गुपित
गुपित
संध्याकाळी काय
करावं या विचारात मोहिनी टीव्हीच्या रीमोटशी खेळत होती तर फोन वाजला. लँडलाईनवर
कोण .... असा विचार करत तिने फोन घेतला.
“अगं, मोहिनी, मी नंदू.”
“काय गं, आज एकदम लँडलाईन?”
“अगं ... ते मरू दे. मी काय सांगते ते ऐक आधी.”
मग नंदू-नंदिनीने
जे काही सांगितलं त्याने मोहिनीची सुस्ती पार पळाली. प्राण कानात आणून ती नंदूचं
बोलणं ऐकायला लागली. तिचा लेक नीलेश आणि नंदूची मुलगी प्रियाचं ‘अफेअर’ आहे याचा नंदूला संशय येत होता आणि त्याचा
सज्जड पुरावा आत्ताच तिच्या हाती लागला होता. मोहिनी फेसबुकवर नव्हतीच. नंदिनीला
तिच्या स्वत:च्या लेकीने ब्लॉक केली
होती. आपलं प्रोफाईल, तिथले फोटो आईला दिसू नयेत म्हणूनच बहुतेक. पण आज नंदिनीच्या
सोसायटीतल्या एकीने नव्याने फेसबुक जॉईन केलं आणि सोसायटीतल्या पोरा-पोरींची
प्रोफाईल्स बघत होती, तर कार्टीच्या (हा नंदिनीचाच शब्द – मोहिनीला पियू आवडायची
फार) प्रोफाईलवर तिचे आणि नीलेशचे एकत्र फोटो आणि ‘happily together’ अशी कॅप्शन. हे फोटो तत्परतेने नंदिनीला
दाखवण्याचं सत्कर्म तिने आत्ताच पार पाडलं होतं. तिला कशीबशी वाटेला लावून तातडीने
तिने मोहिनीला फोन लावला होता. मोहिनी हे सगळं ऐकून चकरावली.
“खरंच असं काही असेल का गं नंदू?”
“असलं तर बरंच की गं. मी सुटले....” (अशी वाक्यं मनात बोलायची असतात हे नंदिनीला
चांगलं माहीत होतं. पण उघड ती इतकंच म्हणाली....)
“बघ ना गं या मुलांचे उद्योग. आपल्याला सांगायचं नाही का?”
“ए बावळट, आमचं अफेअर आहे असं सांगणार का? अफेअर चोरूनच करतात.”
“तू सांग आता मला. तुमच्या चिठ्ठ्या-चपाट्या पोचवून तेवढी हुशार झाले बरं
मी. ते मरो गं बाई, आधी या मुलांचं काय करायचं ते सांग.”
मग दोघींनी फार
खोल, गहन विचार करून एक प्लॅन ठरवला. आपल्याला कळलंय असं मुलांना मुळ्ळीच कळू
द्यायचं नाही. बारीक नजर ठेवायची, एकदा रंगे हाथ पकडायचं. मग बघू पुढे काय ते.
फोन ठेवून दोघी
आपापल्या स्वयंपाकघराकडे वळल्या. एका सोसायटीत राहणाऱ्या, एका वर्गात शिकणाऱ्या
घट्ट मैत्रिणी होत्या दोघी. अगदी केजी ते बीए. लग्नं झाली तेव्हा आपापल्या
नवऱ्याकडून पुन्हा पुन्हा वचन घेतलं की मैत्री तुटेल असं काही वागणार नाही. भले
होते दोघे बिचारे. सांभाळली बायकोची मैत्री. मोहिनीचा नवरा तर आधीपासून ओळखत होता
नंदिनीला. त्यांच्या भेटी, चिठ्ठ्या याला नंदूचाच आधार होता. मोहिनीच्या घरी कळलं
तेव्हा पण नंदूनेच त्याच्या सभ्यपणाची ग्वाही दिली होती. मगच मोहिनीचे आईबाबा
तिच्या सासू-सासऱ्यांकडे रीतसर सांगून गेले. मोहिनीचं प्लॅनिंग फसलं आणि पुढच्याच
वर्षी नीलेश आला. नंदिनीचं लग्न दीड वर्षाने झालं, आणि नंतर प्लॅनिंगप्रमाणे पियू
झाली. एकत्र फिरणं, भेटणं सुरळीत सुरू होतं आणि मध्येच हा घोळ घातलाय मुलांनी.
नीलेश जावई व्हावा अशी स्वप्नं नंदिनी बघत होती, पण त्यासाठी मैत्रीत बाधा यायला
नको होती तिला. म्हणून ती गप्प होती. आज ती खूषच होती. मोहिनी मात्र विचारात पडली
होती. म्हणजे पियू आवडत होती तिला, पण सून म्हणून तिच्याकडे पाहिलंच नव्हतं कधी.
रात्री नवऱ्याने
विचारलंच, “काय, आज मूड वेगळा
दिसतोय?”
तिने सगळं सांगितलं आणि
म्हणाली, “पियूचा सून म्हणून चेहरा येईनाच डोळ्यासमोर. चांगली मुलगी आहे, मला आवडते.
पण नीलेश इतका मोठा झाला आपले निर्णय आपण परस्पर करण्याइतका?”
नवरा हसला. “आपण काय वेगळे वागलो होतो का? आठव की ते दिवस. आपलं काय वाईट झालं का, मग त्यांचं का होईल? शांत रहा जे व्हायचं ते टळणार नाही. आम्ही
आहोत इतका दिलासा असू दे मुलांना.” त्याला सध्या गप्प राहण्याच्या प्लॅनविषयी सांगून म्हणाली, “बघू या, आपल्याला कधी सांगतोय ते.” त्याने मान डोलावली.
आता दोन्ही
बाजुने हेर खातं जोरात कामाला लागलं. रोजचे मूड, उशीर, खरेदी, सिनेमे सगळ्याची
चर्चा रंगायची जोरदार. काहीतरी कमेंट करून हसायच्या कधीतरी. एकंदरीत दोघी आता या
हेरगिरीत पुरत्या रमल्या होत्या. आणि अचानक .......
सोसायटीमधली ती ‘भवानी’ एक दिवस प्रियाजवळ बडबडलीच. कसं फेसबुक सुरू
केलं, तिचं प्रोफाईल पाहिलं, फोटो तिच्या आईला दाखवले..... तिचं चालू होतं चऱ्हाट
आणि प्रियाचे प्राण कंठाशी आले. काहीतरी कारण सांगून ती सटकली. पण नीलेश दिवसभर
बिझी होता. फोन करू नको असं कालच सांगितलं होतं त्याने. आता? पण आईने काहीच कसं विचारलं नाही. तिला काही
संशय नाही आला. शी:, कुठून बुद्धी झाली त्या
भवानीला .... खरं म्हणजे मलाच. कशाला टाकायचे वॉलवर. प्रियाची दिवसभर नुसती तडफड.
नाईलाजाने संध्याकाळी घरी आली तोंड पाडून. नंदिनीने विचारलंच, “का गं तोंड उतरलंय. काही होतंय का? नीलेश भेटला नाही का आज?”
उडली प्रिया.
म्हणजे ती टवळी आजचा वृत्तांत पण घरी सांगून गेली वाटतं. प्रिया एकदम गळ्यात पडून
मुसमुसायला लागली. नंदिनीने तिला जवळ घेतलं. गोड बोलून सगळं काढून घेतलं. ती लास्ट
ईयरला असतांना एकदा सिनेमाला गेली होती, तर मैत्रिणींशी चुकामूक झाली. गर्दीत एकजण
अगदी जवळ येत होता. आता अंगाला हात लावणार इतक्यात नीलेश एकदम आला आणि त्याला
ढकलून एकदम तिच्याभोवती हात टाकला आणि काही झालंच नाही असं दाखवत तिला बाहेर
काढलं. मग मैत्रिणी येईपर्यंत जाम झापली एकटी गर्दीत शिरल्याबद्दल. तिला त्याच्या
खांद्यावरच्या हाताने कसंतरीच झालं होतं, पण तो तसाच राहावा असं वाटत राहिलं.
मैत्रिणींनी लांबून पाहिलं आणि मुद्दाम जरा वेळाने आल्या. त्या आल्यावर तो गेला.
मैत्रिणींनी चिडवून हैराण केलं. तेही आवडलं. तो आधीच्या शोला आला होता. म्हणून
बाहेर पडणाऱ्या गर्दीत होता. मग मोबाईलवर फोन, मेसेजेस, रात्री उशीरापर्यंत फोन.
परीक्षा झाल्यावर संध्याकाळी बाहेर पडायला कारणं शोधणं. नंदिनीला आठवत होते एकेक
प्रसंग. चकित होत होती. ‘फारच चंट निघाली कार्टी!’
तीन वर्षं चालू
आहे हे सगळं. तो प्रमोशनसाठी थांबलाय. प्रमोशन मिळालं की घरी सांगायचं म्हणाला. पण
त्या भवानीने.....
“हां, काय म्हणालीस?”
“पण आई, तू आता मावशीला सांगशील?”
हसू लपवत नंदिनी
म्हणाली, “नको सांगू? माझी बालमैत्रीण आहे.
तिच्याशी कशी खोटं बोलू?”
“पण आई ......”
तिला थोपटत नंदिनी
म्हणाली, “शांत रहा. मी बघते.” रात्री चौघांची गुप्त व्हीडीओ मिटींग झाली. आणि खूप चर्चेनंतर येत्या
रविवारी घोषणा करून टाकायची असा ठराव पास झाला.
दरम्यान इकडे
त्या दोघांची पण सिक्रेट मिटींग झाली. तो वैतागला. चिडला. बडबडला. त्याच्या एकेक
शब्दासरशी तिचं अवसान गळत होतं. शेवटी ती रडायला लागली. आता फोनमधून कशी समजावणार…. कशीबशी शांत केली. “तू गप्प बस आता, मी करतो हँडल.”
रविवारी सकाळी
मोहिनी टेबलाशी कोथिंबीर निवडत होती. नीलेश उठून आला.
“आई...”
“हं”
“मी काय म्हणतो…”
“म्हण”
“इतकी कोथिंबीर कशाला?” (आँ? ट्रॅक चेंज?)
“दुपारी नंदूमावशीकडे जायचंय, ती वड्या करणार आहे. निवडून आण म्हणाली.” (मी आणते ना तुला बरोब्बर ट्रॅकवर.)
“क् कशाला...... नंदूमावशीकडे .......?”
“तुला नसलं यायचं तर नको येऊ. ती देईल डब्यात घालून.”
“नाही... मी येईन ना. म्हणजे... तसं आज काही ठरलेलं नाहीये दुसरं काही. तर
..... जाऊ आपण.”
“बरं.” तिचा संभाषणाला
पूर्णविराम.
दुपारी नंदिनीकडे
सगळी जमली. त्याचा अस्वस्थपणा बघून न बघितल्यासारखा होत होता. पियू उगाच आतबाहेर
करत होती. निळ्या ड्रेसमध्ये नुसती ‘परी’ दिसत होती. पण सांगणार
कसं.. च्… सगळे होते ना समोर. एकदा काहीतरी कारण काढून
तो तिच्यापाठून आत निघाला तर त्याच्या आईनेच काहीतरी काम सांगून हाक मारली. वड्या
गार करत ठेवल्या आणि नंदिनी बाहेर आली. तसा तिचा नवरा थेट नीलेशला म्हणाला, “काय मग जावईबापू, कधी करायचा साखरपुडा? आणि भरपूर हिंडून झालेलं आहे, आता लगेच
मुहूर्त धरायचा बरं. फार लाड नाही चालणार आता.”
त्याचं दचकणं,
सगळ्यांचं हसणं, पियुचं लाजणं आणि मोहिनीने तिला जवळ घेणं हे सगळं तर क्रमाने
होणारच. त्यात लिहायचं काय वेगळं. डोळे मिटा, आपसूक दिसेल हे सगळं घडतांना.
दिसलं ना?
Comments
Post a Comment