई-बाबांना. आम्हीच समजूत काढली
त्यांची. म्हटलं, अहो तरुण वयात असं होतं. वाहून जातात मुलगे. नका
इतकं जीवाला लावून घेऊ. एकदा ही काहीतरी म्हणाली त्यावर वहिनी म्हणाल्या होत्या, “लोकांना
कोणत्या तोंडाने दूषणं देऊ मी? आमचंच नाणं बद्द वाजतंय, तर ती लोकाची मुलगी
आमची पत्रास का ठेवेल?” फार दुखावले आहेत तुझे आईबाबा. आम्हाला मूल
नाही म्हणून आम्ही एकटे आणि त्यांना तुझ्यासारखा मुलगा असून तेही एकटेच.”
समीरचे डोळे आता
वाहायला लागले. काल त्याने केलेला विचार बरोबरच होता तर. तो वाहवत गेला होता नेहाच्या
मागे. आणि आई-बाबा मागे राहिलेत, हे त्याच्या लक्षातही आलं नव्हतं.
“काका, काय करू ते कळत
नाहीये. डोकं पार भणभणून गेलंय माझं.” त्याला रडू आवरेना.
काकांनी त्याच्या
पाठीवर हात फिरवला. “आईवडील कधी मुलांवर कायमचे नाही रागवत. इतकं काही अगदी गंभीर
नाही घडलंय. चुकतात मुलं तरुण वयात. सगळं चांगलं होईल. काळजी नको करू.”
“कधी परत येणार आहेत
आईबाबा?”
“२२ दिवसांची आहे
टूर. जाऊन १० दिवस झाले. हो ना गं? म्हणजे अजून १२ दिवस.”
“कोणाबरोबर गेलेत?”
पानसे काकांकडून
त्याने सगळी माहिती घेतली.
पानसे काकांनी त्याला
आग्रहाने आपल्याबरोबर जेवायला बसवला. जेवल्यावर तिथेच थोडा आराम करून संध्याकाळी
तो घरी गेला. नेहा येईपर्यंत आता पुढे काय करायचं ते त्याने ठरवलं होतं. नेहा घरी
आल्यावर तो निवळलेला बघून तिने फार काही प्रश्न विचारले नाहीत. दुसऱ्या दिवशी
फोनवरुन त्याने ट्रॅव्हल कंपनीतून परतीची फ़्लाईट विचारुन घेतली.
शनिवारी सकाळी नेहा
म्हणाली, “समीर, जेवायच्या वेळेला पोचू या हं आईकडे.”
“तू जा. मी घरीच
राहणार आहे आज. दोन दिवस सुटी झालीय. काम पूर्ण करायला हवंय.”
“अरे पण, मी काही केलं नाही.
जेवशील काय?”
“मागवीन बाहेरून
काहीतरी. तू जा.”
नेहाला नवल वाटलं.
पण काम पूर्ण करायचंय म्हणाला ते तिला पटलं. ती मुकाट्याने निघून गेली. समीरने
जेवण मागवलं. दिवसभर गाणी ऐकत, टीव्ही बघत शांतपणे वेळ घालवला. रात्री बाहेर
जाऊन जेवून, फिरुन आला. शांत झोपला. रविवारी तो पानसेकाकांकडे जाऊन त्यांच्याशी
पुन्हा बोलून आला.
पुढच्या आठवड्यात
गुरुवारी रात्री तो म्हणाला, “नेहा, आई-बाबा उद्या पहाटे येतायत युरोपहून.
त्यांना आणायला मी आत्ता मुंबईला जातोय.”
“काय? समीर, बरा आहेस ना? त्यांनी जातांना
तुला....” समीरने हाताने तिला थांबवलं. “माझ्या सगळं लक्षात आहे. तू शांत रहा. मी
बघतो. मी उद्या-परवा तिथेच राहणार आहे. तू जा आईकडे.” आणि तिला पुढे बोलू न देता
तो बाहेर पडला.
पहाटे ४ वाजता
त्याला विमानतळावर पाहून आईबाबा थक्क झाले. टूर कंपनीच्या मॅनेजरला सांगून ती दोघं
समीरबरोबर टॅक्सीत बसली. काही झालंच नाही असं दाखवत समीर गप्पा मारत होता. चौकशी
करत होता. खरेदी काय केलीय ते विचारत होता. मंडळी घरी पोचली तो उजाडलं होतं.
पानसेकाकूंनी चहा नाश्ता केला. आंघोळी झाल्यावर आई सहज बोलावं तसं म्हणाली, “आता तू गेलास तरी
चालेल समीर. नेहा वाट बघत असेल ना.”
“ती आईकडे गेली
असेल. मी दोन दिवस इथेच राहणार आहे.”
पानसेकाकूंनी
पोळीभाजी दिली ती खाऊन मंडळी झोपली. गप्पा मारत दुपारचा चहा झाला. आईने तिच्या बॅग्ज
उघडल्या. त्याच्यासाठी आणलेलं जर्किन आणि नेहासाठी डायमंड इयरिंगचा जोड. ते पाहून
समीरचा बांध फुटला. आईच्या मांडीवर डोकं ठेवून तो मनसोक्त रडला. त्या फक्त
त्याच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या. तो बोलायला लागला. गेले आठ दिवस मनात
साचलेलं, योजलेलं सगळं बोलला. परत परत क्षमा मागितली.
·
* *
* *
दुसऱ्या दिवशी
दुपारची जेवणं झाल्यावर आईने त्याला जवळ बसवून घेतलं.
“आई, मी आता ते घर सोडून
परत इथे आपल्या घरी येणार आहे राहायला.”
“समीर, तुझी चूक तुझ्या
लक्षात आली हे चांगलं आहे. पण ती चूक निस्तरतांना दुसरी चूक नको करू.”
“म्हणजे? काय झालं?”
“तू परत इथे येणार
म्हणालास. पण नेहाला विचारलंस का? तिला मान्य आहे का हे?”
समीर गप्प बसला.
“म्हणजे नाही. तू
परस्पर ठरवलंयस. हो ना? हे बघ, निर्णय असे लादून काही निष्पन्न होत
नाही. तू इथे येत जा. तिलाही सोबत आण. मग हळूहळू तिची मर्जी बघून तिला विचार. ती
सहज हो म्हणाली तर बरंच आहे. नाही म्हणाली तर जबरदस्ती नको करू. जे चालू आहे ते
अधिक चांगल्या रीतीने चालू ठेवता येईल. धीर धर. असा उतावीळ होऊन गोष्टी जास्तच
बिघडतील. तुझा संसार सुरळीत राहणं जास्त महत्त्वाचं आहे आमच्यासाठी.”
तो गप्प बसला.
शुक्र-शनि-रवि असे ३
दिवस आई-बाबांबरोबर घालवून रविवारी संध्याकाळी तो परतला. दोन दिवसात नेहाचे ५-६
फोन येऊन गेले. मोजकं बोलून त्याने तिला सांगितलं की तो रविवारी घरी येईल. रात्री
नेहा घरी आल्यावर - - - “तू विचारलंस का त्यांना असं न सांगता गुपचूप का गेले ते?”
“मी बोललोय
आईबाबांशी. सोड आता तो विषय.”
पुढच्या शनिवारी ती
म्हणाली, “आज तरी येणार आहेस का आईकडे?”
“मी उद्या सकाळी
येईन जेवायला. आज तू जा. मला कामं आहेत.”
“जायचं असेल - तिकडे.”
“चोरी नाहीये मला
तिकडे जाण्याची. माझंच घर आहे ते. मला दुसरी कामं नाहीत का आईच्या मांडीवर
लोळण्याशिवाय?” तिला नवल वाटलं. पण न बोलता निघून गेली.
रविवारी तो नेहाच्या
आईकडे गेला. “कानातले मस्त आहेत रे समीर नेहाचे. आधी माहित असतं तर माझ्यासाठी पण
सांगितले असते आणायला.”
तो गप्प बसला.
दुपारी चहा घेऊन निघाला. “मी निघतोय. तू येतेयस का नंतर येशील?”
ती मुकाट
त्याच्याबरोबर घरी आली.
समीरने त्याचं नवं
रुटीन ठरवून टाकलं. एक आड एक रविवार घरीच घालवायचा. एक रविवार नेहाच्या आईकडे आणि
एक शनिवार-रविवार त्याच्या घरी. नेहाने चिडचिड केली. पण त्याने शांतपणे सांगितलं, “तुला नको म्हणतोय
का मी आईकडे जायला? मी कुठे जायचं ते मला ठरवू दे. माझ्या घरी यायला
तुला कुणी नाही म्हटलेलं नाही. तू ठरव काय करायचं, कुठे जायचं ते.”
दोन महिने असे
गेल्यावर एकदा नेहा म्हणाली, “मी पण येते तुझ्या आईबाबांकडे.”
हे नवं रुटीन चांगलं
जमलं. एक रविवार नेहाच्या आईकडे, एक रविवार समीरच्या घरी. आणि दोन रविवार
आपापल्या घरी. समीरला हे अगदीच मनापासून आवडलं. आता नेहाचा मूड पाहून घरी परत
जायचा विषय नेहाजवळ काढायची संधी कधी मिळेल याची तो वाट बघायला लागला. ती संधी
जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या तरी मुलगा हळूहळू पूर्वीसारखा मोकळा
होतोय आणि सून इथे येतेय, रमतेय यातही समीरच्या आईबाबांना समाधान होतं.
युरोपची टूर पावली त्यांना.
कोणत्याही आईबाबांना
‘अशी’ युरोप टूर करायची पाळी न येवो. इतकंच.
Comments
Post a Comment