तुला शिकवीन चांगला धडा
तुला शिकविन चांगला
धडा . . . . . .
बुटांचे बंद बांधून
इन्स्पेक्टर देशमुख घराबाहेर पडले आणि मोबाईल वाजला. एसीपी वैद्यांचा फोन पाहून
त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“गुड मॉर्निंग सर”
“देशमुख, चौकीत पोचलात का?”
“नाही सर. निघतोच
आहे.”
“गुड. असं करा. आधी x x x x x चौकीत
जा. तिथे x x x नावाच्या एक बाई येतील त्यांच्या मुलीला घेऊन. काहीतरी
डोमेस्टिक व्हायोलन्सची केस आहे. माणसं जरा ‘वरच्या’ वर्तुळातली आहेत. लगेच तक्रार नोंदवू नका. आधी दोन्ही बाजू नीट ऐकून
घ्या आणि मग ठरवा काय ते. दोन दिवस लागले तरी चालेल. तोपर्यंत तुमच्या चौकीत मी
पाठवतो कुणाला तरी.”
ऐकत-ऐकत देशमुख
जीपशी येऊन पोचले. वैद्यांचं हे असं पोलीस स्टेशनला ‘चौकी’ म्हणणं त्यांना मुळीच आवडायचं नाही. ते काय साधे हवालदार नव्हते.
सिनियर इन्स्पेक्टर होते. पण IPS करून डोक्यावर येऊन बसलेली ही माणसं, यांना काय सांगणार? जीपमध्ये बसलेल्या शिपायाला म्हणाले, “चल. तुला सोडतो. मला पुढे जरा कामाला जायचंय.”
x x x x पोलीसस्टेशनला येऊन ते बसले, पाणी पिऊन श्वास घेतायत तो एक भली मोठी गाडी
येऊन थांबली. त्यातून एक पन्नाशीची बाई आणि सोबत पंचविशीची तरुणी उतरल्या. त्या
तरुणीच्या एकंदर ‘अवतारा’वरुन देशमुखांनी मनाशी काहीतरी अंदाज बांधला.
“इन्सपे. देशमुखांशी
बोलायचंय.” त्या बाई आपल्याच तोऱ्यात.
“बसा. मीच देशमुख.”
“ये गं. बस. सांग
ह्यांना सगळं.”
ती मुलगी पुढ्यात
येऊन बसली तशी “२ दिवस पुरणार हे प्रकरण” याची देशमुखांना खात्री पटली. टेबलावर
दोन्ही हातांची कोपरं टेकून हाताची घडी घालून ते म्हणाले, “बोला”.
पुढचा एक तास त्या
मायलेकी आळीपाळीने जे बोलल्या त्यात एकच गोष्ट देशमुखांना कळली की त्या मुलीची
सासू फारच ‘खडूस’ आहे. फार वाईट मानसिक ‘छळ’ लग्न झाल्यापासून गेला महिनाभर ती सोसत होती. पण आता पगार झाल्यावर
तो तिने सासूच्या हवाली करावा असं फर्मान सोडलं होतं सासूने. आणि ही गुलामगिरी ती
अजिबात सहन करणार नव्हती. “तुम्ही त्यांना अरेस्ट करा साहेब, डोमेस्टिक व्हायोलन्स कायद्याखाली.” त्या बाई
तावातावाने बोलल्या.
“तुमच्या नवऱ्याची
काय भूमिका आहे या सगळ्यात?”
“काय सांगू, तो काहीच बोलत नाही त्याच्या आई-वडिलांना. मला
म्हणतो तू बदल स्वत:ला. असं कसं आपल्याला बदलता येईल इन्स्पेक्टर?”
“म्हणजे ते तुम्हाला
प्रोटेक्ट करत नाहीत. बरोबर? की आईच्या बरोबर तेही तुम्हाला त्रास देतात?”
“अंsss, नॉट रिअली. म्हणजे तो काही त्रास नाही देत, पण आईला काहीच म्हणत नाही तो. त्याने आईला
सांगायला पाहिजे ना मला त्रास नको देऊस म्हणून.”
देशमुखांनी एका
कागदावर त्यांची आणि मुलीच्या सासरच्या माणसांची सगळी माहिती आणि फोन नंबर्स लिहून
घेतले. सासूचा नंबर फिरवला.
“hallo, मी इन्स्पे. देशमुख बोलतोय x x x x x पो. स्टेशनमधून. तुम्हाला ताबडतोब इथे यावं
लागेल. तुमच्याविरुध्द तक्रार आहे घरगुती हिंसाचाराची.”
पलीकडे एक मिनिटभर
शांतता. देशमुख halo halo करत राहिले. बहुतेक स्पीकरवर हात ठेवून काही
बोलत असतील कुणाशी – त्यांचा तर्क. मग शांत स्वरात “अर्धा तास लागेल पोचायला.
चालेल ना?”
“जरा लवकर यायचा
प्रयत्न करा.”
पुढची वीस मिनिटं
देशमुखांना फारच अवघड वाटली. या दोघी समोर बसून आपापसात मोठमोठ्याने बोलत होत्या.
कशी ‘ती बाई’ अगदी लो क्लास विचारांची आहे आणि आता तिला
चांगला धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही हे पुन्हा पुन्हा बोलत होत्या. लग्नाला
आत्ता जेमतेम दीड महिना होत होता आणि इतक्यात त्या बाईने असा काय छळ केला असेल ते
काही केल्या देशमुखांच्या लक्षात येत नव्हतं. आणि वर आपल्याला पो. स्टेशनवरुन फोन
आलाय म्हटल्यावर ‘ती’ बाई अजिबात बावरलेली वाटली नाही. फारच ‘तयार’ असली पाहिजे.
वीस एक मिनिटांनी
एका खाजगी कॅब मधून एक बाई उतरल्या. एकट्याच. ५५-५८ वय, भारदस्त-खानदानी दिसणं, हालचालीत कमालीचा आत्मविश्वास. दाराशी येऊन त्या
म्हणाल्या, “मे आय कम इन? मी x x x . इन्स्पे. देशमुखांनी
फोन करून बोलावलंय मला.” देशमुखांनी त्यांना आत बोलावून खुर्चीकडे बोट केलं.
त्या शांतपणे आत
येऊन बसल्या. सुनेकडे आणि तिच्या आईकडे त्यांनी वळूनही पाहिलं नाही.
“का बोलावलं होतं?” त्यांचा थेट देशमुखांना प्रश्न.
देशमुखांनी त्यांना
थोडक्यात त्या दोघींचे आरोप सांगितले. “तुम्ही यांच्या मुलीचा मानसिक छळ केला असा
आरोप आहे.”
त्यांच्या चेहऱ्यावर
एक पुसट स्मित उमटलं.
“छळ? नाही. म्हणजे मी असं वागले हे मला मान्य आहे सर.
पण मी हे सगळं त्यांनी सांगितलं म्हणूनच केलं.”
आता देशमुख उडलेच.
त्या मायलेकी पण दचकल्या. “आम्ही सांगितलं छळ करायला?” दोघी तारस्वरात किंचाळल्या.
“सर, हिच्या आईने मला स्पष्ट सांगितलंय. माझ्याकडे
पुरावा आहे.”
देशमुखांना काय
चाललंय ते कळतच नव्हतं.
“तुमच्या मुलीशी
बोलू शकतो मी?”
“हो. नंबर देऊ का? पण ती बाहेर गेलीय. आज-उद्या येईल परत.”
“ते बघतो मी.”
त्यांनी मुलीचा नंबर फिरवला.
“halo, x x x यांच्याशी बोलतोय का मी? - - - - - मी इन्स्पे. देशमुख बोलतोय. X x x पोलीस स्टेशनमधून. तुमच्या आई इथे बसल्या आहेत
माझ्यासमोर. तुम्ही इथे येऊ शकाल का?”
ती एकदम ओरडली, “काय? आई पोलीस स्टेशनमध्ये? काय झालं? ती सेफ आहे ना? मला तिच्याशी बोलायचंय. तुम्ही आधी तिला फोन
द्या.” देशमुखांनी फोन स्पीकरवर टाकला.
“बोला - - - - आई, अग काय झालंय. तू पोलीस स्टेशनमध्ये का गेलीयेस? तुला कुणी काही केलंय का? तू बरी आहेस ना? अगं, बोल ना.” बोलता बोलता ती रडायला लागली. “हे बघ. रडू नको. शांत हो. मी
ठीक आहे. मला काहीही झालेलं नाही. तू या इन्स्पेक्टर साहेबांच्या प्रश्नांना
शांतपणे उत्तरं दे आधी.”
“तुम्ही आत्ता कुठे
आहात? इथे येऊ शकाल का?”
“मी . . . मी बाहेर
गेले होते दोन दिवस. आत्ता परत येतेय. पण पोचायला एक तास तरी लागेल मला. मी लगेच
येते तिथे पोलीस स्टेशनवर.”
आता त्या बाईनी
फोनवर बोलू देण्याची विनंती केली. “हे बघ, तू नाक्याशी पोचलीस की फोन कर. बाबा येतील तिथे. तू त्यांच्याबरोबर इथे
ये. मुलं त्यांच्या बाबाबरोबर घरी जातील. मी बाबांना निरोप देते. ते तयार राहतील.”
मग त्या बाईंनी
नवऱ्याला फोन करून मोजक्या शब्दात सगळं सांगितलं.
पुन्हा एकदा वाट
बघणं. त्या दोघी अक्षरश: हबकल्या होत्या. इतका वेळ मोकाट सुटलेली तोंडं आता
शिवल्यासारखी बंद होती. सासू शांत बसली होती. देशमुख अस्वस्थ. या असल्या लफड्यात
एसीपी वैद्यांनी आपल्याला फुकट अडकवलं याने वैतागले होते. त्यांनी चहा मागवला.
सासूने नाकारला. “मला चहाने acidity होते सर. Thanks एनीवे.” त्या मायलेकींनी नाक मुरडून “नको. कोल्ड मागवा काहीतरी.” असं
म्हटलं. देशमुखांनी कोल्ड्रींक मागवलं. चहा पिऊन देशमुखांना जरा बरं वाटलं. पेपर
मागवून त्यांनी जरा पेपरात नजर टाकली. थोड्या वेळात एका गाडीतून एक गृहस्थ आणि
त्यांची मुलगी शोभणारी एक तरुण स्त्री उतरली. घाई घाईने आत येऊन ती त्या बाईंच्या
जवळ गेली. गुडघ्यावर बसून त्यांच्या मांडीवर डोकं टेकून रडू लागली. “आई गं, हे काय आहे सगळं? बाबांनी मला सांगितलं सगळं. आणि सोहम कुठेय? तो नाही आला का तुझ्याबरोबर?” मग तिने एकदा वळून त्या माय-लेकींकडे हताशपणे बघितलं.
आईने तिच्या खांद्यावर थोपटलं, “शांत हो. काहीही होणार नाही मला. कायद्यावर विश्वास आहे ना आपला.
सगळं खरं काय ते सांग साहेबांना. त्यांच्या प्रश्नांची नीट शांतपणे उत्तरं दे.”
मग ती पाणी पिऊन, थोडी शांत होऊन, देशमुखांच्या पाठोपाठ आतल्या खोलीत गेली. तिची
जबानी तिच्या आईच्या समोर घेणं बरोबर ठरणार नव्हतंच. देशमुखांनी थोडक्यात तिला
सगळं सांगितलं. आता तिच्याही चेहऱ्यावर तिच्या
आईसारखंच पुसट स्मित आलं.
“विचारा सर.”
“तुम्ही सांगा तुमची
आई कशी आहे ते.”
क्षणभर शांत राहून
तिने सुरुवात केली. ती बराच वेळ बोलत होती. स्वातंत्र्य आणि शिस्त यांचा सुयोग्य
मेळ कसा घालावा ते आईने कसं शिकवलं हे वर्णन करत होती. “माझी आई प्रेमळ आहे. पण
प्रेमामुळे माणूस वाहवणार नाही याची काळजी घेते ती. कठोर आहे थोडीशी, पण दुष्ट
नाहीये ती. आमच्या घरच्या कामाच्या माणसांची सुध्दा काळजी आहे तिला. सुनेला कशी
छळेल ती? काहीतरी गैरसमज
आहेत सर. तुम्ही नीट चौकशी करा.”
देशमुखांनी तिला
बाहेर जायला सांगितलं. दुपारचे २ वाजत आले होते. जेवायलाही मिळालं नव्हतं. एसीपी
वैद्यांना फोन करून त्यांनी थोडक्यात रिपोर्ट केला. “पुरावा आहे म्हणतात त्या बाई? बघितलात का?”
“नाही सर. आधी
त्यांच्या मुलीशी बोलून घेतलं. आता नवरा आणि मुलाशी पण बोलतो आधी. पण मला जरा संशय
येतोय. काहीतरी जुना खुन्नस काढतंय कुणीतरी. नेमकं कोण ते कळत नाहीये.
संध्याकाळपर्यंत सगळ्या जबान्या पूर्ण करतो आणि रिपोर्ट करतो सर.”
देशमुखांनी फोन करून
त्या मुलीच्या नवऱ्याला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं. आणि ते त्या गृहस्थांकडे
वळले. २-४ वाक्यात त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या बोलण्यात काहीच हाती लागणार
नव्हतं. कारण घर हा ‘बायकोचा प्रांत’ या पठडीतले विचार होते त्यांचे. फारच अलिप्त आणि
त्रोटक बोलत होते. त्यांचा मुलगा आला. त्याला तर हे सगळं ‘एक ड्रामा’ यापेक्षा महत्त्वाचं वाटतच नव्हतं. “या बायकांना
दुसरी कामं नाहीत सर. आम्ही नोकऱ्या करायच्या की यांची ‘किचन पोलिटिक्स’ सांभाळायची?” इथेही काही मिळण्यासारखं नव्हतं.
त्यांनी सासूला
बोलावलं.
“पुरावा आहे
म्हणालात मगाशी. आणलाय बरोबर?”
“हो. सीडी प्लेअर
आहे?”
देशमुखांनी त्या
बाईंनी दिलेली सीडी कोम्प्युतरच्या सीडी ड्राईव्हमध्ये घातली. आता स्टेशनमधल्या
शिपायांना पण राहवेना. ते सगळे दाराशी गर्दी करून उभे राहिले.
लग्नाची सीडी होती. लग्नातला
शेवटचा पाठवणीचा प्रसंग असावा ते कळत होतं. ही समोर बसलेली मुलगी नखशिखांत नटून
सजून नवऱ्याच्या हातात हात घालून खुषी-खुषीत सजवलेल्या मोटारीकडे जात होती. तिची
आई डोळ्यात पाणी घेऊन सासूजवळ आली आणि म्हणाली, “सांभाळा. आपली मुलगी समजून काळजी घ्या.”
सीन कट.
“बघितलंत? आपली मुलगी समजा असं म्हणाल्यात त्या. म्हणून मी
जसं माझ्या मुलीशी वागते, तस्संच तिच्याशी वागले. यात छळ कुठे येतो, सर?” देशमुख झटक्यात सगळं समजले. त्या बाईच्या हुशारीचं कौतूक वाटलं
त्यांना. सगळे शिपाई पण तोंड लपवून हसत निघून गेले.
थोडं सरसावून बसत
त्या बाई म्हणाल्या, “सर, नव्याने लग्न झालं म्हणजे बेताल वागण्याचा
परवाना असतो का? बाहेर जातांना कधी
येणार ते सांगणं, घरातलं एखादं काम
करणं, ज्या घरी आपण आलो
त्या घरची प्रत्येक नाही पण महत्त्वाच्या गोष्टी शिकून-समजून घेणं, आपली आपण कामं करणं, नव्या घराच्या नातेवाईक आणि परिचितांशी ओळख करून
घेणं, नोकरांशी सौम्यपणे
वागणं हे नव्या सुनेचं कर्तव्य नसतं का? आणि ते जर तिला कळत नसेल तर समजावून देण्याची जबाबदारी सासूचीच असते
ना? मी माझ्या मुलीला
ज्या पध्दतीने समजावलं असतं, तस्संच हिलाही सांगितलं. मुलगी समजून सांगितलं. माझ्या मुलीने
तुम्हाला सांगितलंय मी कशी आहे ते. हिच्या तक्रारी सुध्दा तुम्ही ऐकल्यात. मी
वागण्यात फरक केलाय असं वाटतं का तुम्हाला?”
देशमुखांनी त्यांना
हातानेच थांबवलं. आत जाऊन एसीपी वैद्यांना फोन केला. सगळा प्रकार सविस्तर
सांगितला.
“सर, त्या मुलीचा कांगावा आहे सगळा. लाडावलेली आहे.
मनाविरुध्द काही झालेलं स्वीकारायची सवय नाहीये. पण सासू खमकी दिसतेय. बरोब्बर
अडकवलंय सुनेला आणि तिच्या आईला त्यांच्याच शब्दात. ती माणसं सुसंस्कृत दिसतात सर.
या केसमध्ये काही नाही पोलिसांनी लक्ष घालण्यासाठी. सासरच्या माणसांना घाबरवायचा
प्रयत्न आहे फक्त. ही केस counsellorची आहे साहेब.”
“देशमुख, तुम्ही आत्ता काही बोलू नका. मी त्यांना उद्या
बोलवून घेतो आणि बोलतो. सासू-सासऱ्यांना जाऊ द्या. त्यांना इतकंच सांगा की मला
रिपोर्ट दिलाय आणि निर्णय मी घेणार आहे. आमच्या सोसायटीत राहतात हे मुलीकडचे लोक.
मला जरा सांभाळून घ्यावं लागणार आहे. बघतो मी.”
देशमुखांनी बाहेर
येऊन सांगितलं की “एसीपी सरांना रिपोर्ट केलाय. ते उद्या सांगतील काय करायचं ते.
तुम्ही आता आपापल्या घरी जा.” यावर ती मुलगी आणि तिची आई आग्रह करायला लागल्या की
त्यांना अरेस्ट कराच आत्ताच्या आत्ता. देशमुखांनी खास ‘पोलिसी’ आवाज लावला.
“हे पहा, मला वैद्य सरांची ऑर्डर आहे. मी त्याबाहेर काही
करू शकत नाही. जे काय सांगायचंय ते त्यांना सांगा तुम्ही.”
चरफडत त्या दोघी
गेल्या. तिचा नवरा तिच्या पाठोपाठ गेला. त्याचे आई-वडील आणि बहीण पण निघाले.
देशमुखांनी त्यांना थांबवलं. “हुशारीने हाताळलात प्रसंग. अशा वेळी मुलाचे आई-वडील हादरून
जातात. कारण पोलिसांनी बोलावलं म्हटल्यावर अपमान वाटतो लोकांना. पण आता तुम्ही
ताणून धरू नका. येईल ती ताळ्यावर. उद्या वैद्य साहेब बोलतील त्यांच्याशी.”
त्या बाई हसल्या.
नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकून म्हणाल्या,
“लग्न झाल्यापासून
ऐकतेय मी, वैद्यकाका शेजारी
राहतात म्हणून. केव्हातरी या प्रसंगाला तोंड द्यावं लागणार याची कल्पना होती मला.
विचार करून ठेवला होता मी काय भूमिका घ्यायची त्याचा.”
बाहेर पडून गाडीतून
निघून गेली ती माणसं तरी देशमुखांचा वासलेला ‘आ’ मिटला नव्हता.
Comments
Post a Comment