अ परफेक्ट मॅच


अ परफेक्ट मॅच

नऊ वाजून वीस मिनिटं झाली होती. प्रत्येकाचं लक्ष दाराकडे होतं. रेवती आज लग्नानंतर कामावर रुजू व्हायची होती. सगळेजण तिची उत्सुकतेने वाट बघत होते. आणि ती ऑफिसमध्ये शिरली. फिक्या गुलाबी रंगाची कांजीवरम, गळ्यात कोरं, ठसठशीत मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि केसांचा दिमाखदार पोनीटेल. नेहमीप्रमाणे हसतमुख, आकर्षक पण अगदी वेगळी दिसत होती. सगळे तिच्या भोवती जमले. चेष्टा, कौतुक, सूचक प्रश्न हे सगळं झेलत, परतवत ती स्वत:शी हसत होती. पावणे दहाच्या सुमाराला ऑफिस रोजच्या कामाला लागलं. दुसऱ्या दिवशी परत साडी. नंतर सिल्कचे, खादीचे सुरेख ड्रेसेस, सुती-रेशमी साड्या. मंगळसूत्र छोटं झालं. पण कुंकू आणि पोनीटेल राहिलंच. ८-१० दिवस झाले आणि एक दिवस वीणा म्हणाली, “लंचला चल ना.” रेवती निघता निघता थांबली. “अगं, समीरच्या आईने दिलाय लंच बॉक्स. उद्या मी नाही आणत, उद्या जाऊ नक्की.” वीणा चकित. रेवती इतका विचार कधी करायला लागली? कायम जीन्स-टी शर्ट, जीन्स-कुर्ता घालणारी, केस मोकळे सोडून फिरणारी, टिपिकल गोष्टींना फाटा देऊन आपल्याला हवं तस्संच राहणारी, कधीही-कुठेही जाणारी, काहीही करणारी मनमौजी रेवती – इतका बदल? अगदी खाली डोकं वर पाय इतका? ‘कुछ तो गडबड है दया . . . . . पता करो|’

दुसऱ्या दिवशी लंचला गेल्यावर वीणाने थेट प्रश्न केला, “रेवती, इतका बदल तुझ्यात? का आणि कशासाठी?” रेवती हसली. “वाटलंच होतं तू असं विचारणार. . . .” मग रेवतीने सगळंच सांगितलं.

तिचे आणि समीरचे वडील एकत्र काम करत होते. गेल्या वर्षी समीरचे वडील रिटायर झाले तेव्हा त्यांना जेवायला बोलावलं होतं घरी आणि रेवतीला सून करून घेण्याबद्दल विचारलं. समीरच्या आई-बाबांना बहुतेक हे अपेक्षित होतं. त्यांनी समीरशी बोलायला सांगितलं. ते गेल्यावर रेवतीच्या चेहऱ्यावरची नाराजी, प्रश्नचिन्ह पाहून बाबा म्हणाले, “मी तुला विचारल्यावर तू नाही म्हणाली असतीस तर मला मुद्दाम विषय काढता आला नसता. तू एकदा त्याला भेट. नाही म्हणण्याचा तुझा हक्क मी नाकारतच नाही. पण न भेटता नाही म्हणू नयेस म्हणून मी थोडी लबाडी केली.” रेवती समीरला भेटली आणि तिला तो आवडलाच. शिक्षण, पोस्ट, संस्कार हे सगळं तिच्या बाबांनी आधीच पारखलं होतं. पण त्याच्या वागण्यातली ऋजुता, अदब - तिला एकदम पटलंच. “आम्ही नियमित भेटत होतो, पण तरी निर्णय घेता येत नव्हता मला. मग एकदा त्यानेच विषय काढला. मी सरळ सांगितलं त्याला की मला घरकाम येत नाही, करायला आवडत नाही. मी माझं काम सोडणार नाही. उलट तिथे आणखी काही वेगळं करण्याचं माझं स्वप्नं आहे. आर्थिक स्वातंत्र्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याने ते सगळं मान्य केलं. ‘मी किंवा माझे आई बाबा तुला या कशाचीही सक्ती करणार नाही’ असं अगदी पक्कं सांगितलं. पण दोन दिवसांनी त्याने त्याच्या अटी सांगितल्या.” आता वीणा सरसावून बसली.

समीरने सांगितलं की त्यांचं घर चांगलं प्रशस्त आहे. तिला अपेक्षित असलेली प्रायव्हसी तिला तिथे मिळेल. तो वेगळं घर करणार नाही. त्या दोघांच्यात त्याचे आईबाबा कधीही ढवळाढवळ करणार नाहीत. पण त्यांच्या काही छोट्या अपेक्षा आहेत. तिने अगदी टिपिकल नाही पण त्यांच्या अपेक्षेत बसणारी सून असावं. पोशाख आणि एकंदर राहणी त्यांच्या घराशी, राहणीशी सुसंगत असावी. घरातल्या खासगी गोष्टी बाहेर कळणार नाहीत, पण बाहेर दिसायला ती वेगळी दिसायला नको. किंवा घरात वावरतांना सुध्दा ती कोणी वेगळी आहे असं वाटायला नको. रेवती चांगलीच हादरली. साडी-मंगळसूत्र-कुंकू असं राहायचं? म्हणजे हे टिपिकलच झालं की. ती काही बोलली नाही पण ‘हे आपल्याला जमणार नाही.’ हे तिने मनाशी ठरवून टाकलं. ८-१० दिवस ती त्याला भेटली नाही. त्याला फोन केला नाही. तो फोन करेल याची वाट बघत राहिली. पण त्यानेही फोन केला नाही. मग तिनेच फोन केला. “माझ्याशी बोलणार नाहीयेस का?”
“मी तुला काही प्रश्न विचारले आहेत, रेवती आणि त्याच्या उत्तराची वाट पाहतो आहे. मला तुझ्यावर कोणताही दबाव आणायचा नाहीये. तू शांतपणे विचार कर. पुरेसा वेळ घे. तुझा निर्णय काहीही असला तरी तो तू आपणहून घ्यावास म्हणून मी दूर राहिलो आहे.”
तिची अस्वस्थता आईला कळली. तिने खोदून खोदून विचारलं. समीरच्या अटी ऐकून तीही विचारात पडली. रेवतीला हे असलं काही जमणार नाही याची तिला खात्री होती. पण रेवतीची तगमग वाढत चालली तेव्हा तिने बाबांना सांगितलं.

२-४ दिवसांनी बाबा म्हणाले, “रेवती, आयुष्य तुझं आहे, निर्णय तूच घ्यायचा आहेस. पण मी तुला काही गोष्टी सांगतो, त्याही विचारात घे. तुझ्यासाठी महत्त्वाचं काय? तुझं काम, स्वातंत्र्य की पोशाख, राहणी? आधी गोड गोड बोलून नंतर रंग बदलणारी माणसं आपण पाहतो. समीरने आधीच सगळं स्पष्ट सांगितलंय त्यामुळे तुला विचार करण्याची पुरेपूर संधी मिळतेय हे लक्षात घे.”
“पण बाबा, आत्ता तो हे सांगतोय, पुढे इतर टिपिकल गोष्टींचा आग्रह धरला तर?”
“रेवा, आत्ता त्याने तुझ्या काम आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या अटी मान्य केल्या आहेत त्या बाबतीतही तो असं वागू शकतो, ही भीती नाही वाटत तुला? तू तुझ्या सोयीने विश्वास ठेवते आहेस आणि तुझ्या सोयीने भीती बाळगते आहेस. तो सच्चा असेल तर असं नाही करणार. आणि लबाड असेल तर नंतर तुझ्यावर कोणतीही बंधनं घालण्याचा प्रयत्न करू शकतो. पण ही रिस्क कोणत्याही मुलाबद्दल असणार नाही का? आज तू समीरला नाही म्हणू शकतेस, पण उद्या जो मुलगा सांगून येईल तो असा वागणारच नाही याची खात्री कोण आणि कशी देणार? म्हणजे कुठेतरी, कोणावर तरी विश्वास ठेवावा लागेलच तुला. मग याच्यावर का नाही? आणि रेवती, तुला शिकलेला, हुद्देदार, प्रतिष्ठित असणारा आणि तरीही स्वत:ची कोणतीही अट न ठेवता तुझ्या सगळ्या अटी बिनशर्त मान्य करणारा नवरा हवाय? तसा मिळेल याची खात्री आहे तुला? तू तरी अशी वागशील? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तू दे नकार. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही हे तुला आधीच सांगितलं आहे.”

“पण या काय पोरकट अटी घालतोय तो....” रेवती कुरकुरली. धरलं तर चावतंय अशा अवस्थेत सापडली होती ती. “रेवा, त्याच्या अपेक्षांना पोरकट म्हणायचा अधिकार तुला नाही. तुझ्या अपेक्षांना तो असंच एखादं नाव देऊ शकतो. ते नाही केलंय त्याने. तू नाही म्हण. विषय संपवून टाक. पण एकीकडे माणसाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं महत्त्व तुला कळतंय आणि एकीकडे तू म्हणशील तस्संच त्याने वागलं पाहिजे, तुझं प्रत्येक म्हणणं मान्य केलं पाहिजे अशी अपेक्षा तू करावीस याचं मला आश्चर्य वाटतंय.”

खूप चरफडली रेवती. पण तिला कळून चुकलं की नाही म्हणणं आपल्याला जमणार नाहीये. मग ती त्याला भेटली आणि स्वत:मध्ये आवश्यक ते बदल घडवून आणायला वेळ मागितला. गेले ५-६ महिने ती घरी सलवार-कमीज घालतेय, त्याच्याबरोबर जातांना पण साडी. सलवार-कमीज असाच पोशाख. २-३ वेळा दोघं दिवसभर लांब फिरुन आले. खूप बोलले. बऱ्याच गोष्टींची चर्चा केली, बेत ठरवले. आणि २-३ महिन्यापूर्वी तो अचानक म्हणाला, “आता थांबायचं कशाला? लगेच लग्न करू.” दोघांच्याही घरी हळूहळू तयारी चालूच होती. आणि मग पुढच्या गोष्टी फटाफट झाल्या.

“आता दीड महिना होईल आमच्या लग्नाला. समीरच्या आईने मला कधीही, काहीही काम सांगितलेलं नाही. आमच्याकडे ३ बायका आहेत कामाला. त्या सगळ्यांना कामाची अशी शिस्त लावली आहे त्यांनी की न बोलता सगळ्या गोष्टी होत असतात. माझ्या खाण्याच्या सवयी त्यांनी स्वयंपाकाच्या बाईना सांगितल्या आहेत. त्या बरोब्बर करतात सगळं. माझा डबा अगदी वेळेवर तयार असतो टेबलावर. सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता उठावं लागतं आणि दिवसभर लोळत पडता येत नाही, एवढं सोडलं तर बाकी मी मजेत आहे. काही फरक नाही पडलाय माझ्या आयुष्यात.”
हे झालं सासुबाईंबद्दल, आणि समीर? त्याचं काय?”
त्याचं काय आता?”
वीणाच्या चेहऱ्यावरचं मिष्कील प्रश्नचिन्ह पाहून रेवती लाजली. वीणा उडलीच. ही चक्क लाजतेय? म्हणजे जादुगारच दिसतोय हा समीर.
खरंच ग वीणा, आमचे एकत्रित आर्थिक व्यवहार समीरने इतके चट्कन मार्गी लावलेत ना, की मला काही म्हणता काही बघावं लागलं नाही. मला तो आधीच आवडला होता, म्हणून तर हे सगळं मी कबूल केलं ना? पण आता तो जास्तच गोड वागतोय गं. म्हणजे आधी तो असा जरा अंतरावर होता, पण आता आमच्यातलं अंतर अगदी मिटलंय, म्हणजे त्यानेच मिटवलंय. सांगू का, ते सिनेमात किंवा नॉव्हेलमध्ये नाही का म्हणत जन्मो-जन्मीचं नातं वगैरे तसा फील येतो मला त्याच्या बरोबर असतांना.बघता-बघता तिचा चेहरा लाल-गुलाबी झाला आणि वीणाला कळून चुकलं ये तो गयी कामसे|’

“फरक पडला नाही असं म्हणतेयस तू रेवा, पण तसं नाहीये बरं का. खूप बदलली आहेस तू; पण जो फरक झालाय तो तुला मनोमन आवडलाय. हो ना?
“वीणा, बाबा म्हणाले ते खरंच होतं. कुठेतरी, कुणावर तरी विश्वास टाकायला हवाच. मी तो योग्य माणसावर टाकलाय. समीरसारखा नवरा मला मिळालाच नसता जर मी माझ्या अटींवर अडून बसले असते तर. आणि नुकसान माझंच झालं असतं. आयुष्यात तडजोड हवीच असं आपण तोंडाने म्हणतो, पण ती करायची वेळ येते तेव्हा गोंधळतो. तडजोडीला त्याग समजतो आणि उगाचच स्वत:चा अहंकार पोसत राहतो. बाबांमुळे मी जरा वेगळा विचार करुन बघायला राजी झाले. आपले पेरेंट्स आपल्या चांगल्याचाच विचार करतात गं, आपल्याला ते कळायला वेळ लागतो.”

वरवरच्या गोष्टींना अतिरेकी महत्त्व न देता तिने शहाणपणाचा निर्णय घेतला आणि त्याचा पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही याची तिला खात्री वाटत होती. रेवतीचा चेहरा आनंदाने, तृप्तीने चमकत होता.

राधा मराठे            

Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न