रीत विपरीत
संसार सुरू
व्हायच्या आधीच नवरा मरणं आणि कोवळ्या बायकोला वैधव्य येणं हे सर्रास होत होतं पूर्वी. अशा आयुष्य ओढणाऱ्या बालविधवा खूप
दिसायच्या माझ्या लहानपणी. आई खूप हळहळायची. त्याचं कारण मोठेपणी कळलं. पण सारखं
वाटत राहिलं, यांचा गैरफायदा घेणारे नराधम असतीलच की
तेव्हाही समाजात. अशांना काही दिलासा नव्हता का आपल्या शास्त्रांत? बाईने झिजून, घुसमटत,
तडफडत मरत राहायचं हेच
त्यांनाही मान्य होतं का? बाईचा माणूस म्हणून विचार करण्यासाठी
एकोणीसावं शतक उजाडावं लागलं.
अखेर न राहवून ही
कथा उतरवली स्क्रीनवर. शास्त्रं काय म्हणतात,
'असे' विवाह होणं शक्य होतं की नव्हतं असे विचार नाही केले. सतराव्या शतकाला
किंवा त्याही आधी आजचे नियम आणि अपेक्षा लागू करू नयेत हे खरं, पण तेही केलं गेलंय या कथेत. शास्त्रार्थाच्या कसोटीवर कदाचित पोकळ वाटेल
ही कथा, पण तरीही - - -
#रीत_विपरीत
“गंगाधरशास्त्र्यांचा विश्वनाथ ना तू?”
खणखणीत प्रश्न
ऐकून पंत दचकले. इथे दिल्लीत आपल्याला अप्पांच्या नावावरून ओळखणारं कोण म्हणून
त्यांनी वळून पाहिलं. नीट निरखल्यावर ओळखला. बाळशास्त्र्यांचा – “निळू-नीळकंठ ना तू?”
“होय, तोच मी. तू इकडे कुठे?”
“मुलगा असतो माझा. झाली १२ वर्षं.”
“१२ वर्षं?
कधी पाहिला नाही तुला.”
“नाही,
इथे नव्हता तो. तिकडे
दुसऱ्या भागात राहत होता. इथे आत्ताच आलाय. मी प्रथमच आलोय इथे.”
“तुझ्या सावत्रआईला काशीला सोडायला गेलास तो
नाहीसाच झालास की रे. होतास कुठे इतकी वर्षं?
अन् लग्न कधी केलेंस? कुठली मुलगी केलींस?”
निळूचे एकावर एक
प्रश्न कोसळले पंतांच्या अंगावर. ते गडबडले. आता काय उत्तर द्यावे या विचारात
असतांना खिशातल्या फोनने सुटका केली. फोन कानाला लावून ते म्हणाले, “होय होय, आलो. पोचतोच.”
मानेनेच निळूचा
निरोप घेऊन ते घाईघाईने गेले. आपण कुठे जातो ते निळू बघत असेल याची खात्री होती
त्यांना. म्हणून दोन गल्ल्या आधीच वळले ते. आतल्या क्रॉस गल्लीतून पुढे घराशी
बाहेर पडता आलं असतं. उभ्या-आडव्या रांगेने घरं बांधायची ही या वस्तीतली पद्धत, आत्ता तरी त्यांच्या पथ्यावर पडली होती.
घरी येऊन घटाघटा
पाणी प्याले ते.
“झालं काय़?
इतका घाम कशाने आलाय? बराच वेळ झाला म्हणून म्हटलं हो नीलला फोन कर म्हणून. इतकं घाईने
येण्यासारखं काही झालं नव्हतं,” उमाबाई म्हणाल्या.
“काही नाही, फार लांब गेलो चालत
चालत. मग कळेना किती लांब आलो ......” पुटपुटत ते आत गेले. उमाबाई पाठोपाठ आत गेल्या.
“सूनबाई म्हणत होती, कान बांधून घेत जा बाहेर जातांना. कधीही हवा बदलते, त्रास होईल.”
“बरं बरं. पडतो जरा. नंतर येतो बाहेर,” पंतांनी जवळ जवळ घालवलंच त्यांना.
घशाला कोरड पडली, ती पाणी पिऊनही गेली नव्हती. अचानक निळू भेटला. प्रयत्नपूर्वक जीवाच्या आकांताने
मनाच्या तळाशी गाडून टाकलेलं पूर्वायुष्य सर्रकन् वर आलं आणि ढवळला गेला सगळा
भूतकाळ. कितीही प्रयत्न केला तरी हट्टी मन मागेच ओढ घ्यायला लागलं. ऐकेचना. अखेर
निरूपाय होऊन त्यांनी लगाम सोडले मनाचे. उधळू दिलं त्याला आणि अपेक्षेप्रमाणे ते
वाऱ्याच्या वेगाने ५०-५५ वर्षं मागे गेलं.
कोकणातल्या त्या
खेड्यातलं ते ४ खणांचं कौलारू घर. आईवेगळा विश्वनाथ आणि त्याचे वडील
गंगाधरशास्त्री. दोघंच राहायचे. वडील गावच्या सावकाराकडे कारकून होते आणि फावल्या
वेळात जोड उत्पन्न म्हणून भिक्षुकी करायचे. दोघांचं नीट भागत होतं. विश्वनाथ
मॅट्रिक झाला आणि जिल्ह्याच्या शाळेत मास्तर म्हणून लागला. महिन्यातून एकदा घरी
यायचा. पगार वडिलांकडे देऊन खर्चापुरते पाच-सात रुपये घेऊन, दोन दिवस राहून परत जायचा. हळूहळू विशी ओलांडली त्याने. १-२ मित्रांची
लग्नं झाली. त्याच्याही मनात काहीतरी कोवळं अंकुरायला लागलं होतं. एखादी नीटस
मुलगी दिसली की नकळत तिला निरखायचा तो. गळ्यात मंगळसूत्र दिसलं की आपोआप नजर
जमिनीकडे जाई, पण हिरवी दूड दिसली तर मात्र धीटपणे तिचा
पाठलाग करायचे डोळे.
एक दिवस घरी आला
आणि ओटीवर शेजारच्या गावातले कृष्णाजीपंत बसलेले दिसले. त्याला बघून चपापले दोघे.
हळूहळू काहीतरी बोलले आणि कृष्णाजीपंत घाईघाईने निघून गेले.
रात्री जेवण
झाल्यावर अप्पा म्हणाले,
“कृष्णाजीपंत मुलगी सांगून आले होते..” त्याने कान टवकारले आणि पुढचे शब्द ऐकून तो जागीच थिजला.. “माझ्यासाठी.”
“फार वर्षं एकटा राहिलो…. तुझी जबाबदारी होती…. पण आता तूही स्वतंत्र झालायस, अगदी एकटा राहतो मी इथे…. कुणीतरी हवं सोबतीला. सावकारांनी सुचवलं
पंतांना. मलाही पटलं.”
अडखळत, थांबत विचारपूर्वक तोलून मापून एकेक शब्द बोलत होते अप्पा. पण त्याच्या
डोक्यात शिरत नव्हतं. मुलगा लग्नाला आलाय आणि स्वत:च बोहोल्यावर चढायचं काय शिरलं
अप्पांच्या डोक्यात. जेव्हा वय होतं, मुलींचे बाप खेटे घालत होते तेव्हा नाही केलं
आणि आता सून आणायच्या वयात बायको करतायत….
सकाळी उजाडत
अप्पांचा निरोप न घेता निघून गेला तो. डोकं भणभणत होतं. ‘हे काय सुचलंय अप्पांना. लोक शेण घालतील तोंडात. माझ्या मनाचा काही विचारच
नाही का यांना?’ आठ दहा दिवसांनी त्याच्या कानावर आलं की
अप्पांनी लग्न केलं कृष्णाजीपंतांच्या मुलीशी आणि तिला घेऊन देवीला जाणार आहेत.
आल्यावर नक्षत्र बघून तिची ओटी भरून घेणार होते सावकारीणबाईंकडून. सांगणारा
त्याच्याकडे बारीक नजरेने बघत होता. चेहरा कोरा ठेवायला फार कष्ट पडत होते. पण
काहीही झालं तरी मनातला क्षोभ असा परक्यासमोर उघड होऊ देऊन चालणार नव्हतं.
निष्कारण चर्चेला आणि कुचाळक्यांना वाव मिळाला असता. रात्री न जेवता तो तसाच
झोपला. मध्यरात्री केव्हातरी दारावर थापा पडल्या आणि हाका आल्या, “विश्वनाथा, अरे विश्वनाथा.... दार उघड लवकर.” त्याने धडपडत उठून दार उघडलं. तो बाळशास्त्र्यांचा निळू दारात उभा. “अरे, गाडी आणलीय सावकारांची. चल लवकर. तुझे
अप्पा.... चल लवकर असाच.”
निळूने
वाऱ्याच्या वेगाने बैल पळवले आणि फटफटतांना तो घराशी पोचला तो घरात माणसं जमलेली.
चेहरे गंभीर. घराच्या दारात उभा राहिला - समोर घोंगडीवर अप्पा. तोंडात तुळशीपत्र, कपाळावर बुक्का. डोळे उघडे आणि चेहरा ......
“अप्पा –
कधी – कसं….” तो सुन्न झाला. बाळशास्त्र्यांनी त्याला आधार
दिला. नव्या बायकोला घेऊन देवाला जायला निघाले होते, तर वाटेत साप चावला आणि
जागच्या जागी.... नशीब बलवत्तर, मागून गावातलीच माणसं आली आणि त्यांनी सगळं
सांभाळलं. त्या मुलीला सावकारांकडे पोचवलीय. इतक्यात कुजबुज झाली. १७-१८ वर्षांची, हिरवं लुगडं नेसलेली एक मुलगी सावकारीणबाईंच्या आधाराने आली. अप्पांजवळ बसून
बांगड्या फोडल्या, मंगळसूत्र वाढवून त्यातला काळा मणी
अप्पांच्या तोंडात घातला. पायावर डोकं ठेवून मागे सरकली आणि भिंतीच्या आधाराने
बसून राहिली. शुष्क डोळे, निर्विकार चेहरा. नजर जमिनीवर खिळलेली.
अप्पांचे संस्कार
करून तो परत आला. शेजाऱ्यांनी घर सारवून घेतलं होतं. अंगणात चुलीवर पाण्याचा हंडा
तापत होता. डोक्यावर पाणी घेऊन तो घरात आला. निळूच्या आई ‘ती’च्या जवळ बसल्या होत्या. तिचीही आंघोळ झालेली
दिसत होती. कृष्णाजीपंत मात्र त्याला दिसले नव्हते सकाळपासून. त्याने असा अधांतरीच
प्रश्न केला.... “वडील नाही दिसले कुठे...”
“कर्माचे भोग म्हणायचे, दुसरं काय. लग्न लावून दिलं आणि संध्याकाळी गेले निघून कुठेतरी. माणसं
पाठवली शोधायला ती हात हलवत आली. हवेत विरलेच जसे. बाप तसा गेला आणि आता हे असं.
काय पोरीच्या नशीबात वाढून ठेवलंय....” त्यांनी डोळ्याला पदर लावला. विश्वनाथ चिडला.
म्हणजे आता आपल्या डोक्यावर आली ही ब्याद. लोकलाजेस्तव तरी बरोबर चल म्हणायला हवं.
शेजारच्या काकूंनी वाढलेले दोन घास खाऊन तो येरझारा घालत राहिला. ‘ती’ कोपऱ्यात बसून होती, थोड्या वेळात तिथेच मुटकुळं करून निजली. दुसऱ्या दिवशी न्हावी आला. तसा
विश्वनाथ हादरला. हे कालपासून त्याच्या लक्षातच आलं नव्हतं. त्याने गावकी बोलावली
आणि या प्रकाराला सक्त विरोध केला. “मी काही फार मोठा माणूस नाही. पण ही गोष्ट
माझ्या मनाला पटत नाही. काहीही दोष नसतांना हे असं विरूप होऊन जगायचं हे मला मान्य
नाही. वाट्याला आलेलं वैधव्य काही आता परतवता येणार नाही, पण हे नाही होऊ देणार नाही मी.” गावकीत दोन तट पडले. त्याचं म्हणणं काही
जणांना पटलं, काहींना वाटत होतं ही शहरी थेरं इथे करू
नयेत. पण कोणालाही न जुमानता त्याने आपलं घर,
जमिनीचा तुकडा
सावकारांच्या नावे केला आणि त्यांनी दिलेली रक्कम घेऊन तो नोकरीच्या गावी आला तिला
घेऊन. घरात शिरल्यावर म्हणाला, “सध्या राहू इथे. मी बघतो दुसऱ्या घराची सोय
लवकरच.”
तिने संध्याकाळी
पिठलं भात रांधला. तो मनापासून जेवला. कालपासूनची भूक साचली होती. जेवबाहेर ओटीवर
येऊन बसला. घराकडे तोंड करून म्हणाला, “तुम्ही जेवून घ्या. मी इथेच झोपतो.” नंतरही असंच वाऱ्यावर बोलत होता तो. ती काही
उत्तर देत नव्हती. तिचं नावही विचारलं नव्हतं त्याने. अप्पांचा दहावा-तेरावा
त्याने त्याच्या मनाने यथाशक्ति केला. पिंड ठेवतांना तो मनोमन अप्पांना म्हणाला, “माझा जराही विचार न करता आपलाच विचार करायला
गेलात, आणि ही नसती जबाबदारी माझ्या डोक्यावर टाकलीत. ती निभवीन मी. यापेक्षा
जास्त काही नाही. आहे हे स्वीकारा नाहीतर तुमची मर्जी.” पण आश्चर्य म्हणजे कुठे काही अडलं नाही. पुढचं सगळं नीट पार पडलं.
तेरावा झाल्यानंतर
हळूहळू त्याचं चित्त थाऱ्यावर यायला लागलं. घरात तिची हालचाल असायची, तो आला की
चाहूल लागू न देता वावरायची ती. म्हणजे तसा प्रयत्न करायची. पण त्याचे कान सतत
तिचा मागोवा घेत राहायचे. त्याच्या मनात आलं, तिच्याशी आपण असे तोडून वागतो, दोन
शब्द नीट बोलतही नाही. काय वाटत असेल तिला. आपण आपल्याच नादात होतो, तिच्यावर काय
ओढवलंय याचा विचारही नाही आला आपल्या मनात. कुणा म्हाताऱ्याला तिला देऊन बाप
परागंदा झाला आणि तो कुंकवाचा धनीही असा अचानक गेला. बापाच्या वयाच्या माणसाशी
लग्न आणि आता जो नीट बोलतही नाही त्याच्या आधाराने आश्रिताचं जगणं. कसं ओढत असेल
ती? कुणाजवळ मन मोकळं करावं तर इथे कुणीच नाही.
त्यात केशवपन न केलेली विधवा म्हणून गावात कुणी तिला उभी करत नाहीत. दया आली
त्याला. एक दिवस दुपारी अचानक काही कारणाने शाळा सोडून दिली हेडमास्तरांनी, तो
अचानकच घरी आला. ती मागच्या दारात पायरीवर बसली होती दाराच्या चौकटीवर डोकं टेकून.
तसाच तिचा डोळा लागला होता. चकीत झाला विश्वनाथ. चाफ्यासारखा रंग, रेखीव चेहरा,
नागिणीसारखे केस. एखाद्या सुंदर स्त्रीचं चित्र असावं तशी होती ती. तो घरात शिरला
तशी त्याच्या चाहुलीने ती दचकून उठली. घाईघाईने केसांचा अंबाडा वळला, तो
आंब्याएवढा झाला. आधीच घट्ट असलेला पदर तिने आणखी आवळून अंगभर घेतला आणि खाली मान
घालून कोपऱ्यात उभी राहिली. दया आली त्याला. विद्यार्थ्यांना आपण माणूसधर्म शिकवतो
आणि आपल्या घरात एक हाडा-मांसाचं जिवंत माणूस वावरतंय हे आपण विसरलो, आपल्या भावना
कुरवाळत राहिलो.
मागच्या दारी
हातपाय धुवून तो घरात आला. उंबऱ्यात बाहेर पाय सोडून तिरका बसला आणि तिच्याकडे
बघून म्हणाला, “बसा. काही बोलायचंय
तुमच्याशी.” ती थरथरत बसली. घसा
खाकरून त्याने सुरूवात केली. “अप्पांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला, त्याने बिथरलो होतो मी. त्यात हे
सगळं अघटित घडलं. तुम्ही पण बावरला असाल, गोंधळला असाल हे लक्षात नाही आलं माझ्या.
...... मी अजून तुमचं नावही विचारलं नाही.”
“पार्वती….”
“तुमचे वडील असे अचानक कुठे नाहीसे झाले?”
“……….”
“तुमच्या वडीलांना माहीत आहे सगळं.”
“ते गेलं त्यांच्याबरोबर. मला सांगा सगळं.”
ती हळूहळू
बोलायला लागली. तिची आई लहानपणीच गेली. वडिलांनी मोठी केली भावकीच्या मदतीने. वयात
आल्यावर लग्नाचा प्रश्न उभा राहिला. खर्च करायची ऐपत नव्हती. मग सावकारांच्या
ओळखीने गंगाधरपंतांच्या गळ्यात बांधली आणि निघून गेले. शोध घेतला तरी ते सापडणारच
नाहीत हे तिला माहीत होतं. पण एकदा प्राक्तन स्वीकारल्यावर तिची काही तक्रार
नव्हती. अचानक हे सगळं अघटित घडलं आणि आता ती त्याच्या दयेवर जगणार.
तो स्तब्ध झाला.
इतक्या लहान वयात इतकी प्रारब्धशरणता? कसं एखाद्याचं नशीब इतकं तिरकं चालतं? - - - - त्यांच्यात आता कामापुरतं बोलणं सुरू झालं.
ती हळूहळू मोकळी होत होती. तो नसतांना दारापर्यंत येत होती. उंबऱ्याच्या बाहेर
पाऊल टाकायचं नाही हे तर ठरलं होतंच, पण या गावात घराच्या बाहेरचं जग आहे तरी कसं
याबद्दल तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं, ते ती असं शमवायचा प्रयत्न करत
होती. अशात एक दिवस - - -
हेडमास्तरांनी
विश्वनाथाला बोलावलं. “गावातल्या लोकांकडून तक्रारी येतायत. तुमच्या घरात कुणी तरुण बाई राहते
आहे, आणि ती तुमची लग्नाची बायको नाही हे गावातल्या तरुण मुला-मुलींपुढे चांगलं
उदाहरण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी सगळं जाणतो. पण मी हतबल आहे. काही करू शकत
नाही. तेव्हा ......” विश्वनाथ समजला. घरी
येऊन तिला सामान बांधायला सांगितलं. तिला उमगलं सगळं. थंड चेहऱ्याने ती बोचकी
बांधायला लागली. विश्वनाथ तिला सांगून आपल्या गावी गेला. सावकारांना भेटला. सगळा
वृत्तांत सांगितला. “आता त्यांना काशीला
सोडून येण्याशिवाय गत्यंतर नाही. असा सगळीकडे त्यांना घेऊन फिरलो तर मला जगणं कठीण
होईल. त्यांचं केशवपन टाळू शकलो, पण पुढे काय हे सुचत नाही. माझं आयुष्य तरी कसं
जगू मी?”
सावकार काही बोलले नाहीत.
ते तरी काय करू शकत होते? तरुण विधवा स्त्री-त्यात केशवपन न केलेली-आणि अविवाहीत तरूण मुलगा असे
एकत्र राहणं कसं रूचणार समाजाला? भले नात्याने तो तिचा सावत्र मुलगा का असेना – पण रक्ताचं नातं नाही
त्यांच्यात. त्यांचं मौन हाच रूकार असं गृहित धरून विश्वनाथ निघाला. वाटेत निळू
भेटला. त्याला सगळं सांगितलं. “हरलो मी. माझी जबाबदारी नाही पार पाडू शकलो. अप्पांना वचन दिलं होतं ते
नाही पाळू शकत आता. काशीला सोडून येतो. पुढे त्या आणि त्यांचं नशीब.”
शाळेच्या गावी
परत आला, तर पार्वती बोचकी घेऊन बाहेर बसली होती. त्याला बघून उठून उभी राहिली.
खाली मान घालून म्हणाली, “मालकांनी ताबडतोब घर सोडा म्हटलं, कुठे जाणार? तुमची वाट बघत होते. सांभाळा तुमचा संसार.
मी जाते पाय नेतील तिथे. माझ्यासाठी तुमची फरफट नका करून घेऊ.” ती वळली. पण त्याने तिला थांबवली. विहीरीचं
पाणी काढून प्यायला आणि बोचकी उचलून दोघं निघाली.
महिन्याभराने
दोघं काशीत पोचली. अगदी दैना झाली होती दोघांची. कधी चालत, कधी कुणाच्या गाडीतून
पुढच्या मुक्कामाच्या एखाद्या गावापर्यंत. भाड्याच्या गाडीसाठी पैसे खर्च करून
चाललं नसतं. पुढे काशीत चरितार्थाची सोय होईपर्यंत पैसे पुरवायचे होते. शाळामास्तराच्या
नोकरीत अशी मिळकत तरी किती? त्या चारखणी चंद्रमौळी
घराची आणि जमिनीच्या कोरभर तुकड्याची फार किंमत दिली नव्हती सावकारांनी. त्यानेही
फार विचार न करता दिलेले पैसे स्वीकारले होते. पण तेव्हा कुठे माहीत होतं पुढे अशी
दशा होणार आहे. वाटेत कुणी विचारलं तर भावकीतल्या बाई आहेत, मी शिकायला जातोय त्या
माझ्या सोबतीने निघाल्या आहेत असं सांगत राहिला विश्वनाथ.
काशीत एका
धर्मशाळेत त्यांनी आसरा घेतला. ४-६ दिवस तर प्रवासाचा शीण उतरायला लागले.
अन्नछत्रात जाऊन आपण जेवायचा आणि पडशीत तिचं जेवण बांधून आणायचा. बाजुच्या खोलीत
एक वृद्ध पंडीत उतरले होते. होरारत्न होते. खूप लोक येत त्यांचा सल्ला घ्यायला.
त्यांचं भविष्य कधी खोटं ठरत नाही, असं म्हणत आजुबाजुचे लोक. एक दिवस रात्री जेवण
झाल्यावर तो त्यांच्याकडे गेला. हातातला ग्रंथ ठेवून त्यांनी त्याच्याकडे पाहिलं.
त्याला उजवा हात हातात घेतला, दिव्याजवळ घेऊन नीट पाहिला आणि म्हणाले, “कल कुंडली लेके आना|”
दुसऱ्या दिवशी
बोचकी सोडून त्याने त्याची कुंडली शोधून काढली आणि रात्री गेला त्यांच्याकडे. बराच
वेळ ते काहीतरी आकडेमोड करीत राहिले. कुंडली पुन्हा पुन्हा निरखत राहिले. मग
त्याच्याकडे नजर रोखून म्हणाले, “चिंता न करना| कुछ ऐसा करने जा रहे
हो, जिससे अपना जीवन और किसी दुसरेका जीवनभी खिल उठेगा| बस, धैर्य बनाए रखो| ईश्वरपर विश्वास करो, सब मंगल होगा|”
दुसऱ्या दिवसापासून
तो काम शोधत फिरायला लागला. पण घाटावर क्रियाकर्म करण्याच्या कामाव्यतिरिक्त काही
काम मिळेल अशी चिन्हं दिसेनात. इकडे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती. तिला
कळेना याच्या मनात तरी काय? दोनदा तिने महिलाश्रमात जाण्याबद्दल विषय काढला, तर त्याने अप्पांची शपध
घालून तिला गप्प केली. अखेर घाटावर काम करायला सुरूवात करायची असं त्याने
नाईलाजाने ठरवलं. घाटाच्या जवळ एक खोली घेतली आणि धर्मशाळा सोडून जायची तयारी
केली.
तिथे गेल्यानंतर
त्यांचा जगावेगळा संसार सुरू झाला. पार्वती बाहेर पडत नव्हती. उजाडायच्या आधी
बाहेर जाऊन आन्हिकं उरकून घरात स्वत:ला बंद करून घेत होती. घरात लागणारं सामान विश्वनाथ नियमाने आणून देत होता.
कामापुरतं वाचायला येत होतं तिला. अप्पांच्या पोथ्या दिल्या तिला वाचायला. इतकीशी
ती खोली, पण बाईचा हात फिरत होता तर तिला घरपण आलं. इतकी वर्षं ज्या घरपणाला मुकला
होता विश्वनाथ ते त्याला असं अचानक गवसलं होतं. थोडा सैलावला तो आता. थंडी पडायला
लागली, आणि बाहेर झोपणं अशक्य व्हायला लागलं. तसा तो घरात झोपायला लागला. त्याच्या
कामाबद्दल, इतर गोष्टींबद्दल अशा बऱ्याच गप्पा त्यांच्यात व्हायला लागल्या. ती काम
करत असतांना तो तिच्या नकळत तिला निरखत असे. तिला ते जाणवे. एकीकडे अवघड वाटे,
कारण तो आपला नात्याने मुलगा आहे हे ती विसरू शकत नव्हती. एका बाजुने तिच्या तरूण
मनाला त्याची नजर सुखावत होती. त्याच्या मनात मात्र काहीतरी विचार आकाराला येत
होता. हे असं अधांतरी कुठवर दिवस ढकलणार? भविष्याचा विचार करणं भाग होतं. सगळ्या बाजुने विचार करून एक दिवस तो
कुंडली घेऊन त्या होरारत्नांकडे गेला. त्यांना अपेक्षा होतीच तो येणार अशी. “निश्चय कर लिया?” त्यांच्या प्रश्नाने तो भांबावला. “परंतु गुरूजी, हमारा आपसी संबंध....वो मेरी
.... मात्रागमन तो पाप ......” त्यांचा चेहरा गंभीर झाला. थोडा वेळ शांत बसले. मग म्हणाले, “पुत्र, हमने बहोत शास्त्र पढे हैं| ये लिखे गए मनुष्यका जीवन नियमबद्ध करनेके
लिए, ना की उसे दु:खी करनेके लिए| तुम उनका श्राद्ध कर दो| फिर तुम्हारा उनसे कोई संबंध नही रहेगा| तत्पश्चात विवाह कर लेना| अपने अतीतको गंगामें बहाकर कहीं ऐसी जगह
जाके बस जाओ, जहाँ कोई कुछ पुछे नही, टोके नही|” बराच वेळ ते बोलत होते. काही शास्त्र, काही
त्यांच्या मनातलं गूज, माणुसकी धर्म आणि प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार. काळाच्या
फार पुढे होते त्यांचे विचार. एकेका शब्दासरशी तो थरथरत होता. कल्पनेने घाम फुटला
त्याला. गावात आजवर घालवलेलं आयुष्य, अप्पांचा कडवेपणा, लोक काय म्हणतील ही भीती
...... नाना प्रश्न. पण तो काही कुणाला फसवत नव्हता, कुणावर जबरदस्ती करायची
नव्हती. पार्वतीच्या डोळ्यात त्याला काहीतरी जाणवलं होतं. विश्वनाथाचा निश्चय दृढ
होत गेला. पुढचे दोन दिवस काहीही काम न करता तो गंगेच्या तीरावर बसून वितार करत
राहिला. भविष्याचा – तिच्या आणि त्याच्याही. ‘हे’ केलं तर काय आणि नाही केलं तरी काय.
दोन दिवसांनी
दुपारीच तो परत आला. तिला आश्चर्य वाटलं. “आज लवकर?” न बोलता हातपाय धुवून, कपडे बदलून तो
तिच्यासमोर येऊन बसला. सगळा धीर एकवटून मनाचा
निश्चय करून बोलायला लागला. “पार्वती.....” त्याने मारलेल्या एकेरी
हाकेने ती दचकली. तिच्या डोळ्यात भीती, संशय सगळं दाटून आलं. पण त्याचं लक्षच
नव्हतं तिच्याकडे. तो आपल्याच तंद्रीत होता. किती दिवस मनात साठलेलं आज त्याला
बोलून टाकायचं होतं. त्याच्या मनात तिच्याबद्दल जागा होत असलेला मोह, त्याने आवर
घालण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न, तिचं निरागस-अश्राप आयुष्य आणि गुरूजींनी दिलेला
सल्ला – सगळं सगळं बोलला तो. तासभर बोलत होता. ती डोळे विस्फारून ऐकत होती. भीती,
अगतिकता यांच्याशिवाय काही नव्हतं तिच्या मनात.
बोलायचा थांबून
तो तांब्या तोंडाला लावून पाणी प्यायला घटाघट. “विचार कर, इथून दूर अशा प्रांतात जाऊ, जिथे
कुणी ओळखणार नाही. नवा डाव मांडू. आपल्याला जर एकमेकांच्या आधारानेच जगायचंय, तर एक
पक्कं नातं हवं आपल्यात. त्या नात्याला नाव हवं, समाजात प्रतिष्ठा हवी. नाहीतर हे
कावळे सतत टोचत, जखमा देत राहतील. ......” बोलता बोलता तो थांबला. बाहेर जाऊन बसला.
दिवेलागणीला घरात खुडबूड झाली. भांडी वाजली. त्याने डोकावलं. ती पान वाढत होती.
हातपाय धुवून तो पानावर बसला. तिच्याकडे पाहिलं, रडून डोळे सुजलेले दिसले. दोन घास
जेवून त्याने पथारी पसरली आणि बाहेर जाऊन बसला. तिने न जेवताच सगळं आवरलेलं त्याला
कळलं. पण न बोलता तो पथारीवर आडवा झाला. जरा डोळा लागतो तो पायाला ओढ बसली. खोलीच्या
आतल्या कडीला दोरी बांधून त्याचं एक टोक पायाला बांधायची सवय लावून घेतली होती
त्याने. कारण जरा धक्का दिला की कड्या निसटून उघडत होत्या दाराच्या. दार उघडलं
गेलं तर कळावं म्हणून हा उपाय केला होता त्याने. तो दचकून जागा झाला. ती दार उघडत
होती. विजेच्या चपळाईने तो उठला आणि त्याने तिचा हात धरला. ती त्याच्या पायावर
कोसळली. त्याचा अंदाज खरा ठरला. ती जीव द्यायला निघाली होती.
आपल्यामुळे
त्याच्या जीवनात इतका गोंधळ माजला या अपराधी भावनेने तिच्या मनात घर केलं होतं. “जिथे मी जाते, तिथे काहीतरी विपरीत घडतंच. आधी
आई, मग नवरा आणि आता तुम्ही. माझ्या केवळ अस्तित्वामुळे असं कुणाचं अकल्याण व्हावं
हे नाही सोसत मला. माझं जीवन संपवण्यानेच तुम्ही निवांत जगू शकाल. जाऊ द्या मला.” त्याने तिचा हात घट्ट धरला होता. निश्चयी
स्वरात तो म्हणाला, “ठीक आहे. चल. आपण दोघंही
जाऊ. कारण माझंही दुर्दैव असंच माझ्या मागे लागलंय हात धुवून. आधी आई गेली, ऐन
तारुण्यात माझ्याऐवजी वडीलच बोहोल्यावर चढले, ते गेले आणि तुझी जबाबदारी निभवेन
असं वचन दिलं होतं वडिलांना त्यांच्या दहाव्याला ते काही माझ्या हातून पूर्ण होणार
नाही. म्हणजे मीही तसा पापाचाच धनी.” रात्रभर दोघं बसून
राहिली. बाहेर फटफटलं तसं तो तिला म्हणाला, “पुरेसा वेळ घे मनाला समजवायला. पण पुन्हा असा
जीवाचा घात करायचा विचार करू नकोस, माझी शपथ आहे तुला.” हताशपणे ती रोजच्या उद्योगाला लागली.
महिनाभर असाच
गेला. न बोलता सगळे व्यवहार होत होते. तिची तगमग पाहत होता तो. संस्कारशील मुलगी
होती ती. तरूण वय असलं तरी धर्माच्या विपरीत वागणं जमत नव्हतं. वयाच्या, मनाच्या
मागण्या आणि संस्कार यांचं द्वंद्व तिच्या मनात चाललेलं तिच्या चेहऱ्यावर त्याला
दिसत होतं. पण घाई करून तिच्यावर दबाव आणून काही साध्य झालं नसतं. एक दिवस
घाटावरून परत आला, तो तिच्या हातातल्या बांगड्या वाजतांना ऐकू आल्या. तो चकित
झाला. ती वळली, तर कपाळावर ठसठशीत कुंकू. बांगड्या घालतांना, कुंकू रेखतांना काय
झालं असेल ते तिच्या हाताला सुटलेला कापरा सांगत होता त्याला. तिचा निर्णय झालेला
कळला त्याला. त्याच्या संयमाला अपेक्षित फळ लागलं होतं. “मी दोन दिवसांत सगळी व्यवस्था करतो.” इतकंच बोलला.
दुसऱ्या दिवशी
गुरूजींकडे गेला. त्यांनी सांगितलेले विधी केले. पिंड सोडले. आणि दोन दिवसांनी
त्याने तिच्याशी विधीवत लग्न केलं. गुरूजींनी कन्यादान केलं. पार्वतीची ‘उमा’ झाली. बोचकी घेऊन तसाच तो तिला घेऊन निघाला
तो पार कर्नाटकात गेला. मधल्या काळात त्याने चार ठिकाणी चौकशी केली होती.
शिवरायांच्या काळापासून कर्नाटकात काही मराठी कुटुंबं स्थायिक झालेली त्याला कळली
होती. तिला घेऊन तो तिथे पोचला. नवा गाव, नवा प्रांत, नवं आयुष्य. चौकशा झाल्याच,
त्या कुठे चुकतायत. पण “दुर्दैवाच्या दशावतारांनी इथे आणून सोडलं” इतकं मोघम उत्तर देऊन त्याने विषय थांबवला.
ती लग्नाला तयार
झाली असली तरी त्याचा ‘नवरा’ म्हणून स्वीकार करायला
तिला वेळ लागला. त्याच्या संयमाची पुन्हा एकदा पुरेपूर कसोटी होती. पण तो उतरला
त्या कसोटीवर. वर्षभरात सगळं सुरळीत झालं. गावात पुरोहित म्हणून जम बसला. स्वत:चं घर झालं. पाणी वाहतं झालं. कानडी बोलायला
शिकली दोघं. घरात मराठी, बाहेर कानडी. श्रीधर आणि कावेरी अशी दोन मुलं झाली.
उत्तम, सुलक्षणी निघाली मुलं. मधूनच कोकणातल्या गावाची आठवण येऊन उदास वाटे. पण नव्या
वाटेवर पावलं रुळली होती, त्यांनी जुने घाव बुजले. श्रीधर उत्तम शिकला.
बेळगावातल्या मराठी घरातली मुलगी सांगून आली. कावेरीलाही उत्तम स्थळ मिळालं
बंगळूरातलं.
१२ वर्षं झाली
श्रीधरला इथे येऊन. २ मुलं झाली त्यालाही. पण विश्वनाथपंत आणि उमाबाई आलेच नव्हते.
बाळंतपणाच्या वेळी सूनबाई वर्षभर राहिल्या होत्या. नंतर खरं तर गावाच्या बाहेर
पडायला मन धजत नव्हतं. न जाणो, कुणी ओळखीचं भेटलं तर? इतकी वर्षं उरावर धोंडा घेऊन काढली होती,
गावाची वेस ओलांडली नव्हती. आता या वयात अप्रतिष्ठा ओढवून घेणं म्हणजे जिवंतपणी
मरणच. अखेर नातवंडांच्या मोहाने मात दिली सगळ्या धर्मशास्त्राला. तसाही
धर्मशास्त्राचा अपराधी होताच तो. आणखी एक अपराध. आज आठ दिवस झाले येऊन, आणि आज हा
निळू भेटला. सगळ्या खपल्या निघाल्या परत.
उमाबाई चार वेळा
येऊन गेल्या खोलीत. पंतांचा चेहरा अस्वस्थ होता, ते दिसत होतं. अखेर न राहवून विचारलंच
त्यांनी. पंतांनी सांगितलं, “बाळशास्त्र्यांचा निळू भेटला होता.” पण उमाबाई अनपेक्षितपणे शांत होत्या. “मग? पुन्हा भेटला तर घरी घेऊन या. कळू दे त्याला सगळं. रीतसर नवरा बायको आहोत
आपण. काही बिनलग्नाचे नाही राहिलो सोबत. ५० वर्षांपूर्वी ‘तो’ निर्णय घेतांना दाखवलेला कणखरपणा काय वयाबरोबर वाहून गेला? इतका जगावेगळा निर्णय घेतलात, तो खंबीरपणे
निभवलात. त्यासाठी घरदार सोडून परमुलुखात जाऊन तिथले होऊन राहिलात, आणि आता
वयाच्या या टप्प्यावर घाबरताय, कुणाला? जगाला? याच जगाने नाही नाही ते
बोलून आपल्याला गावातून देशोधडीला लावलं ते विसरलात? तेव्हा तुमचा हा निळू आला नाही तुमच्या
बाजुने कुणाला काही सांगायला. तुमचं सत्शील वागणं माहीत होतं त्याला, तरी मूग
गिळून गप्प बसला. मग आता का घाबरायचं त्याला? काय वाकडं करेल तो आपलं?.........” बराच वेळ नाना गोष्टी सांगत होत्या उमाबाई.
जुन्या आठवणी उसळी मारून वर आल्या होत्या. तेव्हा सोसलेले बोल, शाळेतून झालेली
हकालपट्टी, काशीला पोचेपर्यंत झालेले हाल, तिथे झेललेल्या लोकांच्या विकृत नजरा -
सगळं पुन्हा उगाळलं गेलं.
पंतांनी
उमाबाईंचा हात हातात घेतला. आता येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला पुन्हा एकदा एकत्र
तोंड द्यायला दोघं सिद्ध झाली.
Comments
Post a Comment