अगतिक
अगतिक
सकाळच्या घाईची कामं आटपून वनिता जरा पेपर
घेऊन बसली तो फोन वाजला. फोनवर नीलिमाचा नवरा – विजय - बोलत होता. तिला नवल वाटलं.
म्हणजे घरी येणं-जाणं व्हायचं तेव्हा तो बोलायचा, किरकोळ गप्पाही मारायचा. पण तिला
थेट फोन करण्याएवढं काय काम असेल? क्षणभरात आलेले इतके सगळे विचार बाजुला करून ती म्हणाली, “बोला, काय म्हणता?” तो अगदी खालच्या
स्वरात, जवळ जवळ कुजबुजतच बोलला, “संध्याकाळी जरा घरी चक्कर माराल का? गेले दोन दिवस सारखी रडतेय नीलू. काय झालं
विचारलं तर सांगतही नाही. काय करावं कळत नाहीये. गोंधळून गेलोय.” वनिता जरा घाबरलीच.
रडतेय? असं काय झालं असेल? “येते संध्याकाळी. काळजी करू नका. बघू आपण.”
संध्याकाळी वनिता नीलिमाकडे गेली तेव्हा
विजयराव तयारच होते. जुजबी बोलून “बरंय, मी चक्कर मारून येतो. तुमचं चालू दे मैत्रिणींचं गुफ्तगु.” असं म्हणून
वनिताकडे सहेतुक पाहून बाहेर पडले. चहाचे कप घेऊन दोघी टेबलाशी बसल्या. वनिताने
सरळ विषयालाच सुरूवात केली. विजयराव सकाळी काय म्हणाले ते सांगितलं. चहाचा कप
ठेवून नीलिमा क्षणभर शांत बसली आणि बघता बघता घळाघळा रडायला लागली. वनिता उठून
तिच्याजवळ जाऊन बसली. तिचा हात धरला आणि तिला शांत रडू दिलं. रडणं ओसरल्यावर ती
तोंड धुवून आली. वनिता म्हणाली, “सांग बरं आता, काय इतकं सलतंय तुला, की नवऱ्याला सुद्धा सांगत
नाहीयेस. घाबरलेत ते.”
“तुला माहीत आहे वने, काकांनी फसवून सह्या घेऊन कसं बाबांना घराबाहेर
काढलं आणि आम्ही किती कष्टात दिवस काढलेत. नोकर परवडत नव्हते, आईला घरकामात मदत
करून सगळा अभ्यास केलाय मी. सासरी आले ती सासू नसलेल्या घरात. आल्या-आल्या चुलीशी
लागले. सुरूवातीला स्वातंत्र्याचं अप्रूप वाटलं. खोटं का बोलू? पण नंतर अंगावर
यायला लागल्या जबाबदाऱ्या. दोन दिवस माहेरी जायचं तरी विजय आणि सासऱ्यांच्या
जेवणाची पंचाईत व्हायची. मग मुलं, त्यांच्या शाळा, परीक्षा. सासरे गेल्यावर तर
बाहेरची कामं पण अंगावर आली. विजय मला मदत करायचा, पण जसजसं त्याचं प्रमोशन आणि
जबाबदाऱ्या वाढत गेल्या, त्याला घरी वेळ कमी मिळायचा. मग वाटायचं, तेवढ्यात कुठे
त्याला कामाला लावायचा? वरकामाला बायका होत्याच. पण मी कायम घरात अडकलेली राहिले. मुलं मोठी
झाली, गरजा बदलल्या, पण आई लागत होतीच. आणि एक दिवस पिल्लं गेली उडून. आपापल्या
घरट्यात सुखात आहेत. तो आनंद आहेच. पण माझ्यामागचा संसार सुटत नाही गं. दोघंच असलो
तरी खायला प्यायला लागतंच ना. बाई ठेवली तरी वस्तू आणणं, त्यांची निगा राखणं हे
काय बाई करते थोडीच. आणि दोन माणसांचं काम किती असतं असं, त्यासाठी त्या बाईची
ताबेदारी सोसायची. हल्ली बायका कशा चढल्यात माहितेय ना तुला. पगार द्या आणि वर
अरेरावी सहन करा. पुन्हा आपल्याला गरज तेव्हा यांच्या सुट्या. असतील त्यांचीही
कारणं खरी, पण आपल्याला उपयोग नाही हे तर होतंच.
आमच्या प्रमोदचं लग्न झाल्यास आईने कपभर
चहा नाही करून घेतला हाताने. वहिनी सगळं करायची. आई बसल्या जागी वहिनी सांगेल
तेवढंच काम करायची. भाजी निवड, लसूण सोल, नारळ खरवड इतपतच. जबाबदारी शून्य होती
आईवर. मदत होते म्हणून वहिनी खूष आणि जबाबदारी संपली म्हणून आई निवांत. पण
माझ्यामागचं संपतच नाही. आता साठी आली की गं माझी सुद्धा. आम्हाला कधी
मागितल्याशिवाय कपभर चहा सुद्धा आयता मिळणार नाही का? माझ्या मागची वाणी,
भाजी ही कामं कधी संपणारच नाहीत का? कंटाळा आला म्हटलं तर विजय चहा करतो, बाहेरून जेवण आणतो. पण नेहमी
कुठे हे जमणार आहे?
मुलं आपल्या ठिकाणी आनंदात आहेत, ती काही
आता परत येणार नाहीत. आपण तिकडे जाऊन राहिलं तरी त्यांच्या वेळा आडनिड्या, आपण मदत
करावीच लागते. आयतं बसून न मागता कपभर चहा, गरम नाश्ता, तव्यावरची पोळी मला कधीच
मिळणार नाही. इतकी साधी अपेक्षा सुद्धा पुरी होऊ नये असं काय पाप केलं गं मी?”
नीलिमा थोडी थांबली. “एकदा सहज बोलले हे
विजयजवळ. तर हसत सुटला. म्हणाला, सासूरवास करायची इच्छा अपुरी राहते म्हणून वाईट
वाटतंय का तुला? याला सासूरवास म्हणतात का गं?
आपला नवराच अशी टिंगल करायला लागला तर मुलं आणि
लोकाच्या मुलीकडून काय आणि कसल्या अपेक्षा करणार? मी काय पाय चेपायला सांगणार आहे की डोकं दाबायला
सांगणार आहे? न मागता वेळेवर चहाचा कप आयता मिळावा, पेपर वाचतांना नाश्त्याची बशी
पुढ्यात यावी ही काय अशी अगदी अन्यायकारक अपेक्षा आहे का? आणि रोज कोण मागतंय, कधीतरीच. नोकरीतून निवृत्त
होता येतं, संसाराचं काय? बायकांना कंटाळा
येऊच नये का संसाराच्या चाकोरीचा? या संसाराच्या
जबाबदाऱ्यांचा कंटाळा आलाय मला. पण काय करू? टाकता येत नाहीत, कुणाजवळ बोलता येत नाही, बोललं तर ऐकणाऱ्याला वाटतं
बाईचं सुख दुखतंय. मग रडून दु:ख हलकं करते.”
वनिता स्तब्ध झाली. ज्या गोष्टी
नीलिमाच्या संदर्भात भाग्याच्या असं तिला आणि इतर मैत्रिणींना वाटत होतं, त्याच
गोष्टी तिला टोचत होत्या. त्यावर इलाज नव्हता तिच्याकडे. दोन शब्द समजुतीचे ती
बोलली खरी, पण त्यातला पोकळपणा तिचा तिलाच जाणवत होता.
घरी जातांना तिला वाटलं वरकरणी सुटसुटीत
संसार करणाऱ्या अशा किती नीलिमा कंटाळल्या असतील घरातल्या जबाबदाऱ्यांना? पैसे खर्च करून
सोयी मिळतात, मानसिक स्वास्थ्याचं काय? नव्या जमान्याची ही
नवी दु:खं. उपाय सापडेल तेव्हा सापडेल. पण तोपर्यंत रडत राहायचं का यांनी? वृद्धाश्रम हे
सगळ्या समस्यांवरचं रामबाण उत्तर नाही होऊ शकत. तिथेही काही अडचणी, समस्या आहेतच. समवयस्क
असतात, पण तेही आपापल्या समस्यांनी ग्रस्त. कुणाला मुलांनी टाकलं, कुणाला मुलंच
नाहीत, कुणाची मुलं पैसे पाठवतात पण फोन करून दोन शब्द प्रेमाने बोलत नाहीत. एक ना
दोन. आणि सतत अशांच्या सहवासात राहून चांगलं माणूस दुखणाईत होईल. तरूण माणसं, लहान
मुलांचा सहवास मिळत राहिला आजुबाजुला तर मन थोडं तरी उत्साही राहतं. नकळत अशा ‘सुटसुटीत संसार’ करणाऱ्या नात्यातल्या, शेजारच्या बायका, इतर मैत्रिणी तिला आठवत
राहिल्या. आपलीही लेक गेली सासरी, मुलाचं शिक्षण झाल्यातच जमा. इथे-परदेशात - - -
कुठे राहतोय काय माहीत. २-४ वर्षांत त्याचंही लग्न होईलच. मग आपणही ...........
नीलिमाची समजूत काढायला गेलेली वनिता आपणच
भविष्याच्या कल्पनेने धास्तावून घरी आली.
Comments
Post a Comment