वारस - माझ्या बायकोचा नवरा


वारस
(माझ्या बायकोचा नवरा)


पाटलांच्या वाड्यात जीवघेणी शांतता पसरली होती. पाटलांचे चिरंजीव रंगराव बाप होऊ शकणार नाहीत यावर आज चौथ्या डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केलं होतं. ५ वर्षं झाली तरी दुर्गेची कूस उजवेना. तिच्या सगळ्या तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी रंगरावच्या तपासणीचा सल्ला दिला होता. एकापाठोपाठ एक अशा ४ डॉक्टरांकडे तपासून घेऊनही रिपोर्ट बदलला नाही म्हटल्यावर पाटील हादरले होते. सुनेकडे बघवेना त्यांना. एकुलता एक मुलगा बाप होऊ शकत नाही म्हटल्यावर त्यांची झोप उडली होती. फारसे शिकलेले नसले तरी पाटील विचारी होते. मूल होत नाही म्हणून घाईघाईने मुलाचं दुसरं लग्न न करता सुनेवर उपचार करावे असा विचार करून तिला डॉक्टरांकडे नेलं आणि मग नंतर नाईलाजाने रंगरावलाही न्यावं लागलं. आता घराण्याला वारस मिळण्याचा प्रश्न उभा राहिला होता. ४ दिवस विचार करून त्यांनी थोरल्या बहिणीला कमळाक्काला मूळ धाडलं. अक्कासाहेब तातडीने आल्या.


सगळा प्रकार ऐकून त्या हबकल्या. ४ दिवस भाऊ-बहिणींची खलबतं चालली होती. दुर्गा कानकोंडी झाली होती. नवऱ्यावर मनापासून प्रेम होतं तिचं. रंगराव तर तिच्या वाऱ्याला उभा राहत नव्हता. शेतावरच्या घरात जाऊन राहिला होता. गड्याहाती दुर्गा डबा पाठवत होती तो अर्धा परत येत होता. कुणाच्या घशात घास उतरेना झाला होता. अखेर अक्कासाहेबांनी आपल्या लेकाला प्रतापरावाला - बोलवून घेतलं. सगळी हकीकत बैजवार त्याच्या कानावर घातली. गडी शहरांत राहून आला होता. ४ गोष्टी जाणत होता. २ दिवस विचार करून त्याने जो उपाय सुचवला त्याने पाटलांचा वाडा मुळापासून हादरला. पाटील त्याला मारायला धावले. दिवसभर भांडून, वाद घालून पाटलांना आपलं म्हणणं पटवून देण्यात तो यशस्वी झाला. त्याने सुचवल्याप्रमाणे दुर्गीचं दुसरं लग्न लावून द्यायला पाटील तयार झाले. हे ऐकून रंगराव पिसाळला. प्रतापरावांनी त्याला सांगितलं, “अरं मर्दा, इतके पिच्चर बगिटलेस. बायकूला पोर व्हत नाय, तर तिचा दादला दुसरी बाईल आनतो. आनतो ना? तमाशातली बाई पन ठिवतो आनून तिच्या उरावर. अरं ल्येका, घरान्याला वारस लागतोच की. मग दादल्याला पोर व्हत नाय तर बायलीने दुसरा न्हवरा क्येला तर बिगडतंय कुटं?” पुढचा आठवडाभर प्रतापराव आणि अक्कासाहेब रंगरावचं मन वळवत होते. अखेर तो कबूल झाला. पण दुर्गाला दिवस गेल्यावर त्या नवऱ्याने आपल्या घराकडे परत जायचं. वाटल्यास त्याला जमिनीचा २ एकराचा तुकडा तोडून देऊ. पण दुर्गीवर आणि मुलावर त्याने हक्क सांगायचा नाही अशी अट रंगरावाने घातली. ती मान्य केली गेली आणि दुर्गाचं मन वळवण्याची जबाबदारी रंगराववर आली.


दुर्गे, मला समजतंय तुजं दुक्कं. पन नशीबाफुडं कुनाचा काय विलाज आस्तोय का? आगं, तू कवातरी आय होशीलच. समज की तुजं लगीन आणि दुसऱ्या कुनाशी झालं आसतं तर तुला पोर झालंच आस्त, पन माझी बाईल कोन पन आसंल तरी बी मी बा न्हाई होनार कुनाचा बी. माजा बी जीव लय दुक्तोय गं. . . . .रंगरावचा स्वर ऐकून दुर्गी हेलावली.
व्हय की. काय करावं समजंना झालंय.
दुर्गे, मी काय म्हनतो, तू दुसरा दादला का न्हाई करीत?” दुर्गा जागच्या जागी थिजली. हे काय भलतंच बोलतोय हा? रंगराव पुढे बोलत राहिला. तुला पोर होईल, ते आपन आपलं म्हनून वाडवू. आणि दुसरा दादला क्येला म्हनून माजी प्रीत काय कमी नाय होनार. माज्या घराची आन दिलाची रानी तूच ऱ्हाशील की.
अवो पर, आस कुटे आसतंय का?”
ह्ये बग, तुला पोर नसतं जालं तर तू म्हनली आस्तीस की नाय मला का दुसरी बाईल करा आसं. मग आता मी म्हनतोय तर तू कर की दुसरा दादला. मला बी कोनतरी आबाअशी साद घालनारं पायजेल गं. माजे समदे दोसदार पोरांसाटी काय बाय आनत्यात जिल्ल्याला गेले का. मी आपला तुज्यासाटी काकनं आन फुलांची येनी त्येवडी आनतोय. कवा खुळखुळा, रेवड्या, वाळा आसलं कायबाय आनायला लै तरसतोय माजा जीव.....रंगराव विनवत राहिला. त्याच्यावरच्या प्रेमामुळे दुर्गी विरघळत गेली आणि एका बेसावध क्षणी ती हो म्हणाली. दुर्गीसाठी दुसऱ्या नवऱ्याचा शोध सुरु झाला.


पाटलांच्या चुलत-चुलत भावाचा मुंबईत राहणारा मुलगा देवराव सगळ्यांना मान्य झाला. घराणं एकच होतं. देवरावबद्दल त्यांच्या भावकीत मत चांगलं होतं. त्याला आणि त्याच्या बापाला बोलावणं गेलं. पाटलांचा प्रस्ताव ऐकून दोघं तडका फडकी परत निघाले. अरे दिग्यानाना, ह्ये असलं काय बाय वंगाळ तुज्या मनात येतंय आणि माज्या पोराला नरकात टाकतोयस काय रं? आरं, भावजई मंजी आय असती आपल्याला. अन तिच्यासंगत ह्ये असलं वंगाळ xxx वानी वागाय लावतोस माज्या पोराला? तुजी बुद्दी काय घहान टाकलीस काय रं x x x च्या?” पाटील रडायच्या घाईला आले. अक्कांनी आणि प्रतापरावांनी त्या दोघांना समजावलं. देवरावला मुंबईत त्याच्या नावावर स्वत:चं घर घेऊन द्यायचं कबूल केलं. आणि २ दिवसांनी देवराव एकदाचा कबूल झाला. भटजीला बोलावलं. वकिलाला बोलावलं. कागदपत्रं केली, अंगठे उठले. मुहूर्त निघाला आणि एका गोरज मुहूर्तावर दुर्गीचं आणि देवरावचं खोटं खोटं लग्न लागलं. हे लग्न खोटं आहे हे दुर्गा सोडून सगळ्यांना माहित होतं. आपण आता रंगरावची नाही तर देवरावची बायको झालो हे तिच्या मनावर ठसावं यासाठी प्रतापरावांनीच ही युक्ती केली होती.


लग्न लागलं, जेवणं झाली आणि तोक्षण आला. अक्कासाहेब दुर्गीला माडीवर पोचवून आल्या. ओटीवर बाप्ये माणसं गपगुमान बसली होती. रंगराव येरझाऱ्या घालत होता. त्याचं रक्त तापलं होतं. सिनेमातली दृश्य डोळ्यासमोर फिरत होती आणि जीवाची काहिली होत होती. अखेर प्रतापरावांनी देवरावला हाताला धरुन माडीच्या जिन्याकडे नेऊन सोडलं. तो परत येऊन रंगरावच्या गळ्यात पडला. भाऊ, राग धरू नको माज्यावर. आपल्या बापांनी हे सगळं केलंय, तुजा आणि माजा पन काय दोष नाय हेच्यात. मला धाकट्या भावासारखं मान बाबा.प्रतापरावांनी त्यांची मिठी सोडवली आणि त्याला बळेच जिन्याकडे ढकलला.


तो वर गेल्यावर सगळी आपापल्या अंथरुणाकडे गेली. रंगराव ओटीवर येरझाऱ्या मारत राहिला. एका क्षणी त्याचा बांध फुटला. झोपाळ्यावर पडून तो पोटभर रडला. वरच्या माडीवर होणाऱ्या हालचालींचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करायला लागला. दुर्गा दुसऱ्या पुरुषाच्या सहवासात ही कल्पनाही त्याला सहन होईना. मध्यरात्री केव्हातरी त्याचा डोळा लागला.


इकडे माडीवर देवराव बावरून दारातच उभा राहिला. वैनी, येऊ काय आत?”
वैनी? काय डोकं फिरलंय काय तुमचं? लगीन झालं की आपलं.
देवरावने जीभ चावली. ओशाळा हसला. तो दोन पावलं पुढे आल्यावर पुढे जाऊन दुर्गाने माडीचं दार लावलं. देवरावला घाम फुटला. घसा कोरडा पडला. त्ये, पानी हाय काय? नाय, जरा ताहान लागलीवती.
मसाल्याच्या दुधाचा लोटा दुर्गीने त्याच्या हातात दिला. त्याने एका घोटात ते संपवलं. टेष्टी लागतंय. घरचं जनावर असलं मंजे दुधा-तुपाची काय फिकर नसती. तिकडं मुंबईत आमी पान्यासारकं दूद इकत घेतो, आन लै म्हंजे लैच म्हाग असतंय.


एक तिखट नजर त्याच्याकडे फेकून, दिव्याचं बटन बंद करून दुर्गा पलंगावर आडवी झाली. देवराव गुमान पलीकडच्या सोफ्यावर जाऊन झोपला. सकाळी अक्कांनी भुवया उंचावून दुर्गीला प्रश्न केला आणि तिने मान उडवून, नाक मुरडून उत्तर दिलं. रंगरावने ते पाहिलं आणि तो खुश झाला. चला, आज तरी आपल्या मनासारखं झालं. देवराव घरात वावरू लागला. दुर्गीशी हक्काने बोलू लागला. रंगरावसोबत हक्काने न्याहरी करायला आणि जेवायला बसू लागला. तिच्याकडे चहा-खाणं मागू लागला. ती त्याची सरबराई करतांना बघून रंगरावचा जीव तडफडे. वावरात शिरलेल्या चुकार गुरासारखं काठी मारुन त्याला हाकलून लावावं अशी उबळ येई त्याला, पण वरकरणी त्याला देवरावशी गोड बोलावं लागत होतं. भाऊ मानावा लागत होतं. रोज तो दुर्गीकडे न्याहाळून बघत होता. पण कुठे काही अंदाज येईना त्याला तिच्या मनाचा. ती शांतपणे रोजच्यासारखीच वावरत होती घरात. नोकर-माणसांवरचा वचक कमी नव्हता झाला. धाकली पाटलीण असल्याचा, मालकिणीचा तोरा कायम होता. गळ्यात दोन दोन मंगळसूत्र घालून दिमाखात फिरत होती वाडाभर. रंगरावच्या उष्ट्या कपातून चहा पीत होती, त्याच्या उष्ट्या ताटात जेवत होती. अजून किती दिवस हितं ऱ्हाणार म्हनायचा हा देवराव?” असं त्याने एकदा तिला मागच्या अंगणात गाठून विचारलंही. लवकरच दुर्गीला उलट्या सुरु झाल्या आणि वाडा थरथरला. आनंद पसरला. रंगराव दचकला आणि मनातून सुखावलाही. सुनेला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं पाटलांना आणि अक्कासाहेबांना.


पुन्हा वकील आले. सगळे व्यवहार पूर्ण झाले. पुन्हा एकदा रंगराव आणि दुर्गीचं लुटुपुटूचं लग्न लागलं. देवराव पैसे घेऊन, जड अंत:करणाने दुर्गीचा निरोप घ्यायला आला. निगतो गं दु... आपलं त्ये ..... वैनी. सांबाळून ऱ्हावा. निगतो रं भावा. काळजी घ्ये. संबाळ तुजा बारदाना. त्ये ...... नाय म्हंजी ...... पोर झालं की फोन करा. मी येनार नाय हितं, पन ....रंगरावने पुढे होऊन त्याला मिठी मारली. लैच उपकार जालं बाबा तुजं. माजी दुर्गी मला परत भेटली. रागानं काय बाय बोल्लो आसंन तर इसरून जा गड्या. जीव लै जळला बग. पन असू दे.


दाराशी जाऊन देवराव मागे वळला. नाय भावा, मी काय म्हनतो, त्ये दुसरं मूल व्हावं वाटलं तर फोन कर.रंगराव त्याला मारायला धावला आणि देवराव घाईने जाऊन वाड्याबाहेर उभ्या असलेल्या भाड्याच्या गाडीत बसला. आरं, चल लवकर. जीव घील तो माजा.


दुसरं मूल? म्हंजे पुन्हा हे सगळं? रंगरावच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. आणि तो धाडदिशी तिथेच पडला.


(पोटी पोर नाही म्हणून नवरे दुसरी बायको करतात हे आपण शेकडो वेळा पाहिलंय मराठी-हिंदी सिनेमात. IVF तंत्रज्ञान यायच्या आधी असं काही होऊ शकलं असतं का असं आपलं आलं माझ्या मनात आणि लिहीली ही कथा. उगाच जरा गंमत.
आजच्या काळात याहून काय काय चमत्कारिक गोष्टी घडत असतील जगात. जगात कशाला आपल्या देशातही-अगदी महाराष्ट्रातही घडत असतील. पण तिथे नाही पोचू शकत नाही माझी कल्पनाशक्ति.)

Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न